Yogi Adityanath sarkarnama
देश

मुख्यमंत्र्यांची खूर्ची अन् अंधविश्वास ; योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्री होणार?

उत्तरप्रदेशात गेल्या तीस वर्षापासून एक अंधविश्वास प्रचलित आहे. तो अंधविश्वास म्हणजे मुख्यमंत्र्यांची नोएडा भेट अन् आग्रा सर्किट हाऊस भेट.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. पण सगळ्याचे लक्ष आहे ते उत्तरप्रदेशाच्या (Uttar Pradesh Assembly) निवडणुकीकडे. उत्तर प्रदेशात गेली ३६ वर्षे एक मुख्यमंत्री सलग दुसऱ्या वेळी पुन्हा मुख्यमंत्री बनू शकला नाही.

१९८५ मध्ये एन.डी तिवारी सलग दोन वेळा मुख्यमंत्री बनले. त्यानंतर पुन्हा ही संधी कुठल्याच मुख्यमंत्र्याला मिळाली नाही. गेल्या तीस वर्षापासून उत्तरप्रदेशात एक अंधविश्वास प्रचलित आहे, त्यामुळे योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath)पुन्हा मु्ख्यमंत्री होतील का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत आहे.

उत्तरप्रदेशात भाजपचा कुठलाच मुख्यमंत्री तीन वर्षापेक्षा जास्त काळ सत्तेत राहू शकलेला नाही. भाजपचे येथे चार मुख्यमंत्री झाले. कल्याणसिंग १९९१ मध्ये पूर्ण बहुमताने मुख्यमंत्री बनले पण १९९२ मध्ये बाबरी प्रकरणात त्यांचे सरकार बरखास्त झाले. पण योगी आदित्यानाथ यांनी मात्र मुख्यमंत्री पदाचा पाच वर्षांचा काळ पूर्ण केला आहे.

योगी आदित्यनाथ यांना ते पुन्हा बहुमताने मुख्यमंत्री बनतील याची खात्री आहे. निवडणूकपूर्व (Uttar Pradesh Assembly)झालेल्या पाहणीत भाजपला बहुमत मिळेल, असा निष्कर्ष निघाला, त्यामुळे भाजपने योगी आदित्यनाथ यांनाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून प्रमोट केले आहे. उत्तरप्रदेशात गेल्या तीस वर्षापासून एक अंधविश्वास प्रचलित आहे. तो अंधविश्वास म्हणजे मुख्यमंत्र्यांची नोएडा भेट अन् आग्रा सर्किट हाऊस भेट.

उत्तरप्रदेशचे जे मुख्यमंत्री नोएडाला भेट देतात, त्याची खूर्ची जाते असे म्हटले जाते. १९८८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वीर बहादूर सिंग यांना नोएडा भेट दिली. त्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्याच भीतीने एन डी.तिवारी, मायावती, कल्याणसिंग, अखिलेश यादव यांनी नोएडा भेट नेहमीच टाळली. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली नोएडा मध्ये २०१३ मध्ये आशियाई बँक शिखर परिषद झाली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव हे नोएडाला आलेच नव्हते. शिवाय अखिलेश यादव यांनी यमुना एक्स्प्रेसवेचे उद्घाटन सुद्धा लखनौ मधून केले होते.

मुलायमसिंग यादव, राजनाथसिंग यांनीही ते कधी मुख्यमंत्री असताना नोएडा भेट दिली नाही. योगी आदित्यनाथ यांनी मात्र अनेकदा नोएडाला भेट दिली आहे. इंडस्ट्रीयल हब उद्घाटन, बोटेनिकल गार्डन उद्घाटन, मेट्रो लाईन, सॅमसंग कारखाना उद्घाटन अशा अनेक कार्यक्रमाना योगी आदित्यानाथ नोएडा येथे आले आहेत.

आग्रा सर्किट हाउस संदर्भात सुद्धा असाच एक अंधविश्वास आहे. १६ वर्षांपूर्वी राजनाथसिंग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असताना या आग्रा सर्किट हाऊस येथे राहिले आणि नंतर त्यांची खुर्ची गेली. तेव्हापासून हा समज प्रचलित आहे. मुलायमसिंग, मायावती, अखिलेश यादव यांनी आग्रा भेट दिली पण त्यांनी नेहमीच पंचतारांकित हॉटेल मध्ये मुक्काम केला. त्यांनी आग्रा सर्किट हाऊसमध्ये राहणे टाळलं. पण २०१८ मध्ये योगी आदित्यनाथ यांनी याच सर्किट हाउसमध्ये मुक्काम टाकून त्याविषयीचा समज खोटा ठरविला होता.

यंदाच्या निवडणुकीत योगी आदित्यनाथ गेल्या ३६ वर्षांचा अंधविश्वास तोडणार अशी चर्चा सुरु झाली आहे. कारण गोरखपूरचे मठाधिपती असलेले योगी आदित्यनाथ अंधविश्वास मानत नाहीत, यापूर्वीही आदित्यनाथ यांनी असे अनेक भ्रम तोडले आहेत. त्यामुळे योगी आदित्यानाथ पुन्हा मुख्यमंत्री होतील का ? हे आपल्याला १० मार्च रोजी कळेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT