Mumbai News : महाविकास आघाडीतून महायुतीकडे होणारे इनकमिंग निवडणुका झाल्या तरी थांबण्याचे नाव घेत नाही. विशेषता विदर्भ हा एकेकाळी काँग्रेसचा गड मानला जात होता. दोन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले होते. त्यामुळे आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर पुन्हा गळती लागली आहे. त्यातच लोकसभा निवडणूक लढवलेला बडा नेता शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकही झाली असून त्यांनी 15 ऑगस्टला शनिवारी कार्यकर्त्यांची बैठक बोलवली असून या बैठकींनंतर शिवसेना प्रवेश करणार असल्याचे समजते. त्यासोबतच यावेळी काँग्रेसच्या केंद्रीय आणि प्रदेश नेतृत्वाबद्दल जोरदार नाराजी व्यक्त केली आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात चुरशीची तिरंगी लढत झाली होती. या लढतीत 40 हजार 626 मतांनी भाजपचे अनुप धोत्रे विजयी झाले होते. या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांना 4 लाख 16 हजार मते मिळाली होती. तर वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे 2 लाख 76 हजार 747 मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर होते. याठिकाणी अभय पाटील यांचा काँग्रेस व वंचितमुळे मताचे ध्रुवीकरण झाल्याने पराभव झाला होता.
त्यानंतरच्या काळात काँग्रेस नेते डॉ. अभय पाटील यांनी काँग्रेसच्या कार्यपद्धतीला कंटाळून वर्षभरापूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षामध्ये प्रवेश केलेला नव्हता. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी अकोल्यात नुकतीच त्यांची भेट घेत त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काँग्रेसच्या केंद्रीय आणि प्रदेश नेतृत्वाबद्दल जोरदार नाराजी व्यक्त केली. काँग्रेसकडे निवडणूक जिंकण्यासाठी कोणताही कार्यक्रम आणि यंत्रणा नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. आपला पराभव झाल्यानंतर काँग्रेसने कधीही त्यासंदर्भात विचारणा किंवा आत्मचिंतन केले नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त करताना अभय पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे मान्य केले आहे. यासोबतच पक्षाचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. कोणतेही कारण नसताना सपकाळ यांनी आपल्याला पक्षाच्या प्रदेश महासचिव पदावरून काढले. आपल्याला महासचिव पदावरून पदोन्नतीची अपेक्षा असताना कोणतेही पद न देत काँग्रेसने अवहेलना केली. आता मनधरणी करणाऱ्या काँग्रेसने परत लोकसभेची उमेदवारी दिली तरी काँग्रेसचा विचार करणार नसल्याचे अभय पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
शनिवारी होणार चित्र स्पष्ट
एकनाथ शिंदे यांनी अकोला जिल्ह्याच्या विकासाचा अजेंडा स्वीकारल्यास त्यांच्या पक्षात जाण्याबद्दल विचार करू. मात्र या संदर्भातील सर्व निर्णय 15 ऑगस्टला कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेणार असल्याचे स्पष्ट केले. एकनाथ शिंदेंनी मला तुम्हाला काय हवे, असे विचारले. परंतु मी स्वतःसाठी न मागता जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्यासमोर माझा अजेंडा ठेवला. मी मांडलेले विकासाचे मुद्दे एकनाथ शिंदे यांनी मान्य केले तर मी निश्चितच शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे अभय पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.