

Mumbai News : राज्यातील विधानपरिषदेच्या 17 पैकी सहा जागा बिनविरोध करीत महायुतीने वर्चस्व सिद्ध केले आहे. उर्वरित 11 जागांसाठी 18 जूनला मतदान होणार आहे. महायुती व महाविकास आघाडीत दुरंगी लढत होत आहे. उमेदवार नसलेल्या ठिकाणी महाविकास आघाडीने अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केले आहे. त्यामुळे या ठिकाणी येत्या काळात चुरशीच्या लढती होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीतही महायुतीने दमदार कामगिरी केली असली तरी जागावाटपावरून महायुतीमधील एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी आहे. भाजपच्या दादागिरीमुळे मित्रपक्षाचा गेम झाला असून शिवसेनेच्या हक्काच्या जागा हातातून गेल्याने शिवसैनिकांत नाराजी असल्याने येत्या काळात यामुळे थेट बंडाची ठिणगी पडण्याची शक्यता असल्याने ऐन निवडणूक काळातच वातावरण तापले आहे.
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीने एकत्रित वर्चस्व प्राप्त केले आहे. दुसरीकडे भाजपने (BJP) सर्वच ठिकाणी दमदार कामगिरी करताना मोठा भावाच्या भूमिकेत राहिले आहेत. निवडणुका होत असलेल्या 17 मतदारसंघातील तीन पक्षाची कामगिरी पाहिली तर 17 पैकी 14 ठिकाणी भाजप मोठा पक्ष आहे. तर पुणे, परभणी-हिंगोली या दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष आहे तर केवळ रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना मोठा पक्ष ठरली आहे.
महायुतीमधील जागावाटपानुसार 17 पैकी 11 जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. तर सात जागांची मागणी असताना चार जागा शिवसेनेला तर दोन जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या आहेत. विशेष म्हणजे रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना मोठा पक्ष असताना ही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली तर परभणी-हिंगोलीत राष्ट्रवादी मोठा पक्ष असताना ही जागा शिवसेनेला सोडली आहे. त्याशिवाय शिवसेनेला हवे असलेले जळगाव, छत्रपती संभाजीनगर, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे हक्काचे मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात आले नाहीत त्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत. हा वाद मिटवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना वारंवार हस्तक्षेप करावा लागल्याने सत्ताधारी आघाडीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस आले आहेत.
या जागावाटपातील वादात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नेत्यांमध्ये विशेष नाराजी असल्याचे दिसून आले. शिंदे गटाने सुरुवातीला विधान परिषदेच्या सात जागांची मागणी केली होती; पण प्रत्यक्षात त्यांना केवळ चारच जागांवर समाधान मानावे लागले आहे. महायुतीच्या जागावाटपाच्या या निर्णयामुळे शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरल्याचे दिसून आले. विशेषत: ज्या जिल्ह्यांमध्ये शिंदेसेनेच्या नेत्यांना आपल्या पक्षाचा दावा अधिक मजबूत असल्याचे वाटत होते, त्या ठिकाणच्या जागा ऐनवेळी मित्रपक्षांना सोडण्यात आल्याने त्यांच्यातील नाराजी आणखीनच वाढत गेली.
तीन पक्षातील वाद हा केवळ जागांच्या संख्येपुरता मर्यादित नसून पक्षाचे आक्रसत चाललेले राजकीय अस्तित्व आणि शिवसेनेच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात भाजपच्या वाढत्या वर्चस्वाशी संबंधित आहे. शिवसेनेचे पारंपरिक बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपाचा प्रभाव वाढत असल्याने पक्षात सध्या नाराजीचे वातावरण आहे. अनेक स्थानिक नेत्यांना असे वाटत होते की, काही भागांमध्ये शिवसेनेला अपेक्षित राजकीय स्थान मिळत नाही. निवडणूक प्रक्रियेदरम्यान हीच नाराजी उघडपणे समोर आली, असेही या नेत्याने स्पष्ट केले.
एकसंध शिवसेनेचा पारंपारिक गड म्हणून ओळखला जाणारा छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघ भाजपाच्या वाट्याला गेला, तर कोकण पट्ट्यात शिवसेनेचे प्रभुत्व असलेला रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदारसंघही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आला. यादरम्यान भाजपाने आपल्याकडे खेचून घेतलेल्या जळगाव मतदारसंघावरूनही महायुतीच्या जागावाटपाबाबत मोठी चर्चा रंगली. याउलट, शिवसेनेच्या ताब्यात राहिलेल्या ठाणे-पालघर मतदारसंघात मात्र कोणताही वाद पाहायला मिळाला नाही. छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात महायुतीत सर्वात मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळाला.
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आल्यानंतर कोकणातही महायुतीत असाच संघर्ष पाहायला मिळाला. राष्ट्रवादीने या जागेवरून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना उमेदवारी दिली. त्याला शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या गोटातून तीव्र विरोध झाला. कारण- त्यांचे सुपुत्र विकास गोगावले यांचे नाव या जागेसाठी चर्चेत होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर गोगावले यांनी मवाळ भूमिका घेतली आणि हा वाद मिटला. हा वाद मिटतो न मिटतो, तोच शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली दळवी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. नंतर त्यांनी माघार घेतली असली तरी या घडामोडींमुळे महायुतीतील नाराजी स्पष्टपणे दिसून आली.
जळगाव मतदारसंघातील वादातून महायुतीतील संघर्षाची एक वेगळीच बाजू समोर आली. उत्तर महाराष्ट्रातील या जागेवर शिवसेनेचाच हक्क असायला हवा, असा युक्तिवाद पक्षातील काही नेत्यांनी केला होता. त्यासाठी भाजपसोबत ‘जळगाव आणि नाशिक’ जागांच्या संभाव्य अदलाबदलीबाबत चर्चाही झाली होती. मात्र, अंतिम जागावाटपाच्या सूत्रानुसार नाशिकची जागा शिवसेनेला तर जळगावची जागा भाजपाकडे गेली. नाशिकमधून शिंदेसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे निवडणूक लढवण्याच्या तयारीत असतानाच भाजपाशी संबंधित गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. या घडामोडींमुळे महायुतीत काही काळ राजकीय तणाव निर्माण झाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.