Murlidhar Mohol Sarkarnama
फिटनेस

Political Leader Fitness Funda : होणार होते कुस्तीगिर, थेट बनले केंद्रात मंत्री!

सरकारनामा ब्युरो

Political Leader Fitness Funda : ‘शरीर फिट तर, मन फिट, मन फिट तर करिअर फिट’ हे बाळकडू वडील किसनराव यांनी बालपणीच दिले होते. त्याची अंमलबजावणी केल्यामुळे आजही दिनचर्या कितीही व्यग्र असली तरी, महाराष्ट्रातील विविध शहरांत, परराज्यांत किंवा परदेशात असलो तरी, काही तरी व्यायाम प्रकार केल्याशिवाय चैनच पडत नाही.

ही गोष्ट आहे केंद्रीय मंत्री नागरी हवाई वाहतूक खात्याचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची. ताण-तणाव असतात. धावपळ होते. झोप कमी होते. तरीही दिवसभरात 16-18 तासांपेक्षा जास्त वेळ ते सक्रिय असतात. त्यांच्यातला कुस्तीगिर अजूनही जिवंत आहे. मोहोळ यांचा फिटनेस फंडा त्यांच्याच शब्दात.

आमच्या मोहोळ कुटुंबीयांचे मूळ पुणे (Pune) जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील मुठा गाव. या तालुक्यात कुस्तीचे वेड घरोघरी आहे. माझे वडील किसनराव यांनाही तालमीची आवड होती. कारण आजोबाही पैलवान होते. वडिलांनी तब्येत कमावलेली होती. त्यांना कुस्तीगीर व्हायचे होते, पण घरच्या जबाबदाऱ्यांमुळे ते शक्य झाले नाही. मात्र, व्यायामाची आवड त्यांना होतीच. त्यांचे कुस्तीगीर व्हायचे स्वप्न त्यांनी आमच्यात बघितले.

मी आणि माझा मोठा भाऊ प्रभाकर यांना त्यांनी लहानपणीच तालमीमध्ये पाठविले. त्यावेळी आम्ही पुण्यातील नवी पेठेत नवले वाड्यात राहत. माझी शाळा तेथूनच जवळ म्हणजे भावे हायस्कूल. शाळेत असताना माझी शरीरयष्टी कृश होती. त्यामुळे आमच्या दोन्ही भावांची तब्येत चांगली राहील, याकडे वडिलांनी कटाक्षाने लक्ष दिले.

शाळेत असताना कबड्डीचीही मला गोडी होती. त्यामुळे शाळेच्या संघातही निवड झाली होती. वयाच्या १३ व्या वर्षापासूनच वडील मला सदाशिव पेठेतील खालकर तालमीत पाठवत. एकीकडे शाळा आणि दुसरीकडे तालीम, असा माझा दिनक्रम सुरू होता. दहावी झाल्यावर वडिलांनी आम्हा दोघा भावांना कोल्हापूरला कसबा बावडा येथील शासकीय कुस्ती केंद्रात पाठविले. त्याचवेळी 11 वीमध्ये देशभक्त रत्नप्पा कॉमर्स कॉलेजमध्येही प्रवेश घेतला.

कोल्हापुरातील (Kolhapur) कुस्ती केंद्रातील दिवस भल्या पहाटेच सुरू होई. चार वाजता व्यायामाला सुरवात होई. रोज 7-10 किलोमीटर धावण्याचा व्यायाम झाल्यावर पारंपरिक व्यायाम असायचा. त्यात जोर रोज 500 ते 1000, बैठका 1500 ते 2000, सपाट्या 300 ते 500 आदी व्यायाम प्रकारांचा समावेश होता. त्याशिवाय टेकडी चढणे, दोर चढणे, जोडी फिरविणे आदी विविध प्रकारचे व्यायामही होत.

त्यानंतर कुस्तीचा सराव वस्ताद डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक उत्तमराव पाटील करून घेत. त्यात कधी चूक झाली, टाळाटाळ केली तर, वाढीव जोर किंवा सपाट्यांची शिक्षा होई. कुस्ती केंद्रात स्थिरसावर झालो. कुस्तीच्या स्पर्धांतही यशस्वी होत गेलो. त्यानंतर महाविद्यालयीन जीवनात स्पर्धात्मक कुस्ती सुरू झाली आणि माझ्यातील कुस्तीगीर घडत गेला. पुढे 74 किलो गटात राष्ट्रीय स्तरावर पोचलो. या दरम्यान तालमीत स्वतःचा स्वयंपाक स्वतः करण्यास शिकलो. आजही पोळी किंवा भाकरी मी चांगल्या पद्धतीने करू शकतो.

कुस्तीची कारकीर्द घडत असतानाच दृष्ट लागली पायाची नस दाबली गेली. त्यामुळे काही काळ कुस्तीपासून दूर व्हावे लागले. दरम्यान, पुण्यात परतलो. सार्वजनिक जीवनात भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कामाला सुरवात केली. कुस्ती सुटली तरी, व्यायामाची साथ सुटली नाही. निवडणुकांच्या राजकारणात सक्रिय झालो. धावपळ वाढली. सगळ्याच वेळा अनिश्चित झाल्या. मात्र, सूर्यनमस्कार, योगासनांचा आधार घेतला. अधूनमधून जोर-बैठकांचा व्यायामही घरात करतोच.

काही मित्रांच्या सल्ल्याने प्राणायामाचे धडे घेतले. त्याचा आता नियमित सराव सुरू आहे. कुस्तीच्या प्रेमापोटीच 2022 मध्ये कोथरूडमध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती आयोजित केली. त्यावेळी परत मैदानात उतरण्याची तीव्र इच्छा झाली. तत्पूर्वी महापौर चषक कबड्डी स्पर्धाही आयोजित केली. कार्यकर्ता म्हणून काम करताना तरुणपणात कमावलेल्या शरीराने महापालिकेत 2017 मध्ये पदार्पण केल्यावर स्थायी समितीचा अध्यक्ष आणि 2019 मार्च 22 मध्ये महापौरपदाच्या काळातही साथ दिली.

कोरोनाचे संकट असताना, संसर्ग होऊनही व्यायामामुळे सुखरूप परतलो आणि पहिल्यापेक्षा अधिक वेगाने कामाला लागलो. गेली दोन-अडीच वर्षे खूपच धावपळीत गेली. तरीही वेळ मिळेल तसा व्यायाम करण्यावर कटाक्ष असतो. ठराविक व्यायाम प्रकार केला पाहिजे, असा माझा आग्रह नसतो तर, व्यायाम केला पाहिजेच, ही भूमिका असते. त्यामुळे कधी जनसंपर्क करताना जिममध्येही तासभर वेळ घालवितो.

व्यसनापासून दूरच राहिलो आणि आहारावर लक्ष केंद्रीत केले. आता खासदार म्हणून दिल्लीत मिळालेल्या बंगल्यात व्यायामाचे साहित्य जमविण्यास सुरवात केली आहे. व्यायाम अजून वाढविणार आहे. कारण कुस्तीचे प्रेम कायमच आहे. कुस्ती थांबली तरी, त्यातून मिळालेली शिकवण ही आयुष्यभराची सोबत आणि शिदोरी आहे.

शब्दांकन - मंगेश कोळपकर

अशाच माहितीपूर्ण मजकुरासाठी, सखोल विश्लेषणासाठी आवर्जून वाचा 'सरकारनामा' आता साप्ताहिक प्रिंट स्वरुपात- घरपोच अंक मिळण्यासाठी संपर्क - ९८८१५९८८१५

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT