Jagan Mohan Reddy, INDIA Alliance Sarkarnama
देश

Jagan Mohan Reddy : जगन मोहन रेड्डींच्या आंदोलनाचा फायदा इंडिया आघाडीला होणार? 'YSRCP' आघाडीसोबत येण्यासाठी विरोधकांची फिल्डिंग

Jagdish Patil

YS Jagan Mohan Reddy News : आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांनी आंध्र प्रदेश सरकारविरोधात दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन सुरु केलं आहे. राज्यातील तेलगू देसम पार्टी राजकीय सूडबुद्धीने काम करत असून त्यांनी राज्यात हिंसाचार पसरवल्याचा गंभीर आरोप देखील रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारवर केला आहे.

जगन रेड्डी यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारविरोधात एल्गार पुकारताच त्यांना पाठिंबा देण्यासाठी इंडिया आघाडीचे नेते सरसावल्याचं पाहायला मिळत आहे. जगन मोहन रेड्डी यांच्या आंदोलनाला विरोधी पक्षांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut), खासदार अखिलेश यादव यांनी रेड्डी यांची भेट घेतली. यावेळी या नेत्यांमध्ये चर्चा झाली. तर 'सत्तेत आल्यानंतर विरोधकांना अशा प्रकारे टार्गेट करू नये,' अशा शब्दात अखिलेश यादव यांनी आपली भूमिका मांडत जगन मोहन रेड्डी यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. या सर्व घडामोडीमुळे आता जगन मोहन रेड्डी इंडिया आघाडीसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

जगन मोहन रेड्डी यांचे सरकारवर आरोप काय?

माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी सत्ताधाऱ्यांवर राज्यात हिंसाचार पसरवल्याचा आणि 'YSRCP'च्या कार्यकर्त्यांना जाणूनबुजून लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे. तर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) आणि राम गोपाल यादव यांनी जगन मोहन यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.

तसंच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी आणि अरविंद सावंत यांनी देखील आंदोलन स्थळी जाऊन जगन मोहन यांची भेट घेतली. तर तामिळनाडूच्या व्हीसीके पक्षाने रेड्डी यांना इंडिया आघाडीत येण्याचं आवाहन देखील केलं आहे.

एकीकडे विरोधकांकडून रेड्डी इंडिया आघाडीत येण्याचं आवाहन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे जगन मोहन यांनी देखील खासदारांच्या संख्येची आठवण करुन दिली आहे. वायएसआरसीपीचे राज्यसभेत 11 तर लोकसभेत टीडीपीच्या खासदारांची संख्या 16 आहे. या पक्षाचे लोकसभेत 4 खासदार आहेत. त्यामुळे आमची आणि टीडीपीची ताकद समान असल्याची आठवण त्यांनी करुन दिली आहे.

उद्या पुन्हा सत्तेत येऊ शकतो...

दरम्यान, जगन मोहन रेड्डी यांनी सत्ताधारी पक्षांना सूचक इशारा दिला आहे. शिवाय त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या कृतीचाही निषेध केला आहे. माध्यमांशी बोलताना रेड्डी म्हणाले, आज ते राज्यात सत्तेत आहेत, याच्याआधी आम्ही सत्तेत होतो. उद्या पुन्हा आम्ही सत्तेत येऊ शकतो. मात्र, आम्ही अशा कृतीचे कधीच समर्थन केले नाही.

मात्र, टीडीपीचे सरकार आल्यानंतर राज्यातील परिस्थिती पूर्ण बदलली आहे. आंध्र प्रदेशात लोकशाही आहे की नाही? असा सवाल उपस्थित करत, राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून 45 दिवसांत 30 हून अधिक लोकांची हत्या झाली असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT