Kolhapur Politics  Sarakrnama
कोल्हापूर

Kolhapur Politics : मंडलिकांची सगळी भिस्त 'या' त्रिकुटावर

Rahul Gadkar

Kolhapur Loksabha Election : राज्यातील महायुतीचा प्रयोग यशस्वी होणार की नाही, याची प्रचिती देणारी ही लोकसभा निवडणूक आहे. जिल्ह्यातील सर्व मातब्‍बर नेते आणि गट महायुतीच्या बाजूने असल्याचे सध्याचे चित्र आहे. असे असले तरी या सर्व नेत्यांमध्ये आणि गटांमध्ये समन्वय ठेवून एकदिलाने सर्वांनी साथ दिली, तरच महायुतीचा उमेदवार विजयाचे लक्ष गाठू शकेल. यासाठी विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी सर्वांना सोबत घेऊन जाणे क्रमप्राप्त आहे. तर कोल्हापुरातील महायुतीतील नेत्यांवरच संजय मंडलिकांची भिस्त आहे, तर आजी- माजी आमदारांत मताधिक्य देण्यास चढाओढ राहणार आहे. kolhapur loksabha Election

आचारसंहिता जाहीर झाल्यावर तब्बल पंधरा दिवसांच्या रस्‍सीखेचनंतर अखेर मंडलिक यांना कोल्हापूर मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी मिळाली. मात्र, मंडलिकांसाठी ही लढाई सोपी नाही. कारण महाविकास आघाडीने उमेदवारी लवकर देण्‍यात बाजी मारली असून, राजकारणात कोरी पाटी आणि स्वच्छ प्रतिमा असणाऱ्या शाहू महाराज छत्रपती (Shrimant Shahu Maharaj Chhatrapati) यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे महायुतीला संयमाने प्रचार करावा लागणार आहे. संजय मंडलिक (Sanjay mandlik) हे जरी विद्यमान खासदार असले तरी गेल्या पाच वर्षांत पक्षाच्या धोरणांमुळे त्यांना आपल्या भूमिका बदलत राहाव्या लागल्या आहेत. सुरुवातीला ते शिवसेना-भाजप यांच्या मदतीने निवडून आले.

त्यानंतर शिवसेना महाविकास आघाडीसोबत (Mahavikas Aghadi) गेल्याने त्यांना भाजपच्या विरोधात जावे लागले. सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्येही त्यांना काही ठिकाणी वेगळी भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे मंडलिक यांना आता नाराज भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिकांना महायुतीच्या विजयाचे ध्‍येय डोळ्यासमोर ठेवून सोबत घ्यावे लागणार आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) , भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे (Samarjitsigh Ghatage) यांनी मंडलिकांना साथ दिली, तर कागलमध्ये मंडलिकांना मताधिक्य मिळू शकते. हीच परिस्थिती राधानगरी विधानसभा मतदारसंघाची आहे. येथे आमदार आबिटकर हे मंडलिकांच्या सोबत असतील. पण, माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांचे गट काय भूमिका घेतात, यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत.

चंदगड मतदारसंघात (Chandgad) आमदार राजेश पाटील मंडलिकांसोबत आहेत. येथे भाजपची ताकदही वाढली असली तरी गोपाळराव पाटील, माजी मंत्री भरमू अण्णा पाटील, कुपेकर गट यांची भूमिकाही महत्त्वाची असेल. करवीर मतदारसंघात पी. एन. पाटील आणि चंद्रदीप नरके यांचे बलाबल समान राहिल्यास निर्णायक मते कोणाच्या पारड्यात पडतात. यावर येथील चित्र स्पष्ट होईल.

कोल्हापूरकरांचा कौल महत्त्‍वा‍चा कोल्हापूर शहरात पोटनिवडणुकीत भाजपला चांगली मते मिळाली होती. आता शिवसेना-भाजप एकत्र आहे. याचा लाभ मंडलिकांना होऊ शकतो. असे असले तरी कोल्हापूरची अस्मिता या मुद्द्यावर कोल्हापूरकर (Kolhapur) कोणाच्या मागे उभे राहतात, हा औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.

परीक्षा लोकसभेची, तयारी विधानसभेची निवडणूक लोकसभेची असली तरी विद्यमान आमदार आणि इच्छुकांना विधानसभेचे परीक्षण या निवडणुकीतून करता येणार आहे. आपापल्या गटाची बांधणी या निमित्ताने होईल. लोकसभेत कोण काय भूमिका घेतो, यावर त्यांची विधानसभेची दिशा ठरणार आहे.

R

SCROLL FOR NEXT