मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या जितेन गजारिया याला अटक करण्यात आली आहे. जितेन हा भाजपच्या आयटी सेलचा प्रमुख असल्याचं सांगितले जात आहे. मात्र आता या प्रकरणात तो राहिला बाजूला आणि राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात जोरदार जुंपली आहे.
गजारिया याने केलेल्या ट्विटमध्ये रश्मी ठाकरे यांची तुलना राबडीदेवींशी केली होती. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवला होता. मात्र, हा निषेध नोंदवताना त्यांनी त्यात अमृता फडणवीस यांनाही ओढले. रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली हे बरे झाले. फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली असती तर डान्सिंग डॉल अशी प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाही, हेच मला भाजपला सांगावे वाटते, असे विधान विद्या चव्हाण यांनी केले होते.
विद्या चव्हाण यांच्या याच विधानावर आक्षेप घेत अमृता फडणवीस यांनी त्यांना थेट आब्रुनुकसानीची नोटीस पाठवली. तसेच ही नोटीस ट्विट करत जोरदार टीकाही केली आहे. अमृता फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, आपल्याच सूनेच्या आणि पुरोगामी स्त्रियांच्या चारित्र्याचा जी करते अपमान, ती आहे राष्ट्रवादी नेता विद्याहीन चव्हाण, आता कोर्टातच जाऊन साफ करावी लागेल, तिने पसरविलेली सगळी विषारी घाण ! विद्या चव्हाण मानहानी नोटीस वाच आणि सुधार स्वतः ला, मगच मिळेल तुला निर्वाण!
यावर विद्या चव्हाण यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या, मला कोणतीही नोटीस मिळालेली नाही, आणि मिळाली तरी त्यातुन व्यतित होण्याची गरज नाही. तसंच डान्सिंग डॉलवर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, डान्सिंग डॉल हा काही वाईट शब्द नाही, डॉल म्हणजे बाहुली आणि बाहुली किती गोड डान्स करते याच्यात काही वाईट वाटण्याची गरज नाही. विद्या चव्हाण यांनी यावेळी अमृता फडणवीस यांच्यावर बुली बाई अॅपवरुन महिलांसाठीही बोली लावल्याचा आरोप केला. त्याचबरोबर भाजपच्या नेत्यांना माझ्या कौटुंबिक विषयावर बोलण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.