Agriculture Department Maharashtra Shetkari Mitra vacancy Sarkarnama
महाराष्ट्र

Shetkari Mitra recruitment : कृषी विभागाचा ऐतिहासिक निर्णय! तब्बल 444 'शेतकरी मित्रां'ची होणार नेमणूक; 30% जागा महिलांसाठी राखीव!

Agriculture Department Maharashtra Shetkari Mitra vacancy: महाराष्ट्र कृषी विभागाकडून 444 शेतकरी मित्रांची नियुक्ती होणार आहे. यातील 30 टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जाणून घ्या महत्त्वाची माहिती.

Rashmi Mane

कृषी विभाग आणि शेतकऱ्यांमधील संपर्क अधिक मजबूत करण्यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. कृषी विभागांतर्गत ‘आत्मा’ योजनेद्वारे आर्थिक वर्ष 2026-27 साठी राज्यभरात 11,587 शेतकरी मित्रांची निवड केली जाणार आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यात तब्बल 444 शेतकरी मित्रांची नियुक्ती होणार असून, अर्ज प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे.

गावपातळीवर कार्यरत असलेल्या कृषी सहाय्यकांना मदत करण्यासाठी प्रत्येक मंजूर सहाय्यक कृषी अधिकारी पदामागे एका शेतकरी मित्राची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या शेतकरी मित्रांचा कार्यकाळ 2 वर्षांचा असणार असून, त्यांना दरमहा 1,500 रुपये मानधन दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना कृषीविषयक माहिती, तंत्रज्ञान आणि योजनांची माहिती देणे, तसेच कृषी विभागाशी समन्वय साधणे अशी महत्त्वाची कामे त्यांना करावी लागणार आहेत.

महिलांसाठी 30 टक्के जागा

शेतकरी मित्र निवड प्रक्रियेत महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी 30 टक्के जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. कृषी आयुक्त सूरज मांडरे यांच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. ग्राम कृषी विकास समितीच्या माध्यमातून निर्धारित निकषांचे पालन करून निवड केली जाणार आहे.

कोण करू शकते अर्ज?

शेतकरी मित्र होण्यासाठी वय 25 ते 60 वर्षे असणे आवश्यक आहे. संबंधित गावातील रहिवासी असणे, किमान 12 वी उत्तीर्ण असणे आणि कोणताही गुन्हा दाखल नसणे आवश्यक आहे. शेतीतील कौशल्य, उत्तम संवाद कौशल्य आणि स्वयंप्रेरित सेवाभावी वृत्ती असलेल्या व्यक्तींना या कामासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. पदवीधर, पदविकाधारक आणि पदव्युत्तर पदवीधारक उमेदवारही या प्रक्रियेत पात्र ठरू शकतात.

शेतकरी मित्रांना दररोज 2 तास कृषी विभागाशी संबंधित काम करावे लागणार आहे. कृषी मोबाइल अॅपवर आवश्यक माहिती भरणे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापनाशी संपर्क ठेवणे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे ही त्यांची प्रमुख जबाबदारी असेल.

सातारा जिल्ह्यात तालुकानिहाय निवड

सातारा, कोरेगाव, खटाव, कऱ्हाड, पाटण, फलटण आणि माण तालुक्यात प्रत्येकी 48 शेतकरी मित्रांची निवड होणार आहे. वाईमध्ये 36, तर जावळी, खंडाळा आणि महाबळेश्वरमध्ये प्रत्येकी 24 शेतकरी मित्र निवडले जाणार आहेत. अशा प्रकारे सातारा जिल्ह्यात एकूण 444 शेतकरी मित्रांची निवड केली जाणार आहे.

अर्जातील दुरुस्ती करण्यासाठी 23 ते 24 सप्टेंबर ही मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेतकरी मित्र निवड प्रक्रिया आणि संबंधित निकषांची माहिती तपासून अर्जातील आवश्यक दुरुस्ती वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT