Solapur, 08 February : कधी मुंबई तर कधी पुणे, नरखेड (ता. मोहोळ, जि. सोलापूर) तर कधी सोलापूर असा आठवड्याभराचा माझा दौरा जवळपास ठरलेला असतो. कामाच्या व्यापात आणि धावपळीत आरोग्याकडे, व्यायामाकडे कधी-कधी दुर्लक्ष होते. ज्यावेळी वेळ मिळेल त्यादिवशी निसर्गाच्या सानिध्यात जाऊन मनसोक्त ट्रेकिंग करतो. जेवढा व्यायाम चुकला, तेवढी कसर त्याच आठवड्यात भरून काढतो. रोज किमान पाच किलोमीटर चालण्याची सवय आजही कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रवक्ते व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उमेश पाटील आपल्या फिटनेसचं रहस्य उलगडत होते.
दापोलीतील (जि. रत्नागिरी) डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात कृषी पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असताना मैदानी खेळाच्या माध्यमातून व्यायाम होत होता. शिक्षण संपले, राजकारण, समाजकारणात सक्रिय झाल्यापासून मैदानी खेळ सुटले; परंतु त्याची जागा आता ट्रेकिंग आणि वॉकिंगने घेतली आहे.
माझी पत्नी तहसीलदार तृप्ती कोलते यांना ट्रेकिंगची (Trekking) आवड आहे. तिच्यामुळेच मलाही ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. आम्ही दोघांनी मिळून आतापर्यंत अनेकदा सिंहगड, तोरणा, राजगड यासह पुणे व सातारा परिसरातील अनेक ‘ट्रेक पॉईंट’ कव्हर केले आहेत. कामाच्या व्यापातून आम्ही खास सुटी काढून आजही ट्रेकिंगसाठी जातो. ट्रेकिंगमुळे निसर्गातील शुद्ध हवा आणि जबरदस्त तंदुरुस्ती मिळते. ट्रेकिंगनंतर पुढील काही दिवस मन प्रसन्न आणि एकदम ताजेतवाने होऊन जाते. त्यातून अधिक जोमाने काम करण्यास ऊर्जा मिळते.
पुण्यात असल्यानंतर सकाळी पाच आणि सायंकाळी पाच किलोमीटर असे रोज किमान दहा किलोमीटर चालण्याचा व्यायाम करतो. घाम निघेपर्यंत चालल्याशिवाय पूर्ण व्यायाम झाल्याचे समाधान होत नाही. गावाकडे नरखेडला (ता. मोहोळ, जि. सोलापूर (Solapur)) आल्यानंतर सकाळी आणि सायंकाळी शेतातील फेरफटका हा ठरलेलाच असतो. त्याच्या माध्यमातूनही चांगला व्यायाम होतो.
व्यायामाची आवड असल्याने मी मोहोळ आणि पुणे येथील घरात अद्ययावत जीम तयार केली आहे. जसा वेळ मिळेल, तसा ट्रेडमिल, सायकलिंगच्या माध्यमातून व्यायाम करतो. या शिवाय सूर्यनमस्कार आणि योगाच्या माध्यमातूनही फिटनेसकडे लक्ष देत असतो.
माईंड फ्रेशसाठी वाचन हेच टॉनिक!
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादीचा प्रवक्ता म्हणून मी आतापर्यंत जबाबदारी पार पाडली आहे. त्याद्वारे पक्षाची भूमिका प्रभावीपणे मी मांडत आलो आहे. ही भूमिका मांडण्यासाठी आधी संबंधित व्यक्तीला आपल्या सभोवतालच्या राजकारणातील घडामोडी माहिती होणे व आपल्या पक्षाच्या दृष्टीने तिचे विश्लेषण करणे या बाबतीत सतत अपडेट असावे लागते.
ही माहिती व अशी तयारी करण्यासोबतच कायदेशीर बाजू, पक्षाचे धोरण, नैतिकदृष्ट्या योग्य बाजू या सगळ्या बाजू महत्वाच्या असतात. त्यासाठी आपला स्वतःचा मूड आणि माईंड फ्रेश असणे आवश्यक आहे. मला वाचनाची प्रचंड आवड आहे. विविध वर्तमानपत्रांसोबतच, पुस्तके, कादंबरी, संदर्भ ग्रंथांचे मी नियमित वाचन करतो. वाचन म्हणजे माझ्यासाठी ‘माईंड फ्रेश टॉनिक’च आहे. या शिवाय वेबसिरीज, हॉलीवूडचे चित्रपट, हिंदीत डब केलेले चित्रपट मी आवर्जून पाहतो.
उमेश पाटील यांच्याविषयी...
उमेश पाटील हे अभ्यासू भाषणासाठी महाराष्ट्रात परिचित आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोहोळमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आमदार विजयी करण्यात उमेश पाटील यांच्या भाषणाचा मोलाचा वाटा राहिला आहे. भाषण मग ते कुठलेही असो, त्यात मुद्देसूदपणा आणि आक्रमकपणा ही त्यांच्या वक्तृत्वाची खासियत आहेत. प्रचार कालावधीत घसा व्यवस्थित राहावा, यासाठी ते विशेष काळजी घेतात
निवडणुकीच्या प्रचार कालावधीत उमेश पाटील हे शक्य तो थंड आणि तेलकट पदार्थ टाळतात. कंठसुधारक वटी, ज्येष्ठ मधाचा काढा व रोज सकाळी, संध्याकाळी मिठाच्या पाण्याने गुळण्या करतात. भाषणादरम्यान उच्चार स्पष्ट व्हावेत, कोणत्या शब्दावर आवाज चढवायचा आणि कोणत्या शब्दावर आवाज कमी करायचा याचे चांगले गमक त्यांच्याकडे आहे. हे गमक साध्य करण्यासाठी अनेक दिग्गज नेत्यांच्या भाषणांचा, आवाजशास्त्राचा अभ्यास केल्याचे ते सांगतात.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.