महाराष्ट्र

Government decision : मोठी बातमी: अत्याधुनिक कॅन्सर उपचार आता ग्रामीण भागातही उपलब्ध; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Chief Minister healthcare initiative for cancer patients : मुख्यमंत्र्यांच्या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर ग्रामीण भागात अत्याधुनिक कॅन्सर उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत. दुर्गम भागातील रुग्णांना दर्जेदार उपचार, लवकर निदान आणि आरोग्यसेवा सहज मिळण्यास मदत होणार आहे.

Rashmi Mane

ग्रामीण भागातील कर्करोगग्रस्त रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळण्यात अनेक अडचणी येतात. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा शहरांमध्ये केंद्रित असल्यामुळे अनेकांना उपचारांसाठी दूरचा प्रवास करावा लागतो. यामुळे आर्थिक भार वाढतो, उपचारांमध्ये विलंब होतो आणि अनेक कुटुंबांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्करोग उपचार क्षेत्रात महत्त्वाचा निर्णय घेतला असून ग्रामीण भागात आधुनिक कॅन्सर उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे.

महाकेअरच्या माध्यमातून नागपूर येथे ‘नागपूर हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रोजेक्ट’ ही उपकंपनी स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या महाकेअर संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पामुळे विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागातील कर्करोग रुग्णांना स्थानिक स्तरावर अत्याधुनिक निदान व उपचार सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

बैठकीत राज्यातील कर्करोग नियंत्रण आणि उपचार व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी महाकेअरच्या कॉर्पस निधीसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून 100 कोटी रुपयांची तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. याशिवाय सामाजिक उत्तरदायित्व निधी उभारणी, महाकेअर कार्यालयासाठी जी.टी. रुग्णालय परिसरात जागा उपलब्ध करून देणे, लेखापरीक्षक व कंपनी सचिवांची नियुक्ती तसेच विविध तज्ज्ञ सल्लागारांची नेमणूक यासारख्या महत्त्वाच्या प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली.

राज्यातील रुग्णांना जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या. कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात संशोधन, उपचार आणि जनजागृती यांचा समन्वय साधण्यावरही भर देण्यात आला.

दरम्यान, उपचार क्षेत्रातील तांत्रिक गुणवत्ता वाढवण्यासाठी टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलसोबत सामंजस्य करार करण्यात आला. या सहकार्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि वैद्यकीय कौशल्याचा लाभ राज्यातील रुग्णांना मिळणार आहे.

नागपूर हे विदर्भाचे प्रमुख केंद्र असल्यामुळे तेथे हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विदर्भातील हजारो रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाकेअरच्या आराखड्यानुसार भविष्यात मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, नाशिक आणि अमरावती येथेही अशी केंद्रे उभारण्यात येणार असून राज्यभर कर्करोग उपचारांचे मजबूत जाळे निर्माण करण्याचा सरकारचा मानस आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT