Mahalaxmi Mandiar Sarkarnama
कोल्हापूर

Kolhapur Ambabai Murti : जिल्हाधिकारी हे वागणं बरं नव्हं! पत्रकार पोट भरण्यासाठी खोट्या बातम्या देतात, जिल्हाधिकाऱ्यांचं वादग्रस्त वक्तव्य...

Kolhapur News : "अंबाबाई मंदिराबद्दल इलेक्ट्रॉनिक मीडियाने पत्रकारांनी चुकीच्या बातम्या छापल्या.."

Rahul Gadkar

Kolhapur Ambabai Murti : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सवामध्ये माध्यमाच्या कॅमेऱ्यांना मंदिरात प्रवेश मिळण्यासाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी पत्रकाराबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

महाशय जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकारिता कशी करायची, याचे धडे पत्रकारांना दिले. साहेबांच्या मनात पत्रकारांबद्दल किती राग आहे, हे त्यांच्या बोलण्यावरून आणि देहबोलीवरून स्पष्ट दिसत होते. अंबाबाई मंदिराबद्दल इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांनी चुकीच्या बातम्या छापल्या, पोट भरण्यासाठी तुम्ही चुकीच्या बातम्या छापता, असा थेट आरोपच त्यांनी केला. या वक्तव्याचा आता कोल्हापुरात निषेध होत आहे. (Latest Marathi News)

नेमकं प्रकरण काय?

करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीमध्ये बदल होत असल्याच्या बातम्या 5 महिन्यांपूर्वी कोल्हापुरातील इलेक्ट्रॉनिक मीडियाने प्रसारित केल्या. त्यावर स्वतःला धर्मशास्त्राचे अभ्यासक म्हणणाऱ्या काहींनी जिल्ह्याच्या साहेबाचे कान भरले. साहेबांना भलताच राग आला आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाला मंदिरात प्रवेश बंदीचा आदेश काढला. माजी पालकमंत्री आणि आजी पालकमंत्र्यांना सांगून या साहेबांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण साहेबांनी पालकमंत्र्यांना जुमानले नाही.

पत्रकारांना ठेवले ताटकळत

दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर प्रेस क्लबच्या अध्यक्षांना इलेक्ट्रॉनिक मीडिया, फोटोग्राफर्स यांना मंदिर प्रवेशासंदर्भात बैठक असल्याचा निरोप आला. मीटिंगची वेळ देण्यात आली होती दुपारी चार वाजता. पावणेसहा वाजले तरी साहेब काय आत बोलवेनात. साहेबांनी शेवटी आत बोलावले. मीटिंगबद्दल आपल्याला माहितीच नसल्याचे सांगत सर्वांचा आत गेल्या गेल्या पाणउतारा केला. यापूर्वी कोल्हापुरात आलेले कलेक्टर्स आणि त्यांचे पत्रकार सोबत असलेले संबंध याचीही त्यांना आठवण करून दिली.

मात्र, त्यांनी इतरांचं मला काही सांगू नका, असं बोलत आपलाच विषय पुढे दामटवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. या त्यांच्या कृतीवर प्रेस क्लबच्या अध्यक्षांनी आक्षेप घेतला, त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, तरीही ते ऐकत नसल्याने अध्यक्ष शेवटी मीटिंगमधून निघून गेले.

पत्रकारांची भूमिका

करवीर निवासनी श्री अंबाबाई मंदिरात देवीबद्दल आम्ही चुकीच्या बातम्या लावल्या असतील, तर कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या दृष्टीने आमच्यावर गुन्हा नोंद करा, अशी भूमिका पत्रकारांनी घेतली आहे.

पालकमंत्र्यांना दिले होते चॅलेंज

नवरात्र उत्सवाच्या काळात करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात माध्यमांच्या कॅमेऱ्यांना प्रवेश देण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ सकारात्मक असताना जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी 'नो कॉम्प्रमाईज' म्हणून बैठक संपल्यानंतर पत्रकारांना सांगितले होते. त्यावरून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीदेखील माध्यमांच्या कॅमेऱ्यांबाबत जिल्हाधिकारी नो कॉम्प्रमाईज म्हणत असतील तर मीही नो कॉम्प्रमाईज करणार नाही असे सांगितलं. त्यामुळे या विषयावरून मंत्री मुश्रीफ आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आमने-सामने आले होते. कोणत्याही परिस्थितीत यंदाचा नवरात्र उत्सव जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी भूमिका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची होती.

(Edited By -Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT