sujit minchekar  Sarkarnana
कोल्हापूर

Sujit Minchekar : मार्गातील काटा निघाला अन् सुजित मिणचेकर झाले अॅक्टिव्ह

Political News : महाविकास आघाडीच्या आंदोलनात माजी आमदार मिणचेकर दिसल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Rahul Gadkar

Kolahapur News : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीत घेण्यात विरोध दर्शविल्यानंतर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांना तडकाफडकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आले. माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या मार्गातील हा अडथळा दूर झाल्यानंतर व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा दौरा नुकताच झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच माजी आमदार सुजित मिणचेकर अॅक्टिव्ह झालेत. गुरुवारी महाविकास आघाडीने केलेल्या आंदोलनात माजी आमदार मिणचेकर दिसल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

शिंदे गटाच्या फुटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व नावालाच शिल्लक असताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व उपनेते संजय पवार आणि संपर्कप्रमुख विजय देवणे, रविकिरण इंगवले, मुरलीधर जाधव यांनी खिंड लढवत शिवसेना जिवंत ठेवली. मध्यंतरीच्या काळानंतर चंद्रदीप नरके यांच्या सोबत माजी आमदार सुजित मिणचेकर हे देखील शिंदे गटात जातील अशी चर्चा होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांच्या घरात माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी भेट घेतल्याची ही चर्चा होती. मात्र त्यांनी वेट अँड वॉच ची भूमिका घेत ठाकरे गटासोबतच राहण्याचा निर्णय घेतला.

या संपूर्ण परिस्थितीनंतरही हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाची शिवसेना ह्यां ना त्या मागणीवरून आक्रमक राहिली. तत्कालीन आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर किंवा खासदार धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढण्यात ही मुरलीधर जाधव आघाडीवर होते. शिवाय ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सांगली फाटा येथे रास्ता रोको करून मुरलीधर जाधव यांनी राज्य सरकारला धारेवर धरले होते. या संपूर्ण परिस्थितीत पाहता माजी आमदार सुजित मिणचेकर आहेत तरी कुठे? असा सवाल सामान्य कार्यकर्त्यांना देखील पडला होता.

त्यानंतर शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येताना हातकणंगले लोकसभा मतदारसंघात त्यांनी मेळावे घेतले. त्यावेळेस काही अंशी माजी आमदार सुचित मिणचेकर ठाकरे गटासोबत असल्याचे जाणवले. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना उमेदवारीवरून विरोध दर्शवल्यानंतर मुरलीधर जाधव यांना जिल्हाप्रमुख पदावरून तडकाफडकी हाकलपट्टी करण्यात आली.

या संपूर्ण प्रकारामागे माजी आमदार सुजित मिणचेकर, शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे, संपर्कप्रमुख अरुण भाई दूधवाडकर यांचा हात असल्याचा आरोप मुरलीधर जाधव यांनी केला होता. मुरलीधर जाधव यांच्या हकालपट्टीनंतर त्या ठिकाणी माजी आमदार सुजित मिणचेकर यांचे स्वीय सहाय्यक संजय चौगुले यांना जिल्हाप्रमुख करण्यात आले. त्यावरून मुरलीधर जाधव यांनी हे आरोप केले की काय अशा चर्चा देखील शिवसेनेच्या आतल्या गोठात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वास्तविक पाहता गेल्या पाच वर्षांपासून माजी आमदार सुजित मिणचेकर (Sujit Minchekar) शिवसेनेच्या कोणत्या आंदोलनात दिसले? अशी विचारण्याची वेळ कार्यकर्त्यांवर आली होती. हातकलंगले तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मुरलीधर जाधव यांनी हायजॅक करून जाणून-बुजून माजी आमदार मिणचेकर यांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करत होती का? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित होत आहे.

मिणचेकर नियोजनात आघाडीवर

नुकताच युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) हातकणंगले दौरा पार पडला. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार मिणचेकर नियोजनात आघाडीवर दिसले. हुपरी येथे झालेल्या मेळाव्यात माजी आमदार मिणचेकर यांची लगबग त्यांच्या हालचालीवरूनच दिसून येत होती. तर आज बिंदू चौकं येथे झालेल्या आंदोलनात माजी आमदार मिणचेकर यांची उपस्थिती लक्ष्यवेधी होती.

मुरलीधर जाधवांच्या हालचाली थांबल्यानंतर मिणचेकर सक्रिय

दरम्यान, हातकणंगले तालुक्यातील मुरलीधर जाधव यांनी हायजॅक केलेली शिवसेना ही माजी आमदार सुजित मिणचेकर यांना काढून घ्यायची होती का? असा सवाल त्यांचे स्वीय सहाय्यक संजय चौगुले यांना जिल्हाप्रमुख पद दिल्यानंतर उपस्थित होत आहे. पण मुरलीधर जाधव यांच्यां शिवसेनेतील हालचाली थांबल्यानंतर माजी आमदार मिणचेकर चांगलेच ऍक्टिव्ह झालेत हे नक्की.

(Edited by Sachin Wgahmare)

SCROLL FOR NEXT