Hasan Mushrif

 

sarkarnama

कोल्हापूर

दोन वर्षात शिवसेनेला भरभरुन दिले; तरी... : मुश्रीफांचा पलटवार

शिवसेनेला (ShivSena) भरभरुन दिले. जिल्हा परिषद, महानगरपालिका, गोकुळ ही त्याची उत्तम उदाहरणे आहे.

सरकारनामा ब्यूरो

गडहिंग्लज : "गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) घटक पक्ष म्हणुन शिवसेनेला (ShivSena) भरभरुन दिले. जिल्हा परिषद, महानगरपालिका, गोकुळ ही त्याची उत्तम उदाहरणे आहे. मात्र, केवळ एका जागेच्या स्वार्थासाठी शिवसेनेतील काहींच्या अट्टाहासामुळे कोल्हापुर जिल्हा बँकेवर निवडणुक (Kolhapur District Bank Election) लादली" असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी आज (ता. २५) येथे केला. ते छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीच्या प्रचार शुभारंभात बोलत होते. अत्यंत प्रतिकुल अवस्थेत जिल्हा बँक काटकसरीने चालवून आम्ही प्रगती पथावर नेल्याने मतदारांनी पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.

या वेळी आमदार प्रकाश आवाडे, विनय कोरे, राजेश पाटील, राजू आवळे, माजी राज्यमंत्री भरमु पाटील, बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील, माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, शिवसेनेचे संग्राम कुपेकर उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य सतीश पाटील यांनी स्वागत केले. भैय्या माने यांनी प्रास्ताविकात जिल्हा बँकेचा गेल्या पाच वर्षातील संख्यात्मक विकासाचा आढावा घेतला.

मुश्रीफ म्हणाले, "पाच वर्षापुर्वी जिल्हाची आर्थिक खिखर संस्था अडचणीत होती. मात्र, राजकीय भवितव्याचा विचार न करता शिस्त अंगिकारून बँकेत स्थैर्य आणले. नवी आव्हाने पेलण्यासाठी पक्षीय जोडे बँकेबाहेर काढून सर्वांना बरोबर घेत कारभार केला. मात्र, झालेला विरोध वेदनादायी आहे. शिवसेनेचे संख्यात्मक बळ कमी असतानाही सन्मानाने सर्वच सत्ता स्थानात सामावुन घेतले. आताही दोन जागा आणि स्वीकृत एक अशी तडजोड केली. असताना मांडलेला सवतासुभा आणि होणारी टोकाची टिका चुकीची आहे, असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

आमदार आवाडे म्हणाले, "रिझर्व्ह बॅंकेच्या निर्बंधामुळे जिल्हा बॅंकेसमोर आव्हाने आहेत. शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या सहकारातील मोठ्या आर्थिक संस्थेत एकसंघ विचारांचे संचालक मंडळ असावे, यासाठी आघाडीत सामील झालो. जिल्ह्याची रक्तवाहिनी असणारी केडीसी मुश्रीफ यांनी सक्षम केल्याने सभासदांनी शाहु आघाडीला कौल द्यावा. आमदार कोरे म्हणाले, जिल्ह्यातील चारही प्रमुख पक्षांना सामावुन घेत बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न केले. सगळ्याच पक्षात इच्छूकांची संख्या अधिक आहे. लोकशाहीत सर्वांचे समाधान अशक्य आहे. व्यक्तीगत राजकारण सहकारात बाजूला ठेवायला हवे. प्रशासकाचा कटु अनुभव लक्षात घेता मुश्रीफ यांच्या नेतुत्वाखाली बॅंक राहायला हवी.

आमदार राजेश पाटील म्हणाले, "टोकाचे मतभेद असणाऱ्या चडगंडने बिनविरोधचा नवा पायंडा पाडला. तो भविष्यात आजरा आणि गडहिंग्लजलाही पोहचेल. जिल्हा बँकेच्या कारभाऱ्यांनी गाड्या, सोई सुविधांचा त्याग करीत विश्वस्तासाठी आदर्श निर्माण केला. त्यामुळे सभासद नक्कीच पुन्हा विश्वास दाखवतील.'' संजय घाटगे म्हणाले, "आयुष्यभर जिल्हा बॅंकेच्या चुकीच्या धोरणाविरूध्द संघर्ष केला. मात्र, जिल्हा बँकेने विधायक दृष्टी ठेवत अन्नपुर्णा कारखान्याला सहकार्य केले. त्यासाठीच या विधायकतेला पाठींबा दिला.

के. पी. पाटील म्हणाले, त्यागाशिवाय कोणत्याच संस्था, व्यक्ती मोठ्या होत नाही. पाच वर्षापुर्वी याच भुमिकेतून मी आणि ए. वाय. पाटील यांनी राजीनामा दिला होता. पक्षांनी देखील हीच भूमिका ठेवायला हवी. सतीश पाटीलांनी नाउमेद होऊ नये." अमर चव्हाण यांनी मनोगतात गडहिंग्लज साखर कारखान्याला जिल्हा बँकेने सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी बिनविरोध निवड झालेल्या मुश्रीफ, पाटील, ए. वाय. पाटील यांचा सत्कार करण्यात आला. जयसिंग चव्हाण यांनी आघाडीच्या उमेदवारांचा परिचय करुन दिला. राजेश पाटील (औरनाळकर) यांनी आभार मानले. सुरेश दास यांनी सुत्रसंचालन केले.

मुश्रीफ यांनी भाषणात जिल्हा बॅंकेच्या सत्तेचे गणित उलगडून सांगितले. आता विकास संस्था गटातून आम्ही सहा संचालक बिनविरोध निवडून आलो आहोत. उर्वरित संस्था गटातही तुल्यबळ प्रतिस्पर्धी नसल्याने केवळ विजयाची औपचारिकता असल्याचे ते म्हणाले. तसेच इतर गटातही जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या नेत्यांनी पाठींबा दिल्याने आमचेच पारडे जड आहे. त्यामुळे सत्ता आमचीच राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT