Mumbai News: केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या 51 हजार 560 जल जीवन मिशन योजनांपैकी 25 हजार 61 योजना अपूर्णावस्थेत असून निधीअभावी योजनांच्या प्रगतीवर विपरीत परिणाम होत असल्याची कबुली पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी शनिवारी (ता.28) विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, जल जीवन मिशन योजनेच्या कामात कसूर करणाऱ्या 142 कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात आले असून दोषी कंत्राटदारांकडून 79 कोटी 17 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय कामाची गती राखण्यात अपयशी ठरलेल्या 355 कंत्राटदारांचे काम रद्द करण्यात आल्याची माहितीही पाटील यांनी उत्तरात दिली आहे.
काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी आज विधानसभेत राज्यातील जल जीवन मिशन योजेनची कामे अपूर्ण असल्याबाबत तारांकित प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरात पाटील यांनी आतापर्यंत 26 हजार 499 योजनांची कामे पूर्ण झाल्याचे नमूद केले आहे.
जल जीवन मिशन योजनेसाठी ऑक्टोबर 2024 पासून केंद्र सरकारचा आर्थिक हिस्सा मिळाले नसल्याने राज्य सरकारने विशेष बाब म्हणून सन 2024-25 आणि 2025-26 या आर्थिक वर्षात 4 हजार 831 कोटी 87 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.
जल जीवन मिशन योजनेच्या 246 प्रकरणांमध्ये प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थांना तसेच 7 प्रकरणात त्रयस्थ तपासणी यंत्रणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याशिवाय 423 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून 7 अधिकऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने जल जीवन मिशनचा कालावधी अतिरिक्त निधीसह डिसेंबर २०२८ पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सर्व योजनांची कामे डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे पाटील यांनी उत्तरात स्पष्ट केले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र्र जीवन प्राधिकरण मंडळ नाशिक अंतर्गत 37 पैकी 17 योजना कार्यान्वित झाल्या आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यात एकूण 182 नळ पाणी पुरवठा योजना मंजूर असून या सर्व योजना विविध स्तरावर प्रगतीपथावर असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.