Nana Patole
Nana Patole sarkarnama
कोल्हापूर

कोल्हापूरकरांनी जागा दाखवली; चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाण्याची तयारी करावी... नाना पटोले

सरकारनामा ब्युरो

मुंबई : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय हा महाराष्ट्र व देशाला दिशा देणारा आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीला धार्मिक रंग देणा-या व जनतेला ईडीची भिती दाखवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या भूमीतील स्वाभिमानी जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, ''कोल्हापूर ही राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची कर्मभूमी आहे. सामाजिक समतेच्या या भूमीत जाती धर्माचे विष कालवण्याचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांनी धार्मिक तेढ निर्माण करून मतांचा जोगवा मागण्याचा प्रयत्न केला. पण, कोल्हापुरच्या स्वाभिमानी जनतेने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करून जातीय द्वेष पसरवणाऱ्यांना सणसणीत चपराक दिली आहे.''

''आजच्या विजयाने पुरोगामी महाराष्ट्र कोणत्या दिशेने जाणार हेच दाखवून दिले आहे.'' आजच्या विजयाबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोल्हापूरच्या जनतेचे आभार मानले आहेत. ''देशात पेट्रोल, डिझेल, गॅस, जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड महागाई आहे, बेरोजगारी, शेतकरी, कामगारांचे प्रश्न आहेत. देशात ज्वलंत प्रश्न भेडसावत असताना केंद्र सरकारचे अपयश झाकण्यासाठी भाजपाने धार्मिक मुद्दे पुढे केले होते. परंतु महाविकास आघाडीच्या सरकारने केलेले काम व महाविकास आघाडीची ताकद यामुळे हा विजय सुकर झाला.''

''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारच्या कामावर या विजयाने शिक्कामोर्तब केले आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आधी कोल्हापूरातून पलायन केले होते. कोल्हापुरात पराभव झाला तर हिमालयात जाऊ असे ते म्हणाले होते आता त्यांनी पुण्यातून हिमालयात पलायन करावे,'' असा टोलाही पटोले यांनी लगावला.''

कोल्हापूर उत्तरच्या जनतेने दिलेला निकाल हा काँग्रेस पक्षाला उर्जा देणारा असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केलेल्या मेहनतीचे हे फळ असून सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केले. कोल्हापूरच्या विजयानंतर प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे फटाके फोडून, ढोल ताशाच्या गजरात जल्लोष करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT