Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी थेट शेतकऱ्यालाच शेतकरी कर्जमाफीवरून सुनावल्यामुळे त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका करताना कोकाटेंचा समाचार घेतला आहे. सध्या कोकाटे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात वाद निर्माण झाला आहे.
याआधीच कोकाटे कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्यावरून अडचणीत आले होते. त्यांची आमदाराकी थोडक्यात वाचली होती. दरम्यान आता पुन्हा त्यांनी आपल्यावर संकट ओढावून घेतले आहे. कर्जमाफीवरून शेतकऱ्याने विचारलेल्या प्रश्नावर कोकाटेंनी आपला संताप व्यक्त करताना शेतकऱ्यालाच सुनावलं.
कोकाटे यांनी, कर्जमाफी झाल्यानंतर तुम्हाला पैसे येतात. त्या पैशांचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये एका रुपयाची तरी गुंतवणूक करता का? उलट आलेल्या पैशातून साखरपुडे करा, लग्न करता, असं कोकाटे यांनी म्हटल्याने आता राज्यभर तीव्र संतापाटची लाट उसळली आहे. यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
याच मुद्द्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोकाटे यांचा समाचार घेताना ते कृषी क्षेत्रातील कुणाल कामरा झाले असून पवार, पटेलांसह राज्यात सध्या कॉमेडी शो सुरू असल्याची टीका केलीय. कोकाटे गेली अनेक वर्ष राजकारणात असून त्यांनी शेतकऱ्यांना दुखावणारे अशा पद्धतीने वक्तव्य केलं आहे. यामुळे आता अजित पवार यांनीच प्रफुल्ल पटेल आणि कोकाटे सारख्यांना लगाम घालावा, अशी मागणी केली आहे. तर सध्या तिघांची भाषणे ऐकली तर राज्यात कॉमेडी शो सुरू केलाचे समोर येत असल्याची टीका देखील राऊत यांनी केली आहे.
राज्यभर कोकाटे यांच्या या वक्तव्यावरून टीका होत असतानाच रोहित पवार यांनी देखील कोकाटे यांना डिवचले आहे. तसेच कोकाटे साहेब आपण थोडक्यात बचावला आहात, जरा जपून असाही टोला त्यांनी लगावला आहे. रोहित पवार यांनी याबाबत एक ट्वीट करत ही टीका केलीय. या ट्वीटमध्ये रोहित पवार यांनी, कोकाटे साहेब, कर्जमाफीचा पैसा बँकांना जमा होतो, शेतकऱ्यांना तो थेट मिळत नाही. हे कदाचित याची माहिती मंत्रिमहोदयांना नसावी. कर्जमाफीचा पैसा साखरपुडा, लग्नकार्यात खर्च करणे हे कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्यासारखे सोपे नाही. मुळात सदनिका प्रकरणात बुडाखाली अंधार असताना शेतकऱ्यांना ब्रम्हज्ञान देण्याची आपण देवू नये.
रोज कोट बदलणाऱ्या कृषिमंत्र्यांना शेतकऱ्याचा फाटलेला सदरा दिसत नसला तरी आपल्या वादग्रस्त संवेदनांचं प्रदर्शन करून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्यापेक्षा अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना काय मदत देता येईल, यावर लक्ष केंद्रित केलं तर अधिक बरं होईल. राजकीयदृष्ट्या थोडक्यात वाचला आहात त्यामुळे जरा जपून असाही टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.
दरम्यान नुकताच कमी उत्पन्न दाखवून सदनिका लाटण्याच्या प्रकरणात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत भर पडली होती. या प्रकरणात नाशिक जिल्हा न्यायालयाने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. ज्यामुळे त्यांचे मंत्रीपद धोक्यात आले होते. यानंतर त्यांनी हल्ली भिकारी देखील एक रुपया घेत नाही, असे म्हणत एक रुपया पीक विमा योजनेवरून शेतकऱ्यांची खिल्ली उडवली होती. या वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे देखील त्यांना विरोधकांच्या टीकेचा सामना करावा लागला होता. या वादग्रस्त व्यक्तव्यावरून टीकेची झोड शांत होत नाही तोपर्यंतच त्यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.