Aamdar Nivas in Mumbai becomes the center of controversy involving Ajanta Caterers, leaked videos, and political allegations Sarkarnama
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजब ‘संजय’लीला! तिन्ही एकत्र आले तेव्हा रंगलेला सं‘वाद’...

Shiv Sena MLA Sanjay Shirsat’s Bedroom Video Leak: धूर’ सोडत असताना त्यांच्या ब्यागेतील नोटाच कॅमेऱ्यात टिपून कुणीतरी सार्वजनिक केल्या अन् चांगलाच धूर काढला. भांडुपच्या भोंगेवाल्यांनी भोंग्यावरून ही बातमी जगाला दिली.

सरकारनामा ब्यूरो

अभय नरहर जोशी

सध्या राजकारण ‘संजय’नामक राजकारण्यांनी ढवळून टाकले आहे. कँटीनचे वरण आंबूस झाल्याने तीळपापड होऊन एकाने कॅंटीनवाल्याची कढी पातळ केली. दुसरे घरात जरा आरामात ‘धूर’ सोडत असताना त्यांच्या ब्यागेतील नोटाच कॅमेऱ्यात टिपून कुणीतरी सार्वजनिक केल्या अन् चांगलाच धूर काढला. भांडुपच्या भोंगेवाल्यांनी भोंग्यावरून ही बातमी जगाला दिली. या पार्श्वभूमीवर हे तिन्ही संजय एकत्र आले तेव्हा रंगलेला सं‘वाद’..

भांडुप भोंगेवाले : अरे काय रे हे. या क्षुल्लक कारणासाठी त्या कॅंटिनवाल्याला तू नॉकाऊट केलंस....असं मारायचं?

कॅंटीन मुष्टियोद्धा : माझं काय चुकलं? आमच्याकडं असंच करतात. चुकीला माफी नाही. आमची वरण-भाताची गोडी त्यांनी घालवली. त्या दिवशी चांगली भूक लागली होती. म्हणून जेवण मागवलं. तर विटकं वरण क्यांटिनवाल्यानं पाठवलं. वीटच घालणार होतो डोक्यात पण त्यावेळी हातात विटक्या वरणाशिवाय काहीच नव्हतं. मग काय जरा हात साफ केला. आम्ही तसे खानदानी मुष्टियोद्धे. आमच्या वागण्यात, बोलण्यात थोडं तरी उतरणारच. त्यात आम्ही सैनिक. मग काय दिसला की हानला. पण आपण काय मस्त ठोसे मारले ना...दोन-तीनच मारले पण सॉलिड होते की नाय?

भोंगेवाले भांडुपकर : या पुरोगामी महाराष्ट्राची ही परंपरा आहे का? हा नतद्रष्टपणा आहे. हे गद्दारीचं लक्षण आहे.

कॅंटीन मुष्टियोद्धा : यात कसली आलीये गद्दारी. अहो तुम्ही पुरोगाम्यांच्या वळचणीला गेलात. पण मीच खरा कडवट सैनिक आहे. आम्ही हेच धडे शिकलोत आयुष्यभर. आता तुम्हाला महाराष्ट्र पुरोगामी दिसायला लागलाय का...कुठे गेला तुमचा ‘रोखठोक’पणा? चुकीला माफी नाही. ठोकून काढणे हे आमचे परमकर्तव्य आहे. वादा आपला पक्का. पुरेल एकच बुक्का. असंच अजून झालं तर अजून मारीन.

भोंगेवाले भांडुपकर : अरे पण मारण्याआधी काही विचार तरी करायचा परिणामांचा? काही विवेक आहे की नाही?

कॅंटीन मुष्टियोद्धा : हा विवेक काय असतो बुवा. अन् विचारांचं म्हणाल तर आम्हीही विचार करतोच. फक्त मारल्यानंतर विचार करू लागतो. म्हंजे विचारात पडावंच लागतं.

‘बॅग’धारक धूम्रपानवाले : अहो, भोंगेवाले आम्ही काय केलं होतं राव?

भोंगेवाले भांडुपकर : अहो अनैतिक वागता अन् आम्ही काय केलं विचारता परत तोंड वर करून.

‘बॅग’धारक धूम्रपानवाले : अहो माझ्या खोलीत बसलो होतो निवांत. थोडंही रिलॅक्स व्हायचं की नाही? थोडा ‘धूर’ सोडत बसलो तर तुम्ही केवढा धूर केलात? काही खासगीपणा आहे की नाही?

भोंगेवाले भांडुपकर : अहो तुम्ही कसेही बसा पण त्या तुमच्या ब्यागेतून पैसे ओसंडून वाहत असल्याचं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं, त्याचा खुलासा करा ना... ‘

बॅग’धारक धूम्रपानवाले : तुम्हाला ‘ब्यागा’ अन् ‘खोकी’च दिसताहेत. तेवढं नोटांचं बंडल बाहेर दिसलं. ब्यागेच्या आत मात्र कपडे होते माझे. समाजकल्याणासाठी पैसे लागतात म्हणून वर काढून ठेवले होते थोडे पैसे. तुम्हाला काय कळणार म्हणा? तुम्हाला जिथे तिथे पैसेच दिसतात म्हणा...

भोंगेवाले भांडुपकर : उभ्या महाराष्ट्राला दिसलंय आता. तुमचे बनियनधारी रूपही अन् तुमचे कारनामेही. आता हा महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवेल. आधी मुंबई महापालिकेत तुम्हाला धडा शिकवला जाईल...

‘बॅग’धारक धूम्रपानवाले : माझ्यासारख्या निष्कलंक चारित्र्यवान व्यक्तिमत्त्वावर किती चिखलफेक कराल? सारखे माझ्याच मागे हात धुवून लागला आहात? अहो आम्ही खरे ‘समाजकल्याण’ करणारे आहोत...समाजकल्याणासाठीच्या पैशांवर आक्षेप घेता, कुठे फेडाल ही पापं?

भोंगेवाले भांडुपकर : पापं तर तुम्ही करून ठेवलीत गद्दारी करून. अलीबाबा अन् चाळीस चोर सुरतमार्गे गुवाहाटीला पळून गेलात अन् आमचं मेटाकुटीनं आणलेलं सरकार तुम्ही पाडलंत ‘खोकी’ घेऊन. आता त्या ‘खोक्या’तील पैसे बाहेर पडतायत. लोकांना दिसू लागलेतय

‘बॅग’धारक धूम्रपानवाले : गद्दारी तर तुम्ही केली हिंदुत्वाशी. ढोंगी धर्मनिरपेक्ष झालात. आमचं सरकार सामान्यांचं सरकार आहे. गरिबांचं सरकार आहे. दीनदुबळ्यांचं सरकार आहे.

भोंगेवाले भांडुपकर : तुमचं सरकार केव्हाच गेलं. आता पंतचं कारभारी आहेत. त्यांचं सरकार आहे. तुमचे नेते, ठाण्याचे ‘भाई’ आता ‘उपकारभारी’ झालेत.

कॅंटीन मुष्टियोद्धा : म्हणून काय झालं. आमच्याच पक्षाचे मंत्री चर्चेत असतात. महाराष्ट्र दणाणून सोडतो आम्ही.

भोंगेवाले भांडुपकर : असंच चालू ठेवा. खरा मराठी बाणा आम्हीच राबवत आहोत. आता दोन वाघ एकत्र आलेत. खरी सेना काय असते ते दिसेल लवकरच... ‘

बॅग’धारक धूम्रपानवाले : वाट बघा. नुस्ताच धूर केलात. इगतपुरीच्या शिबिरात दुसऱ्या वाघानं वाट बघायला सांगितलंय. यावेळी टाळी द्यायची तुम्हालाच घाई झालीये. ते मात्र टाळाटाळ करताहेत.

भोंगेवाले भांडुपकर : आता घोडामैदान पुढेच आहे. पहाच.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT