मुंबई : सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी महाराष्ट्रात आंबेडकर चळवळ कुणामुळे कमकुवत झाली. यावर Saam TV वरील 'Black & White या कार्यक्रमात रोखठोक भाष्य केले.
Cockroach Janata Party (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पक्षाची भूमिका, जेन झी पिढी, आंदोलनाची पुढील दिशा, दलित चळवळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा तसेच आम आदमी पक्षाशी (AAP) असलेल्या संबंधांबाबत सविस्तर आणि स्पष्ट भूमिका मांडली.
महाराष्ट्रातील दलित चळवळीबाबत बोलताना दीपके यांनी चिंता व्यक्त केली. "महाराष्ट्रातील दलित चळवळ कमकुवत होत चालली आहे. त्यामागे सातत्याने झालेले राजकारण हे मोठे कारण आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ एका समाजापुरते मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे चळवळीचे नुकसान झाले," असा आरोप त्यांनी केला.
"मी आंबेडकरांचा वारसा चालवणारा इतका मोठा नाही. आंबेडकर हे केवळ दलित समाजाचे नाहीत, तर संपूर्ण देशाचे आहेत. त्यांनी भारतीय संविधान दिले, महिलांना अधिकार दिले," असे दीपके म्हणाले. "महिलांना घटनात्मक अधिकार देण्याचे ऐतिहासिक कार्य आंबेडकरांनी केले. त्यामुळे त्यांचे विचार संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहेत," असेही नमूद केले.
CJP च्या आंदोलनाबाबत बोलताना दीपके यांनी स्पष्ट केले की, "आम्ही कोणत्याही एका जातीच्या किंवा समाजाच्या नावाने आंदोलन करत नाही. आम्ही भारतीय म्हणून आंदोलन पुढे नेत आहोत. समाजातील प्रत्येक घटकाचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न आहे."
हिंसा आणि समाजातील वाढत्या आक्रमकतेवर भाष्य करताना दीपके म्हणाले, "आजच्या काळात अनेक अॅक्शन चित्रपटांमधून चुकीचे संदेश दिले जातात. हिंसा हा कोणत्याही समस्येचा उपाय असू शकत नाही. समाज बदलायचा असेल तर अहिंसेच्या मार्गानेच बदल घडवावा लागेल."
"आजच्या काळात दुसरे आंबेडकर, महात्मा गांधी किंवा पंडित जवाहरलाल नेहरू निर्माण होणे अत्यंत कठीण आहे. त्या नेत्यांनी देशासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे," असे ते म्हणाले.
आप (AAP) पक्षाचा 'स्लीपर सेल' असल्याच्या आरोपावर दीपके म्हणाले, "मी दोन-तीन वर्षे आम आदमी पक्षासोबत काम केले होते. ही गोष्ट मी माध्यमांनाही अनेकदा सांगितली आहे. आपसोबत काम केले, हे मी कधीच लपवलेले नाही. मात्र त्याचा CJP च्या सध्याच्या भूमिकेशी कोणताही संबंध नाही."
आंदोलनाची पुढील वाटचाल कशी असेल, याविषयी बोलताना दीपके म्हणाले की, "आमचे आंदोलन आता पूर्णपणे अहिंसेच्या मार्गाने पुढे जाईल. समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी अहिंसा हाच सर्वात प्रभावी आणि शाश्वत मार्ग आहे,"
CJP च्या आंदोलनाने अलिकडच्या काळात तरुणांमध्ये मोठी चर्चा निर्माण केली आहे. अशा परिस्थितीत अभिजीत दीपके यांनी अहिंसक आंदोलन, संविधानिक मार्ग आणि सर्वसमावेशक भूमिका यावर भर दिल्याने CJP च्या पुढील वाटचालीबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.