Sunil Tatkare: राज्याचे वरिष्ठ नेते दिवंगत अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाची समिकरणं बदलली आहेत. त्यातच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलिनिकरणाची चर्चाही अजूनही थांबताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलिनिकरणाच्या प्रस्तावाबाबत मोठं विधान केलं आहे. याबाबत त्यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. साम टीव्हीवरील 'ब्लॅक अँड व्हाईट' कार्यक्रमात बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केलं.
विलिनिकरणाबाबत पुन्हा एकदा प्रश्न विचारल्यानंतर तटकरे म्हणाले, "अजितदादांच्या अकाली निधनानंतर राजकीय समिकरणं बदलल्याचं चित्र तर दिसतंच आहे. अशा वेळी जर नव्यानं दोन्ही राष्ट्रावादी काँग्रेस पक्षांच्या विलिनिकरणासंदर्भात चर्चा सुरु व्हायची असेल तर समोरुनच प्रस्ताव आला पाहिजे. यामध्ये विलिनिकरण कशा पद्धतीनं होणार? त्यामध्ये काय अपेक्षित आहे? काय नाही? हे जर आलं तर मग सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली आम्हाला सगळ्यांना बसून त्यावर चर्चा करता येईल. पण जर ते आलंच नाही तर मग कुठे प्रश्न उद्भवेल. त्यामुळं आधी हा प्रस्ताव येऊ द्या. कारण ज्यावेळा दोन राजकीय पक्ष विलीन होतात. तेव्हा कुठल्या पक्षाचं कोणत्या पक्षात विलिनिकरण होणार? हा प्रश्न निर्माण होतो, जो मी यापूर्वीही विचारला होता. त्यामुळं विलिनिकरणाच्या बाबतीतल्या प्रस्तावात काय आहे हे समोर येऊ द्या, पण हा प्रस्ताव केवळ माध्यमांच्या माध्यमातून नको तर प्रत्यक्ष अधिकृतरित्या यायला हवा"
पण जर समोरुन प्रस्ताव आला तर नेतृत्व कोणाचं असेल? अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व कायम असेल की शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व असेल? या प्रश्नाला उत्तर देताना तटकरे म्हणाले, "म्हणूनच मी म्हटलं की, याबाबतचा प्रस्ताव आल्यानंतर त्यात हे सगळं येईलच. दादा असतानाची राजकीय परिस्थिती भिन्न होती, कारण दादा राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांच्याशी चर्चा काय झाली हे आम्हाला माहिती नव्हतं. त्यामुळं याबाबतीतही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आम्हाला स्पष्ट भूमिका मांडावी लागेल"
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत या एकत्रिकरणाचा चांगला परिणाम दिसून आला त्यामुळं चांगला विजयही मिळाला. त्यामुळं दोन्ही राष्ट्रावादी एकत्र आले तर एक मोठी शक्ती म्हणून राज्यात तुम्ही एक मोठा पर्याय म्हणून उभं राहू शकता. या मुद्द्यावर बोलताना तटकरे म्हणाले, "पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत देखील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणुका लढवल्या होत्या. यावेळी अपेक्षित यश मिळालं नाही, त्याचा दुसरा टप्पा असा की एक व्हिडिओ दाखवून विलिनकरणाची चर्चा झाल्याचा आभास निर्माण केला जातो आहे. त्या बैठकीनंतर दादांनी बारामतीत पत्रकार परिषद घेतली आणि मला फोन केला होता त्यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्रित लढण्याची चर्चा झाल्याचं मला सांगितलं होतं. तसंच बहुतेक ठिकाणी घडाळ्याच्या चिन्हावर निवडणुक लढवण्यासाठी आता होकार आलेला आहे. तसंच काही प्रश्न उद्भवला तर ज्या बारा जिल्ह्यात निवडणुका होत आहेत तिथल्या जिल्हाध्यक्षांना कल्पना द्या, असंही दादांनी मला सांगितलं होतं.
पण नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये बहुतांश ठिकाणी युती झालेली असली तरी पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये चिन्हं वेगळी होती तिथं यश मिळालं नाही. पण झेडपीत एकच चिन्ह बऱ्याच ठिकाणी होतं त्यामुळं तिथं यश मिळालं. यामध्ये मी कोणाला कमी लेखत नाही पण मी जे निवडणुकीत निकालानंतर जे उत्तर आलेलं आहे त्याचं विश्लेषण करतोय. त्यामुळं घड्याळ चिन्हाला आणि त्या पक्षाकडं कार्यकर्त्यांचाही कल असल्याचं दिसतं आहे, असंही यावेळी तटकरेंनी स्पष्टपणे सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.