G20 leaders at Rajghat : Sarkarnama
देश

G20 leaders at Rajghat : जो बायडेन, ऋषी सुनक यांच्यासह जगभरातील नेते राजघाटावर : महात्मा गांधींच्या समाधीचे घेतले दर्शन

अनुराधा धावडे

New Delhi : नवी दिल्लीतील G20 शिखर परिषदेचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. शनिवारी दिवसभर झालेल्या कामकाजानंतर जगभरातून आलेल्या अनेक दिग्गज नेत्यांनी रविवारी सकाळीच राजघाटावर महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेतले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, यूएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस आणि आयएमएफ प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिएवा या सर्व नेत्यांनी प्रथम महात्मा गांधींच्या समाधीला अभिवादन केले.

तसेच, संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस, आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मासात्सुगु असाकावा, जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा, IMF च्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिएवा, जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) महासंचालक टेड्रोस एडनोम आणि इतर नेत्यांनी राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. या वेळी G20 देशांच्या नेत्यांनी राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहत महात्मा गांधींचे आवडते भक्तिगीत 'वैष्णव जन तो तेणे कहिये, जे पीड पराय जाने रे...' गायले.

ब्रिटनचे राष्ट्राध्यक्ष ऋषी सुनक यांची अक्षरधाम मंदिराला भेट

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक रविवारी दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. पारंपरिक पोषाखात सुनक यांनी सपत्नीक अक्षरधाम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सुनक यांच्या या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मंदिराबाहेर सुरक्षा व्यवस्थाही अधिक कडक करण्यात आली होती. भारतात येण्यापूर्वीच ऋषी सुनक यांनी दिल्लीतील एका मंदिरात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. ऋषी सुनक यांनी मंदिरात पत्नी अक्षता मूर्ती यांच्यासह भगवान स्वामीनारायण यांचे दर्शन घेतले. या दोघांचे स्वामीनारायण मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याने स्वागत केले आणि त्यानंतर त्यांना मुख्य मंदिरात नेऊन पूजा करण्यात आली.

दरम्यान, G20 मध्ये आफ्रिकन युनियनचा समावेश करण्यात आला. आफ्रिकन युनियनमध्ये आफ्रिकन खंडातील 55 देशांचा समावेश आहे. शिखर परिषदेची दोन सत्रे संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऋषी सुनक यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यादरम्यान दोन्ही नेत्यांनी व्यावसायिक संबंध मजबूत करण्याच्या आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याच्या मार्गांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांमधील या भेटीमुळे मुक्त व्यापार कराराच्याही मोठ्या आशा निर्माण झाल्या आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT