Assembly Election Voting Sarkarnama
महाराष्ट्र निवडणूक

The Power of One Vote : जेव्हा एका मतानं झाला होता दोघांचा पराभव...

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 The Power of One Vote: कर्नाटक आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत दोन उमेदवारांचा विजय केवळ एका मतानं हुकला होता. कर्नाटक विधानसभेच्या 2004 च्या निवडणुकीत एका उमेदवाराचा केवळ एका मतानं पराभव झाला होता.

अय्यूब कादरी

निवडणुकीत एकेका मताला मोठं महत्व असतं. त्यामुळं राजकीय पक्षांचे कार्यकर्ते झाडून मतदान करवून घेण्याचा प्रयत्न करत असतात. जास्तीत जास्त लोकांना घरांच्या बाहेर काढून मतदान केंद्रांपर्यंत पोहोटवण्याची धडपड करतात. निवडणूक आयोग आणि काही सामाजिक संस्थांकडूनही मतदानाबाबत जनजागृती केली जाते.

निवडणुकीच्या निकालांबाबत सर्वांनाच उत्सुकता असते. निसटता पराभव झाला की हळहळ व्यक्त केली जाते. निसटता म्हणचे एक-दोन हजार मतांनी किंवा त्यापेक्षा कमी मतांनी झालेला पराभव, असं मानलं जातं. मात्र एका मतानं निवडणूक हारली तर त्या उमेदवाराची स्थिती काय होईल? तुम्ही विश्वास ठेवा अगर न ठेवा, विधानसभा निवडणुकांमध्ये दोनवेळा असं झालं आहे की उमेदवार केवळ आणि केवळ एका मतानं पराभूत झालेले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत दोन उमेदवारांचा केवळ 9 मतांनी विजय झालेला आहे.

कर्नाटक विधानसभेच्या 2004 च्या निवडणुकीत एका उमेदवाराचा केवळ एका मतानं पराभव झाला होता. त्यांचं नाव ए. आर. कृष्णमूर्ती. त्यांनी जनता दलाच्या (धर्मनिरपेक्ष) उमेदवारीवर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या संथेमारहल्ली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. कृष्णमूर्ती यांना 40,751 मतं पडली. त्यांच्याविरोधात काँग्रेसने आर. ध्रुवनारायण यांना उमेदवारी दिली होती. त्यांना 40,752 मतं मिळाली होती. अशा पद्धतीनं कृष्णमूर्ती यांचा केवळ एका मतानं पराभव झाला होता.

अशी दुसरी घटना राजस्थानमध्ये 2008 च्या विधानसभा निवडणुकीत घडली होती. काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष सी. पी. जोशी यांच्या वाट्याला तसा प्रसंग आला होता. राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा विधानसभा मतदारसंघातून जोशी यांनी निवडणूक लढवली होती. भाजपने त्यांच्या विरौधात कल्याणसिंह चौहान यांना उमेदवारी दिली होती. चौहान यांना 62,216 मते मिळाली, तर सी. पी. जोशी यांना 62,215 मते मिळाली होती. जोशी यांच्या मागणीनुसार दोनवेळा मतांची फेरमोजणी करण्यात आली, मात्र त्यांचा केवळ एका मतानं झालेला पराभव कायम राहिला.

जोशी हे त्यावेळी काँग्रेसचे राजस्थान प्रदेशाध्यक्ष होते. ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीततही होते. त्यामुळे हा पराभव त्यांच्यासाठी धक्कादायक होता. 2008 मध्ये राजस्थानात काँग्रेसला बहुमत मिळालं होतं. प्रदेशाध्यक्ष म्हणून सी. पी. जोशी यांनी आपल्या पक्षाला सत्ता मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती, मात्र ते स्वतः पराभूत झाले होते, तेही केवळ एका मतानं.

कृष्णमूर्ती आणि सी. पी. जोशी यांच्या एका मताच्या पराभवामागील कारणेही रंजक आहेत. अनेक लोकांना असं वाटत असते की आपल्या एका मतानं काय फरक पडतो. ही दोन उदाहारणे पाहिली तर एकेका मताचं महत्व लक्षात येऊ शकतं. एका मतानं काय फरक पडतो, अशा हलगर्जीपणाचा फटका कृष्णमूर्ती यांना बसला होता.

कृष्णमूर्ती यांच्या कारचा चालक त्या निवडणुकीत मतदान करू शकला नव्हता. यासाठी स्वतः कृष्णमूर्तीच कारणीभूत ठरले होते. मतदान करण्यासाठी त्यांच्या चालकाला वेळच मिळाला नव्हता. कृष्णमूर्ती यांनी त्याला मतदानासाठी कामावरून ब्रेक दिला नव्हता. दिवसभर त्याला कारवरच राहावं लागलं होतं. त्यामुळं त्याला मतदान करता आलं नव्हतं.

सी. पी. जोशी यांच्याबाबतही रंजक किस्सा सांगितला जातो. सी. पी. जोशी यांच्या मातुःश्री, पत्नी, कन्या आणि त्यांचा कारचालक मतदान करू शकले नव्हते. याबाबत असं सांगितले जातं, की जोशी यांच्या पत्नी, कन्या आणि मातुःश्री या मंदिरात गेल्या होत्या. जोशी यांच्या विजयासाठी त्यांनी तेथे दिवसभर पूजा-अर्चा केली. मतदानासाठी ते निघाले पण वाहतूक कोंडीत अडकले. त्यामुळे वेळेच्या आत मतदान केंद्रांवर त्यांना पोहाचता आलं नव्हतं. जोशी यांचा एका मतानं पराभव झाला आणि त्यांच्या मातुःश्री, पत्नी, कन्या, चालक मतदान करू शकले नव्हते. एका मताचे महत्व किती असते, हे यावरून अधोरेखित होते.

एमबीए आणि तत्सम व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यायलयांत सी. पी. जोशी यांच्यासोबत घडलेला हा प्रकार मुद्दाम सांगितला जातो. आधी कर्तव्य पार पाडायचं, असा संदेश जोशी यांच्या पराभवानं दिला आहे. त्यांच्या पत्नी, मातुःश्री आणि कन्या यांनी आधी मतदान करून मग मंदिरात पूजा-अर्चा केली असती तर... तर जोशी नक्कीच विजयी झाले असते.

हा पराभव जोशी यांच्यासाठी मोठा धक्का होता. त्यामुळं त्यांनी त्या विरोधात न्यायालयाचं दार ठोठावलं. विजयी उमेदवार चौहान यांच्या पत्नीनं दोन केंद्रांवर मतदान केलं होतं, असा आक्षेप त्यांनी न्यायालयात नोंदवला होता. राजस्थान उच्च न्यायालयानं जोशी यांच्या बाजूने निकाल दिला, मात्र त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध चौहान यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयानं चव्हाण यांच्या बाजूनं निकाल दिला आणि जोशी यांच्या पराभवावर शिक्कामोर्तब झालं.

मिझोराम विधानसभा निवडणुकीतील उदाहरण तर अलीकडचेच आहे. मिझोराम विधानसभेच्या 2018 च्या निवडणुकीत अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या तुईवाल मतदारसंघातून मिझो नॅशनल फ्रंटचे (एमएनएफ) लालचंदम्मा राल्ते हे फक्त तीन मतांनी विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे आमदार आर. एल. पियानमाविआ यांचा पराभव केला होता. लालचंदमा यांना 5207 तर पियानमाविआ यांना 5204 मते मिळाली होती. पियानमाविआ यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती. त्यानुसार ती करण्यात आली, मात्र त्यांच्या पराभवातील तीन मतांमध्ये काहीही फरक पडला नव्हता.

लोकसभा निवडणुकीतही अत्यंत कमी मतांच्या फरकानं उमेदवार पराभूत झाल्याचे प्रकार दोनवेळेस घडले आहेत. आंध्र प्रदेशातील अनकापल्ले मतदारसंघात 1989 च्या निवडणुकीत काँग्रेसचे कोनाथला रामकृष्णा हे केवळ 9 मतांनी विजयी झाले होते. त्यांनी तेलुगू देसम पक्षाचे अप्पाला नरसिंम्हम यांचा पराभव केला होता. रामकृष्णा यांना 2,99,109 तर नरसिंम्हम यांना 2,99,100 मतं मिळाली होती. दोघांनाही मिळालेल्या मतांची टक्केवारी प्रत्येकी 45.4 इतकी होती.

लोकसभा निवडणुकीत अत्यंत कमी मतांनी विजयी होण्याचा दुसरा निकाल 1998 मध्ये बिहारमध्ये लागला होता. यावेळीही जय-पराजयातील मतांचं अंतर केवळ 9 इतकंच होतं. राजमहल लोकसभा मतदारसंघात भाजपचे सोम मरांडी आणि काँग्रेसचे थॉमस हंसदा यांच्यात लढत झाली होती. सोम मरांडी यांना 1,98,889 मतं मिळाली होती तर थॉमस हंसदा यांना 1,98,880 मतं मिळाली होती. झारखंड मुक्ती मोर्चाचे सिमॉन मरांडी यांना 1,50,104 मतं मिळाली. पुढं 2000 मध्ये झारखंड राज्याची निर्मिती झाली. आता राजमहल लोकसभा मतदारसंघ झारखंड राज्यात आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीतही एका उमेदवाराचा फक्त 36 मतांनी पराभव झाला होता. लडाख लोकसभा मतदारसंघातून भाजपचे थुपस्टन छेवांग यांना 31,111 मतं मिळाली होती. त्यांची लढत अपक्ष उमेदवारांसोबत झाली होती. अपक्ष उमेदवार गुलाम रझा 31,075 मतं मिळाली. अन्य एक अपक्ष उमेदवार सय्यद मोहम्मद काझीम यांना 28,234 मतं मिळाली होती. काँग्रेसचे सेरिंग सॅम्फेल हे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यांना 26,402 मतं मिळाली होती.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातही नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. शिवसेनेचे रवींद्र वायकर हे केवळ 48 मतांनी विजयी झाले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा पराभव झाला होता. अत्यंत चुरशीच्या या लढतीत शेवटच्या फेरीपर्यंत कीर्तिकर हे एका मतानं आघाडीवर होते. पोस्टल मतांच्या फेरमतमोजणीत मात्र त्यांचा 48 मतांनी पराभव झाला. या निकालावरून बरेच वादविवाद, आरोप-प्रत्यारोप झाले होते. काँग्रेसचे दिवंगत दिग्गज नेते, राज्याचे माजीमंत्री पंतगराव कदम यांचा 1986 च्या विधानसभा निवडणुकीत 86 पोस्टल मतांनी पराभव झाला होता.

अटलबिहारी वाजपेयी यांचं केंद्रातील सरकारही केवळ एका मतानं पडलं होतं. अटलजी यांच्या नेतृत्वाखाली 1999 मध्ये केंद्रात भाजपचं सरकार स्थापन झालं होतं. अनेक पक्षांच्या पाठिंब्याच्या कुबड्या या सरकारला घ्याव्या लागल्या होत्या. एआयएडीएमके या पक्षानं सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यामुळं अटलजींना अविश्वास प्रस्तावाचा सामना करावा लागला होता. अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आलं. सरकारच्या बाजूने 269 तर विरोधात 270 मतं पडली होती. त्यामुळं अटलजींचं सरकार कोसळलं होतं. लोकशाहीत प्रत्येक मताला महत्व असतं. एका मतानं काही फरक पडत नाही, असं म्हणणं बेजबाबदारपणाचं लक्षणच म्हणावं लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT