

Sharad Pawar rejoined in Congress News: 8 डिसेंबर 1986. तेव्हाच्या औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचं मैदान खचाखच भरलं होतं. तब्बल 5 लाखांचा जनसमुदाय जमला होता. व्यासपीठावर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी उपस्थित होते. सोबत होते तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण, प्रदेशाध्यक्षा प्रभा राव, 'काँग्रेस'चे अखिल भारतीय सरचिटणीस जी. के. मूपण्णार, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला.
पंतप्रधानांसह ही सारी नेतेमंडळी एकत्र जमली होती शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेस या पक्षाच्या काँग्रेसमधील विलीनीकरणासाठी. रेड्डी-चव्हाण काँग्रेस, 1978 मध्ये राबवलेला पुलोदचा कार्यक्रम, काँग्रेस आणि त्यानंतर समाजवादी काँग्रेस असे सत्तेत जाण्याचे वेगवेगळे प्रयोग करून शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये परतत होते.
नेमका शरद पवार यांनी हा विलीनिकरणाचा निर्णय का घेतला? राजीव गांधी या विलीनिकरणासाठी का उपस्थित होते? या विलीनिकरणाचा शिवसेनेला कसा फायदा झाला? याच सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे.
1970 च्या दशकाच्या अखेरीस काँग्रेसमध्ये मोठे अंतर्गत संघर्ष सुरू होते. आणीबाणीनंतर देशभरात काँग्रेसची प्रतिमा मलिन झाली होती. काँग्रेस पक्षात आणीबाणी वादामुळे इंदिरा गांधी यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन इंदिरा काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर मूळ काँग्रेसचे नेतृत्व ब्रह्मानंद रेड्डी आणि यशवंतराव चव्हाण यांच्याकडे आले. याच चव्हाण-रेड्डी काँग्रेसमध्ये महाराष्ट्रातून तरुण आणि महत्त्वाकांक्षी नेते म्हणून शरद पवार पुढे आले होते. शरद पवार यांच्यासह यात वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक असे नेते होते. 1978 मधील निवडणुकीत चव्हाण-रेड्डी काँग्रेसला 69 जागा मिळाल्या, तर इंदिरा काँग्रेसला 62 जागा. निकालानंतर इंदिरा गांधी यांच्याच मध्यस्थीने दोन्ही काँग्रेसने एकत्र सरकार स्थापन केले.
नव्या सरकारमध्ये वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले. पण अंतर्गत कलहामुळे हे सरकार पाडण्याच्या हालचाली सुरु झाल्या. यात पुढाकार होता शरद पवार यांचा. 1978 मध्ये अधिवेशन सुरू असतानाच शरद पवार यांच्यासह सुशीलकुमार शिंदे, सुंदरराव सोळंके असे जवळपास 38 आमदार सरकारमधून बाहेर पडले. जनता दलाच्या पाठिंब्यावर शरद पवार यांच्या नेतृत्वातील पुरोगामी लोक दल अर्थात पुलोद सरकार सत्तेत आले.
1980 मध्ये केंद्रातील जनता दलाचे सरकार पडले. निवडणुकीनंतर इंदिरा गांधी यांचे पंतप्रधान म्हणून दमदार कमबॅक झाले. त्यांनी महाराष्ट्राची विधानसभा आणि पवारांचे सरकार बरखास्त केले. निवडणुकीनंतर महाराष्ट्रातही तब्बल 187 जागा जिंकून इंदिरा गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले. बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले मुख्यमंत्री झाले. तर शरद पवार विरोधी बाकांवर गेले. त्यांच्या काँग्रेसला 54 जागांवर विजय मिळाला.
केंद्रातील बदललेल्या राजकीय परिस्थितीने विरोधी पक्ष कमकुवत झाला होता. महाराष्ट्रात पवारांना 54 जागांवर यश मिळाले होते पण इतर राज्यांमध्ये विरोधी पक्षांचे पानीपत झाले होते. स्वतंत्र प्रादेशिक पक्षाचा प्रयोग टिकवणे कठीण झाले. यानंतरही पवारांनी विरोधी बाकांवरच बसणे पसंत केले. सरकार बरखास्तीपूर्वी इंदिरा गांधींनी पवारांना काँग्रेससोबत येण्याचा दिलेला प्रस्ताव त्यांनी धुडकवून लावला होता.
इंदिरा गांधींना विरोध करणाऱ्या या भूमिकेची शरद पवारांना मोठी राजकीय किंमत मोजवी लागली. खरी काँग्रेस कोणाची याचा कौल लोकांनी दिला आहे, असे म्हणत अर्स काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली. यशवंतराव चव्हाणही पुन्हा इंदिरा गांधी यांच्यासोबत जुळवून घ्यावे या मताचे होते आणि झालेही तसेच. तब्बल 48 आमदार शरद पवारांना सोडून पुन्हा काँग्रेसवासी झाले.
या दरम्यान, पवारांनी अर्स काँग्रेसची सूत्र हातात घेऊन समाजवादी काँग्रेस असे पक्षाचे नामकरण केले. 1980 नंतर देशाची सामाजिक परिस्थिती कमालीची अस्वस्थ बनली. देशात पंजाबमधील खलिस्तान वाद्यांचा असंतोष उफाळून आला. 1984 मध्ये या असंतोषाच्या लाटेत खुद्द पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा बळी गेला. इंदिरा गांधींचे वारसदार म्हणून राजीव गांधी यांच्याकडे काँग्रेस व पर्यायाने देशाची जबाबदारी येऊन पडली होती.
1984 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ऐतिहासिक जनमताने निवडून आली. सहानुभूतीच्या लाटेत काँग्रेसचे तब्बल 404 खासदार विजयी झाले. या सगळ्या आघातांमध्येही पवार हार न मानता विरोधी पक्षाची भूमिका पुढे नेत होते. त्यांच्यासह समाजवादी काँग्रेसचे ४ खासदार निवडून आले. शिवाय १९८५ च्या निवडणुकीत समाजवादी काँग्रेसचे 54 आमदार निवडून आले. स्वत: पवार हेही लोकसभेतून पुन्हा विधानसभेवर निवडून आले.
पण यानंतरच्या काळात पवारांना समाजवादी काँग्रेसलाही मर्यादित भौगोलिक आणि संघटनात्मक विस्तार ही अडचण जाणवू लागली. पंतप्रधान राजीव गांधी यांनीही पवारांना पुन्हा येण्याची साद घातली होती. हे सगळे राजकीय वास्तव आणि राष्ट्रीय स्तरावरील संधी लक्षात घेऊन शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा येण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामागे राष्ट्रीय राजकारणात प्रभाव वाढवण्याची गरज, काँग्रेसची वाढती ताकद आणि सत्तेची शक्यता, स्वतंत्र पक्ष म्हणून मर्यादित विस्तार ही प्रमुख कारणे होती. इथूनच पवारांच्या परतीची चर्चा पुन्हा सुरु झाली.
शरद पवार आपल्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात सांगतात, इंदिराजींच्या अंत्यसंस्कारावेळी मी दिल्लीला गेलो. त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन राजीव गांधी यांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्यापाशी गेलो. आईच्या क्रूर हत्येनं व्यथित झालेले, पंतप्रधानपदाची जबाबदारी अकाली अंगावर पडलेले राजीवजी त्याही स्थितीत शांत चित्ताने उभे होते. मी त्यांचा हात हातात घेऊन माझ्या संवेदना प्रकट केल्या. त्यावर त्यांनी, "शरद, काळ खूप नाजूक आहे. देशासाठी आपण एकत्र काम करायला हवं." असं म्हटलं. तो प्रसंग अधिक बोलण्याचा, विशेषतः राजकीय विषयावर बोलण्याचा तर मुळीच नव्हता. मी हलकेच त्यांचा हात दाबला आणि बाजूला झालो."
शरद पवार सांगतात की, 1984 ते 1985 मध्ये लोकसभेचे खासदार असताना त्यांचा राजीव गांधी यांच्यासोबत संवाद व्हायचा. राजीव गांधी यांची त्यांच्याबरोबर काम करावं, अशी त्यांची इच्छा होती. "हम सब एक उमर के लोग है, आप कबतक विपक्ष में बैठेंगे? मिलकर काम करना चाहिए" अशा शब्दा त्यांच्या भावना व्यक्त करायचे.
असे असले तरी शरद पवार यांनी आपला राजकीय मार्ग निश्चित केला होता. 'समाजवादी काँग्रेस'च्या राष्ट्रीय स्तरावरचं नेतृत्व त्यांच्याकडे होते आणि राज्यपातळीवर पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी महाराष्ट्र पालथा घालत होते. राजीव गांधी आणि शरद पवार यांची राजकीय वाट वेगळी असली, तरी त्या भेटीनं उभयतांच्या मनातलं मळभ दूर झालं होतं.
शरद पवार यांच्या पक्षाच्या काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या हालचाली सुरू असताना शंकरराव चव्हाणांसह अनेक नेत्यांचा थंड प्रतिसाद होता. त्यांना हा निर्णय अजिबात आवडला नव्हता. परंतु तो राजीव गांधी यांच्या पातळीवरच घेतला गेल्याने त्यांना उघड विरोध करता येत नव्हता. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रमिलाकाकी चव्हाण यांनीही "पवारांनी त्यांचं जेवण त्यांच्याच चुलीवर बनवावे" अशा शब्दात विरोध दर्शवला होता.
इंदिरा गांधींचे राजकीय सचिव पी. एन. धर यांचा मुलगा विजय हा राजीव गांधींच्या घनिष्ठ मित्रांपैकी एक होता. शरद पवारांचे त्यांच्याशी चांगले संबंध होते. त्यामुळे पवारांना 'काँग्रेस'मध्ये परतण्याविषयीच्या प्राथमिक बोलण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती. याशिवाय राजीव गांधी यांचे राजकीय सल्लागार अरुण नेहरु हेही शरद पवार यांच्याशी संवादात होते.
शरद पवार आपल्या आत्मचरित्रात सांगतात की, "हा संवाद सुरू होण्यापूर्वीच पक्षातल्या सहकाऱ्यांची मतं मी आजमावली होती. आपण मुख्य प्रवाहात जायला हवं, असा त्यांचाही सूर होता. राजीवजींची देहबोली आणि प्रत्यक्ष वागणूक अत्यंत मित्रत्वाची आणि कळकळीची होती. मुख्य प्रवाहात जावं अशी सकारात्मक मानसिकता आमचीही होती, शिवाय नॅशनल कॉन्फरन्सच्या फारूख अब्दुल्ला यांचाही प्रेमळ तगादा होता त्यामुळे अखेर आम्ही काँग्रेस मध्ये परतण्याचा निर्णय घेतला."
औरंगाबाद इथे 'समाजवादी काँग्रेस'चं इंदिरा काँग्रेसमध्ये विलीनीकरण झालं. 6 डिसेंबर ते 8 डिसेंबर असे 3 दिवस हा विलीनीकरण कार्यक्रम चालला. 8 डिसेंबर रोजीच्या मुख्य सभेला 5 लाखांचा जन समुदाय लोटला. पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासह शंकरराव चव्हाण, प्रदेशाध्यक्षा प्रभा राव, 'काँग्रेस'चे अखिल भारतीय सरचिटणीस जी. के. मूपण्णार, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला आदी मंडळी उपस्थित होती.
एखाद्या पक्षाच्या विलीनिकरणासाठी पंतप्रधानांनी उपस्थित राहणं लक्षणीय होतं. 'शरद पवार यांचा आपण सन्मानाने पक्षात पुनर्प्रवेश करून घेतो आहोत,' हा संदेश राजीव गांधी यांना द्यायचा असल्यामुळेच ते या सोहळ्याला उपस्थित राहिले. विलीनिकरणानंतर शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये प्रभावी नेते म्हणून उदयास आले. त्यांची राजकीय उंची अधिक वाढली. 1988 मध्ये पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
1991 मध्ये पीव्ही नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री बनले. काँग्रेसमधील राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख नेते म्हणून उदयास आले. यातून एक गोष्ट स्पष्ट होते पवारांचे राजकारण नेहमीच व्यवहारवादी आणि संधीसाधू नव्हे तर परिस्थितीचा अचूक अंदाज घेणारे राहिले. 1986 चे विलीनीकरण हा केवळ भावनिक निर्णय नव्हता तर तो दीर्घकालीन सत्तेच्या गणिताचा भाग होता.
इथे आणखी एका प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे आहे, तो म्हणजे हा कार्यक्रम औरंगाबाद इथेच का झाला? तर राजीव गांधी यांचे राजकीय सल्लागार अरुण नेहरू यांच्या मते, शरद पवारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर आज काँग्रेस विरोध म्हणून शरद पवारांसोबत असणारा मराठवाड्यातील तरुण मोठ्या प्रमाणात शिवसेनेकडे आकर्षित होईल. शरद पवारांचा हा प्रवेश शिवसेनेच्या मराठवाड्यात पाय रोवण्यास कारणीभूत ठरेल.
अरुण नेहरू हे उत्तम विश्लेषक असल्याने शरद पवारांनी प्रथमत: मराठवाडा पिंजून काढण्याचं मनावर घेतलं. त्यांनी मराठवाड्यातला प्रत्येक तालुका, प्रत्येक गाव पिंजून काढलं. संवाद साधला आणि काँग्रेस प्रवेशाबद्दलच वातावरण तापवलं. ते योग्य असल्याचं लोकांमध्ये जावून पटवून देण्यास सुरूवात केली. यामुळेच पवारांनी औरंगाबाद इथे कार्यक्रम घेण्याचे ठरवले.
पण शरद पवारांचा हा प्रवेश खरंच शिवसेना मराठवाड्यात पाय रोवण्यास मदत करणारा ठरला का याबद्दल त्यांनी स्वतःच सांगितले आहे. ते म्हणतात, "पक्षाच्या विलीनिकरणानंतर मी परभणीला गेलो होतो. तिथे जयप्रकाश मुंदडा कुठे आहेत? याची चौकशी केली. जयप्रकाश मुंदडा हे समाजवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. पण आत्ता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती मिळाली. याबाबत मुंदडा यांना कारण विचारलं तेव्हा मुंदडा म्हणाले, आमचं राजकारण इथल्या प्रस्थापितांना विरोध केल्यामुळे उभं राहिलं. आत्ता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो तर आमच्या संपूर्ण राजकारणाचा इतिश्री होईल, असं स्पष्ट केलं. मराठवाड्यात जागोजागी असेच घडले. 1988 मध्ये औरंगाबाद महापालिका निवडणुकीत प्रथमच शिवसेनेला पूर्ण सत्ता मिळाली."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.