ZP Election Result 
महाराष्ट्र

12 Zilla Parishad Results: ग्रामीण महाराष्ट्रातही महायुतीची 'घोडदौड'; अजित ‘दादां’च्या निधनानंतर राष्ट्रवादीला सहानुभूती

राज्याच्या सत्तेची खरी चाचपणी समजल्या जाणाऱ्या मिनी मंत्रालय अर्थात १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीत ग्रामीण मतदारांनी सत्ताधारी महायुतीच्या पारड्यात भरघोस दान टाकले आहे.

सदानंद पाटील

12 Zilla Parishad Results: राज्याच्या सत्तेची खरी चाचपणी समजल्या जाणाऱ्या मिनी मंत्रालय अर्थात १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीत ग्रामीण मतदारांनी सत्ताधारी महायुतीच्या पारड्यात भरघोस दान टाकले आहे. भारतीय जनता पक्षाने आपला 'नंबर वन'चा दर्जा राखला असला, तरी या निवडणुकीचे खरे आकर्षण ठरली ती राष्ट्रवादी काँग्रेस. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर झालेल्या या पहिल्याच मोठ्या निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मतदारांनी राष्ट्रवादीला (अजित पवार गट) मोठी सहानभूती दिल्याचे निकालांवरून स्पष्ट होत आहे.

जानेवारी २०२६ मध्ये अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक पार पडली. पुण्यासारख्या महत्त्वाच्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने मिळवलेली एकहाती सत्ता ही 'दादां'ना मतदारांनी दिलेली आदरांजलीच असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने दाखवलेला समन्वय आगामी राजकारणाच्या पार्श्वभूमीवर निर्णायक राहण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या निधनानंतर हा पक्ष विखुरला जाईल, हा कयास मतदारांनी तूर्तास फोल ठरवला आहे.

कोकणात ‘धनुष्यबाण’ जोरात; रायगडमध्ये शेकापला घरघर

कोकण किनारपट्टीवरील राजकीय समीकरण आता बदलत आहे, हे या निकालांनी दाखवून दिले आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये महायुतीने निर्णायक मुसंडी मारताना विरोधकांचे अक्षरशः पानिपत केले आहे. रत्नागिरीत उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिंदे यांच्या शिवसेनेने, तर सिंधुदुर्गात राणे कुटुंबाने भाजपचा गड अभेद्य राखला आहे. रायगडमध्ये मात्र धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. एकेकाळी या जिल्ह्यावर निर्विवाद सत्ता गाजवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाची (शेकाप) मोठी पिछेहाट झाली असून, तिथे तटकरे आणि शिंदे गटाने आपली पकड घट्ट केली आहे.

मराठवाड्यात आरक्षणाचा 'अदृश्य' प्रभाव

छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांत आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेले होते. त्याचे प्रतिबिंब निकालात उमटले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने आपली मांड पक्की केली असली, तरी परभणी आणि धाराशिवमध्ये अनेक ठिकाणी काटा लढती पाहायला मिळाल्या. लातूरमध्ये अमित देशमुखांनी दिलेल्या कडव्या झुंजीमुळे भाजपला सत्ता राखताना घाम फुटला आहे.

कार्यकर्ते उपरे, वारसदार सरस!

ही निवडणूक 'कार्यकर्त्यांची' असल्याचे ढोल सर्वच पक्षांनी बडवले असले, तरी उमेदवारी देताना मात्र 'नेत्यांच्या घरची' मंडळीच आघाडीवर होती. संस्कृती सातपुते (भाजप), विकास गोगावले (शिंदे सेना), अर्चना पाटील (भाजप), विवेक वळसे पाटील (राष्ट्रवादी) आणि अंकिता पाटील (राष्ट्रवादी) यांसारख्या किमान दोन डझन आजी माजी आमदारांच्या वारसदारांनी विजय मिळवत जिल्हा परिषदेत प्रवेश केला आहे. या घराणेशाहीमुळे पक्षातील निष्ठवंत कार्यकर्त्यांमध्ये सुप्त नाराजी असून, त्याचा परिणाम पुढील निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT