Shivsena UBT | Karnataka Congress Sarkarnama
महाराष्ट्र निवडणूक

Shivsena UBT : मुंबई केंद्रशासित करा! काँग्रेस आमदाराने विधानसभेत तोडले अकलेचे तारे, ठाकरेंची शिवसेना कडाडली

Aaditya Thackeray on Laxman Savadi : "काँग्रेस किंवा भाजपच्या नेत्यांनी बेळगाव (Belgaum) किंवा महाराष्ट्राचा अपमान केल्यास ते सहन केलं जाणार नाही. मुंबईला केंद्रशासित करण्याचा विषय बोलणाऱ्या आमदाराला बरखास्त करायला पाहिजे. त्या आमदाराला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी समज द्यायला पाहिजे."

Jagdish Patil

Mumbai News, 19 Dec : कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी मुंबई संदर्भात एक धक्कादायक मागणी केली आहे. कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात बोलताना लक्ष्मण सवदी यांनी, "महाराष्ट्रातील नेते बेळगावसह सीमाभाग केंद्रशासित करण्याची मागणी करत असतील तर आपणही मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केली पाहिजे" असं वक्तव्य केलं आहे.

सवदी यांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापलं आहे. याच प्रकरणावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या युवसेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) या काँग्रेस आमदाराला थेट बरखास्त करण्याची मागणी केली आहे. तर काँग्रेस आमदर लक्ष्मण सवदी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरून ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत.

आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?

या सर्व प्रकरणावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, "काँग्रेस किंवा भाजपच्या नेत्यांनी बेळगाव किंवा महाराष्ट्राचा अपमान केल्यास ते सहन केलं जाणार नाही. मुंबईला केंद्रशासित करण्याचा विषय बोलणाऱ्या आमदाराला बरखास्त करायला पाहिजे. त्या आमदाराला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी समज द्यायला पाहिजे.

जे महाराष्ट्रातील काँग्रेस (Congress) आमदारांचे म्हणणं आहे, तेच आमचं म्हणणं आहे. आम्ही रक्त सांडून मुंबई मिळवली आहे. त्यामुळे मुंबई केंद्रशासित करण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असं म्हणतच त्यांनी बेळगाव केंद्रशासित झालाच पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी तसं जाहीर करावं असंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

नेमकं काय प्रकरण?

मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्र एकीकरण समितीकडून बेळगावच्या सीमावर्ती भागाला केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा, अशी मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. यावर कर्नाटकातील काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश करावा अशी मागणी केली आहे. ते म्हणाले, "कर्नाटकाचा अविभाज्य अंग असलेला बेळगाव सीमाभाग केंद्रशासित करायचा असेल तर मुंबई (Mumbai) देखील केंद्रशासित करावी अशी मागणी आपण केली पाहिजे."

महाराष्ट्र काँग्रेसची भूमिका काय?

तर कर्नाटकातील आमदाराच्या वक्तव्यावर आता महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. काँग्रेस नेते आणि विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुंबई केंद्रशासित होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही, असं म्हटलं आहे. वडेट्टीवार म्हणाले, "आम्ही मुंबईसाठी रक्त सांडले आहे, बलिदान दिले आहे.

त्यामुळे मुंबई केंद्रशासित कधीच होऊ शकत नाही. मराठी माणसाचा बेळगावमध्ये प्रश्न आहे आणि त्यामुळे बेळगाव केंद्रशासित व्हावा अशी आमची मागणी आहे. कर्नाटकमधले काँग्रेसचे आमदार काही बोलत असतील तर त्यांच्या राज्यासाठी ते भूमिका मांडत असतील. मात्र, महाराष्ट्रातील काँग्रेसची ही भूमिका नाही. कोणी काहीही बोललं तरी मुंबई कधीच केंद्रशासित होणार नाही, असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT