Ajit Pawar Death Truth: बारामतीत झालेल्या विमान अपघातात अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर अनेक अनुत्तरित प्रश्न उपस्थित झाले आहेत. अपघात नेमका कास झाला, सुरक्षेतील त्रुटी होत्या का? याबाबत जनतेमध्ये मोठा संभ्रम आहे. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रचंड भावनिक वातावरण निर्माण झालं आहे.
या घटनेबाबात अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांच्या मनात विविध शंका उपस्थित केल्या जात असून, अपघात नेमका कसा झाला याची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर कर्जत जामखेड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार व अजितदादांचे पुतणे रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत काही महत्त्वाचे आणि धक्कादायक मुद्दे मांडले आहेत.
रोहित पवार म्हणाले की, अपघातानंतर समाजमाध्यमांवर आणि खासगी पातळीवर अनेक अफवा पसरल्या. काही लोक भावनिक अवस्थेत व्हिडिओ शेअर करत होते आणि अजितदादा परत येतील, असा विश्वास व्यक्त करत होते.
विमानात एकूण सहा प्रवासी होते आणि सहावी व्यक्ती म्हणजे अजितदादा होते, मात्र सापडलेला मृतदेह त्यांचा नाही, असा दावा काही जण करत होते. दादा आज येतील, उद्या येतील, अशा चर्चा सुरू होत्या. दादा परत आले तर मी त्यांना घट्ट मिठी मारिल, मात्र अजितदादा आपल्यात नाहीत हे खरं आहे.
या अपघातावर सुरुवातीला आपल्यालाही विश्वास बसत नव्हता, असं रोहित पवार म्हणाले. आपल्याला हे सगळं एखाद्या वाईट स्वप्नासारखं वाटत होतं. मात्र काही ठोस बाबी समोर आल्यानंतर वास्तव स्वीकारणं भाग पडलं. त्यांनी सांगितलं की, घटनास्थळी आढळलेला अजितदादांचा जळालेला स्वेटर, पायात असलेली चप्पल आणि हातातलं बंद घड्याळ या गोष्टी पाहिल्यानंतर वातावरण पूर्णपणे बदललं.
विशेष म्हणजे, अजित पवार हे नेहमी आपलं घड्याळ किमान १५ मिनिटे पुढे ठेवायचे, ही गोष्ट सर्वांनाच माहीत होती. मात्र सापडलेलं घड्याळ बंद अवस्थेत होतं. ते दृश्य पाहून अनेक जण निशब्द झाले होते, असं रोहित पवारांनी नमूद केलं. जी घटना घडलीच नाही, असं वाटणाऱ्यांसाठी हे वास्तव स्वीकारणं अत्यंत कठीण होतं, पण ही घटना घडली आहे, याकडे दुर्लक्ष करता येत नाही, असं ते म्हणाले.
रोहित पवारांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितलं की, आज अजितदादा प्रत्यक्षात आपल्यात नसले, तरी त्यांचे विचार, त्यांची भूमिका आणि त्यांनी उभा केलेला संघर्ष कायम आपल्या सोबत राहील. रोहित पवारांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.