Baramati News : बारामती उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा म्हटली की जोरदार तयारी, नीटनेटकेपणा आणि सभेच्या ठिकाणचे दादांचे फोटो, मोठमोठे कटआउट लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नव्हते. गुरुवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर ही हास्यमुद्रेतील दादांचे भले मोठे फोटो ही सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
मात्र, दादांच्या फोटोंनी गजबजलेले हे ठिकाण सभेचे नव्हे दोस्ता, तर दादांना अखेरचा निरोप देण्याचे आहे, हे सत्य सांगणाऱ्या मित्राकडे पाहताना कार्यकर्ते काही क्षण गहिवरल्याचे चित्र मैदानात दिसत होते.
लोकसभा, विधानसभा, निवडणुकांपाठोपाठ महापालिका निवडणुकीच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यासह महाराष्ट्रभर सभा गाजवल्या. प्रत्येक सभेच्या ठिकाणच्या बैठक व्यवस्थेपासून ते मंडप, ध्वनी व्यवस्थेपर्यंत सर्व काही व्यवस्थित असावे, याबाबत पवार चांगलेच आग्रही असत. विशेषत: सभेच्या ठिकाणी पवार यांची छायाचित्रे असलेले फ्लेक्स, बॅनर चांगले असतील, याकडे त्यांच्या टीमचे अधिक लक्ष असे. त्यादृष्टीने दादांचे चांगले फोटो, फ्लेक्स, कटआउट निवडण्यात येत असे. त्यामुळे सभेच्या वातावरण निर्मितीमध्ये वेगळीच भर पडत असे.
बुधवारी बारामती येथे अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. त्यासाठीचे आवश्यक नियोजन करण्यात आले होते. त्याचवेळी अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पवार यांचे हास्यमुद्रेतील 7 ते 8 मोठे फोटो मैदानात लावण्यात आले होते. काळा, पिवळा, निळा व गुलाबी रंगातील कोट, गळ्यात पक्षाचे उपरणे व डोक्यावर टोपी, पारंपरिक व रंगीत फेटा बांधलेला, पांढरा शर्ट परिधान केलेला असे विविध रंगछटा असणारे 12 फ्लेक्स लावण्यात आले होते.
सर्व फोटोमध्ये पवार (Ajit Pawar) यांची हास्यमुद्रा लक्ष वेधून घेणारी होती. दादांचे फ्लेक्स व लाखोंची गर्दी, त्यामुळे दादांची सभा असल्याचा भास निर्माण होत असल्याचे कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती. मात्र पुढच्याच क्षणी ही सभा नाही, आपल्या लाडक्या दादांना निरोप देण्याची वेळ आणि ठिकाण असल्याची जाणीव अन्य कार्यकर्त्यांकडून करून दिल्यानंतर संबंधित कार्यकर्त्याच्या डोळ्यांमध्ये आपसूकपणे अश्रु तरळल्याचे चित्र मैदानात ठिकठिकाणी दिसत होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.