Prashant Joshi PA To Dhananjay Munde : महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात क्वचितच अशी एखादी व्यक्त सापडेल, ज्याला अजितदादांच्या दिलदार स्वभावाचा अनुभव आला नसेल. स्पष्टवक्ते तितकेच निर्मळ आणि जाण असणारे नेते म्हणून ते ओळखले जायचे. राजकीय नेते, मंत्री, खासदार, आमदार यांचे दैनंदिन जीवन हे धावपळीचे असते.
दौरे, बैठका, मेळावे, कार्यक्रम अशा व्यस्त कार्यक्रमात त्यांच्यासोबत असणाऱ्या 'पीए'ची ही मोठी कसरत असते. पण जेव्हा या 'पीए'च्या मानधन वाढीचा विषय आला, तेव्हा अजित पवारांनी क्षणाचाही विलंब न लावता पहिल्या टप्प्यात आठ हजार असलेले मानधन पंधरा आणि त्यानंतर तीस हजारापर्यंत वाढवले. या मानधन वाढीचा प्रसंग आणि त्याची आठवण धनंजय मुंडे यांचे 'पीए' प्रशांत जोशी यांनी सांगीतली.
आम्हाला 2012 मध्ये अजित पवारांमधील हळवा आणि काळजी घेणारा नेता याचा अनुभव आला. त्यांनी मंत्रालयातील सर्व स्वीय सहाय्यकांच्या मानधनवाढी संदर्भातल्या प्रश्नावर मंत्रालयातील सचिवांना खडसावले होते.
आम्ही आमदारांचे स्वीय सहाय्यक म्हणून नुकतेच रुजू झालो होतो. तेव्हा 7,825 रुपये इतक्या तुटपुंज्या मानधनावर संसाराचा गाडा हाकावा लागतं होता. एवढ्या कमी मानधनात घर चालवणं कठीण आहे म्हणून आम्ही मानधन वाढीचा प्रलंबित प्रस्ताव मंजुर करावा, अशी मागणी केली होती.
ही फाईल जेव्हा अजित दादांकडे आली, तेव्हा त्यांनी आपल्या व्यक्तीमत्वाला साजेसा असाच निर्णय घेतला. त्यांनी जो निर्णय घेतला तो फक्त अजित दादांच घेऊ शकतात हे ही तेव्हा दिसून आले. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये सचिवांनी अवघ्या दोन ते अडीच हजार रुपयांच्या वाढीचा प्रस्ताव मांडला होता. हे समजताच अजित पवार कडाडले 'अरे दहा हजारात काय होतं? ही पोरं कुठे जाणार? थेट 15 हजारांचा प्रस्ताव द्या' असे त्यांनी ठणकावले.
अजित पवारांनी या विषयात नुसते लक्षच घातले नाही तर तो मार्गी लावत आमचे मानधन थेट दुप्पट केले. या निर्णायाने आत्मविश्वास आणि आत्मसन्मान मिळाला. फडणवीस सरकारच्या काळात सुधीर मुनगंटीवार यांनी हेच वेतन 25 हजार रुपये केलं. त्यानंतरच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये अजितदादांनी पुन्हा पुढाकार घेत हे वेतन 30 हजार रुपये केलं. मागील वर्षी अर्थसंकल्पात हे वेतन 40 हजार रुपये करण्याचा त्यांचा मानस होता. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या होत्या. यावर्षी ते नक्कीच प्रत्यक्षात उतरलं असतं, कारण ते शब्दांचे पक्के होते.
पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. या निर्णयाची अंमलबजावणी होण्याआधीच काळाने त्यांना हिरावून नेलं. सामान्य माणसाच्या पोटाचा विचार करणारा, पदापेक्षा माणूस मोठा मानणारा असा नेता पुन्हा होणं कठीण आहे, अशा शब्दात प्रशांत जोशी यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहीली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.