महेश पाटील
Solapur, 02 April : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तुमच्याकडे मते मागायला मी पहिल्यांदाच आले आहे. काहींना वाटेल की मी आत्ताच का आले? त्यांना हे सांगायचं आहे की, दुसऱ्याच्या मतदारसंघात नाक खुपसण्याचे काम मी करत नाही. त्यामुळे आतापर्यंत मी इकडे आले नाही. पण, आता तुमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, तुमचा आवाज लोकसभेत पोहोचवण्यासाठी तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्या गावी आली आहे, अशा शब्दांत सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी विरोधकांना सुनावले.
आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी आज मंगळवेढा (Mangalvedha) दौऱ्यावर होत्या. त्यांनी सलगर बुद्रुक परिसरातील गावांना भेटी देत प्रचार केला. काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, ज्येष्ठ नेते शिवाजी काळुंगे आदी उपस्थित होते. मात्र, मित्रपक्ष शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते या दौऱ्यात सहभागी झाले नव्हते. त्यामुळे महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल आहे का, अशी चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मंगळवेढ्यातील 24 गावच्या उपसा सिंचन योजनेबाबत विधानसभेत मी आवाज उठविला होता. सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde)व (कै.) भारत भालके (Bharath Bhalke) यांनी या पाणीप्रश्नी काम केले आहे, त्यामुळे विरोधक हे आयत्या बिळावर नागोबा याप्रमाणे कागदावर मंजूर झालेल्या पाणी योजनेचे श्रेय घेत आहेत. विरोधकांच्या रेट्यामुळेच 24 गावची उपसा सिंचन योजना मंजूर झाली आहे, असा दावा प्रणिती शिंदे यांनी केला.
आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, भारतीय जनता पक्षाच्या सरकारने गेल्या दहा वर्षांत खोटं बोल; पण रेटून बोल या पद्धतीने कारभार केला आहे. भाजप सरकारच्या दहा वर्षांच्या काळात महागाई कमी झाली नाही. कोणाला रोजगार मिळाला नाही, तर शेतकऱ्यांच्या शेतीलाही पाणी मिळालं नाही.
मी काम करणारी आमदार आहे, त्यामुळेच मला सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील लोकांनी तीन तीन वेळा निवडून दिले आहे. आता तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. दिल्लीत सरकार दरबारी तुमचं म्हणणं मांडण्यासाठी मला आशीर्वाद द्या, असे आवाहन शिंदे यांनी केले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.