Nawab Malik Kirit Somaiya
Nawab Malik Kirit Somaiya Sarkarnama
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील राजकारणात लवकरच धमाका : या नेत्यांचे फटाके दिवाळीनंतर फुटणार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : देशभरात सगळीकडे दिवाळीच्या उत्सवाची धामधूम सुरु आहे. साफसफाई, दिवाळीचा फराळ, कपडे, फटाके अशी सगळी तयारी सुरु आहे. दूसऱ्या बाजूला राजकीय नेत्यांचीही तयारी सुरु झाली आहे. पण ती तयारी सुरु आहे दिवाळीनंतर फटाके फोडण्यासाठी. राज्यात सध्या समीर वानखेडे प्रकरणावरुन भाजप आणि महाविकास आघाडी एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच आता या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीचा दूसरा अंक हा दिवाळीनंतर दाखवणार असल्याचे दोन्हीकडील नेते सांगत आहेत. यातुन अनेक गौप्यस्फोट समोर येणार असल्याचे दावे केले जात आहेत. हेच सगळे गौप्यस्फोट आणि आरोप-प्रत्यारोपांचे फटाके दोन्हीकडील नेते दिवाळीनंतर फोडणार आहेत.

यात सगळ्यात पहिला नंबर लागतो तो भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांचा. सोमय्या महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासूनच सातत्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. त्यांच्यामुळेच प्रताप सरनाईक, भावना गवळी, छगन भुजबळ, अनिल परब या नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. त्यानंतर सोमय्यांनी आज दिवाळीनंतर तीन मंत्र्यांसह जावयाचे सहा घोटाळा उघड करणार असल्याचे ट्विट केले आहे. ते म्हणतात, दिवाळी सण येतोय, दिवाळीत फटाके फोडतात. मात्र, किरीट सोमय्या दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. एक, दोन, तीन, चार किंवा पाच नाही तर पूर्ण अर्धा डझन लोकांचे फटाके फोडणार आहे. त्यामुळे आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे टेन्शन वाढले आहे. सोमय्या यांनी या मंत्र्यांची नावे जाहीर केली नसल्याने हे मंत्री नेमके कोण, आणि फटाके कोणावर फुटणार याची चर्चा रंगली आहे.

त्यानंतर नंबर लागतो राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचा. नवाब मलिक यांनी मागच्या काही काळापासून सातत्याने पत्रकार परिषद घेत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. या दरम्यान त्यांनी भाजपवर देखील आरोप केले आहेत. त्यातच त्यांनी जाहिर केले आहे की, हिवाळी अधिवेशनात भाजपकडून माझ्यावर टीका केली जाईल. आरोप केले जातील. पण मीही त्यांना उत्तर देणार आहे. त्यासाठी माहिती गोळा करत आहे. माझ्याकडे काही नेत्यांविषयी विस्फोटक माहिती आहे. या माहितीनंतर काही भाजप नेत्यांना तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही. त्यानंतर आजही त्यांनी सोमय्यांच्या दाव्यावर म्हंटले आहे की, दिवाळीनंतर मीच मोठे फटाके फोडणार आहे.

यानंतर या यादीत आणखी एक नाव घ्यावे लागते ते म्हणजे भाजपचे नेते मोहित भारतीय अर्थात मोहित कंबोज यांचे. ते आज ट्विटरवर म्हणतात, २९ तारखेच्या पत्रकार परिषदेत ज्यांच्याजवळ काही नव्हते, फक्त भंगार होते. ते ३१ तारखेच्या पत्रकार परिषदेत त्यांच्याकडे एक प्लॉट आणि कंस्ट्रक्शन साईट असल्याचे मान्य करतात. आणि त्यांच्या मुलाचा संबंध १३५ कोटींचा बँक घोटाळा करणाऱ्यांसोबत आहे. मंत्री महोदयांची २ हजार कोटींची बेहिशोबी संपत्ती आहे. २५ वर्षांपासून तुम्ही सरकारी पदावर आहात. त्यामुळे त्यांनीही पाठोपाठ म्हंटले आहे की, "अरे मियाँ अभी तो पिक्चर चालू हुई हैं ! त्यामुळेच ते आता येणाऱ्या काळात आणि दिवाळीनंतर कोणत्या नव्या गोष्टींबद्दल खुलासा करणार हे बघणे महत्वाचे असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT