राजकारणामध्ये योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आवश्यक असते आणि घेतलेला प्रत्येक निर्णय प्रत्यक्षात उतरविण्यासाठी निरोगी आरोग्य लागते. मन, मेंदू आणि शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी मी रोज सकाळी सहाच्या आत योगा प्राणायाम करतो. दिवस भराचा थकवा घालविण्यासाठी किशोरकुमार, लता मंगेशकर, अजय-अतुल यांची गाणी ऐकतो, असे सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी सांगितले.
सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना, दिनक्रम पाळणे हे अतिशय आव्हानात्मक काम असते. तरीही दिवसाचे वेळापत्रक पाळत राहण्याचा प्रयत्न मी करतो. रोज रात्री दहाच्या आत झोपणे आणि पहाटे चार ते पाचच्या दरम्यान उठणे हा माझा नित्य दिनक्रम आहे. सकाळी सहाच्या आत एक तास योगासने, प्राणायाम, चालणे हा व्यायाम मी न चुकता करतो. आयुष्यात कोणतेही व्यसन केले नाही आणि शाकाहारी असल्याने माझी तब्येत आजही ठणठणीत आहे.
सकाळी व्यायाम झाल्यानंतर नाश्ता करतो आणि भेटायला आलेल्या लोकांची कामे करण्यास सुरुवात करतो. सकाळी लवकर उठल्यामुळे दुपारी अर्धा ते एक तास विश्रांती घेतो. त्यानंतर रात्री नऊ-साडेनऊपर्यंत पुन्हा काम करणे, सुरूच ठेवले आहे.
रात्रीचे जेवण साडेनऊ वाजता परिवारातील सदस्यांसोबत मिळून करतो. बाहेरगावी असेल, तर उपलब्ध वेळ आणि ठिकाण पाहून व्यायाम करतो. क्षेत्र कोणतेही असो, त्यामध्ये प्रचंड स्पर्धा असते. प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो. संघर्ष करण्यासाठी मन आणि शरीर तंदुरुस्त असावे लागते, त्यासाठी तरुणांनी रोज व्यायाम करावा, निर्व्यसनी राहावे, हा माझा त्यांना सल्ला आहे.
माझे वडील दिवंगत ब्रह्मदेवदादा माने दोन वेळा आमदार होते. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा प्रचंड दबदबा होता. तरीही अकरावी-बारावीच्या शिक्षणासाठी मी सोलापुरातील नेहरू वसतिगृहात राहण्यासाठी होतो. संगमेश्वर महाविद्यालयात शिक्षण आणि नेहरू वसतिगृहात मुक्काम असे माझे विद्यार्थी जीवन होते.
नेहरू वसतिगृहाच्या समोर पार्क स्टेडिअम आहे. त्यामुळे मला १८व्या वर्षीच व्यायामाची आवड लागली. गेल्या ४७ वर्षांपासून मी व्यायामाची आवड आजही जोपासली आहे. वसतिगृहामुळे मला निरोगी आयुष्याचा मूलमंत्र आणि अनेक जिवाभावाचे दोस्त मिळाले.
मी विद्यार्थी दशेत कबड्डी आणि धावण्यामध्ये उत्कृष्ट खेळाडू होतो. विद्यापीठ पातळीपर्यंत मला अनेक बक्षीसे मिळाली आहेत. संगमेश्वर महाविद्यालयाचा जीएसपासून माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. पुढे पंचायत समितीचा सभापती, सोलापूर दक्षिण मतदारसंघाचा आमदार, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अध्यक्ष, सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचा अध्यक्ष व सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती अशी माझी वाटचाल राहिली आहे. रनिंग राजकारणातील असो की खेळातील दोन्ही ठिकाणी अव्वल राहण्यासाठी फिटनेसचा मोठा वाटा असतो.
(शब्दांकन : प्रमोद बोडके)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.