Sharad Pawar Sarkarnama
कोल्हापूर

Shirol Takali MIDC : यड्रावकरांच्या ड्रीम प्रोजेक्टच्या विरोधात शरद पवार मैदानात, एमआयडीसीविरोधात आंदोलनकर्त्यांनी टाकला डाव!

Sharad Pawar Rajendra Patil-Yadravkar : प्रस्तावित एमआयडीसी लादण्याचा घाट आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप करत शिष्टमंडळ शरद पवार यांना भेटले.

Rahul Gadkar

Kolhapur News : शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथे प्रस्तावित एमआयडीसीला सर्वच क्षेत्रातून विरोध वाढत आहे. प्रस्तावित एमआयडीसी लादण्याचा घाट आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून घातला जात असल्याचा आरोप माजी सैनिकांसह ग्रामस्थांकडून होत आहे. अशातच आता या निर्णयाच्या विरोधात खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच मैदानात उतरल्याचे चित्र आहे. यड्रावकर व पवार कुटुंब यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे प्रस्तावित एमआयडीसीच्या विरोधात पवार यांची भेट घेत यड्रावकर यांना कोंडीत पकडण्याचा डाव आंदोलकांनी टाकला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळी गाव हे सैनिकांचे गाव म्हणून महाराष्ट्रासह देशभरात परिचित आहे. अशा गावातील नागरिकांच्या लोकभावनेचा विचार न करता प्रस्तावित एमआयडीसीचा घाट घातला जात असल्याने स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि विरोधी शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेत परिस्थितीची माहिती दिली.

शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळीतील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी उद्योगमंत्र्यांशी चर्चा करण्याचे आश्‍वासन शरद पवार यांनी यासंदर्भात भेटलेल्या कोल्हापुरातील शिष्टमंडळाला दिले, अशी माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी दिली.

सदर जमीन गायरान असून, ती गावाच्या लोकहितासाठी वापरावी, त्या ठिकाणी सैनिक शाळा आणि सैनिकांच्या हिताशी संबंधित विविध उपक्रम उभारावेत, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. स्थानिक नागरिकांच्या इच्छेविरुद्ध कोणत्याही प्रकारे प्रकल्प लादू नये, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली.

तसेच शिरोळ तालुक्यातील इतर एमआयडीसीची काय परिस्थिती आहे, त्याचा प्रथम आढावा घेणे आवश्यक आहे. एमआयडीसी उभारायचीच असल्यास ती किमान ५०० एकर क्षेत्रांत नियोजनबद्ध पद्धतीने उभारावी. विशेषतः टाकळी गावाचा मोठा भाग पावसाळ्यात पुराच्या पाण्याने वेढला जात असताना अशा ठिकाणी एमआयडीसी उभारण्याचा अट्टहास का केला जात आहे, असा सवालही शिष्टमंडळाने उपस्थित केला.

शरद पवारांचे आश्वासन

शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर लोकभावनेचा आदर केला जाईल आणि टाकळी एमआयडीसीचा प्रस्ताव रद्द करण्याबाबत उद्योगमंत्र्यांशी चर्चा करून योग्य ती भूमिका मांडली जाईल, असे आश्वासन पवार यांनी शिष्टमंडळाला दिले.

शिष्टमंडळात व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष माजी महापौर आर. के. पोवार, राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे, जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. अनिल घाटगे, शहर सरचिटणीस गणेश जाधव, प्रदेश सचिव सुनील बोगाळे उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT