Ajit Pawar Passed Away : प्रमोद महाजन ते अजित पवार; महाराष्ट्राने अकाली गमावलेले दिग्गज नेते..

Ajit Pawar plane crash: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज दि. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे विमान अपघातात दुर्देवी निधन झाले. दादांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र हळहळला आहे.
Ajit Pawar death, Baramati plane crash
Ajit Pawar death, Baramati plane crashSarkarnama
Published on
Updated on

Ajit Pawar Passed Away : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याने अवघ्या महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. आपला लाडका दादा आता आपल्यात नाही या भावनेत आख्खा महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला.

दुर्देवाने महाराष्ट्राने याआधीही असे अनेक धक्के पचवले आहे. अनेक मोठे नेते महाराष्ट्राने अकाली गमावले आहेत. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांचे अकाली निधन यापूर्वी झाले आहे. त्यात मग भाजपचे राष्ट्रीय नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे तसेच कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री आर.आर पाटील, शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे या नेत्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्र हळहळला होता.

प्रमोद महाजन

प्रमोद महाजन हे भाजपचे राष्ट्रीय नेते होते. महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युतीचे ते जनक होते. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात होते. पंरतु 2006 साली प्रमोद महाजन यांच्यावर त्यांचेच भाऊ प्रवीण महाजन यांनी मुंबईतल्या राहत्या घरी गोळ्या घालून त्यांची हत्या केली होती. प्रमोद महाजन यांनी 13 दिवस मृत्यूशी झुंज दिली. मात्र अखेरच्या क्षणी हिंदूजा रुग्णालयात त्यांचे निधन झाले.

गोपीनाथ मुंडे

गोपीनाथ मुंडे हे भाजपचे राष्ट्रीय स्तरावली मोठे नेते होते. लोकनेता म्हणून त्यांची ओळख होती. २०१४ ला केंद्रात भाजपची सत्ता आली तेव्हा त्यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्याचवेळी दुसरीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ते होतील अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत होते. मात्र 3 जून 2014 रोजी कार अपघातात त्यांचे निधन झाले. गोपीनाथ मुंडे हे दिल्लीतून महाराष्ट्राकडे येण्यासाठी विमानतळाकडे निघाले होते. त्यावेळी दिल्लीतील मोतीबाग परिसरात समोरुन येणाऱ्या इंडिका कारने त्यांच्या गाडीला जबर धडक दिली. त्यावेळी गोपीनाथ मुंडे हे गाडीच्या मागच्या शीटवर बसले होते. त्यांना या अपघातात जोरात मार बसला. अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. मुंडेंवर एम्समध्ये उपचार सुरु होते. गोपीनाथ मुंडेंना हृदयविकाराचा झटाकाही आला होता. त्यानंतर सकाळी आठ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची बातमी ऐकुन महाराष्ट्र सुन्न झाला होता.

विलासराव देशमुख

प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे दोघेही मराठवाड्याचे होते. पण अवघा महाराष्ट्र त्यांच्यावर प्रेम करत असं व्यक्तिमत्व दोघांचे होते. महाजन -मुंडे यांच्याप्रमाणेच मराठवाड्यानं आणखी एक हिरा गमावला. तो हिरा म्हणजे माजी उपमुख्यमंत्री विलासराव देशमुख. 2012 साली लिव्हर आणि किडनीच्या आजारामुळं विलासराव मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले. प्रकृती खालावल्यानं त्यांना चेन्नईच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं होतं पण तिथं विलासरावांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात शोककळा पसरली होती. राज्यात तीन दिवसांचा दुखवटा राज्य सरकारने घोषित केला होता.

आर.आर पाटील

राष्ट्रवादीचे नेते आणि सर्वांचे 'आबा' आर. आर. पाटील यांचे कॅन्सरमुळे अकाली निधन झाले होते. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यावेळी त्यांचे वय ५९ वर्ष होते. गृहमंत्री असताना महाराष्ट्रात लेडिज बारचा नंगानाच बंद करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला होता. अतिशय सामान्य घरातून आलेले आबा पहिल्यांदा २००४ ला उपमुख्यमंत्री झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अतिशय सामन्य व साधा माणूस असलेल्या या माणसाला राज्याचे गृहमंत्री केलं होतं. त्यांच्या निधनाने शरद पवार देखील हळहळले होते. आर.आर. आमच्यात नाही ही गोष्ट आम्हाला पचवायला बराच काळ लागेल असं शरद पवार म्हणाले होते.

विनायक मेटे

२०२२ मध्ये शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर हा अपघात झाला होता. माडप बोगद्यामध्ये पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. धक्कादायक म्हणजे अपघातानंतर जवळपास एक तास मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले होते. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील राजेगावचे रहिवासी असलेले मेटे हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख होते.मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनातील मेटे हे महाराष्ट्रातील प्रमुख नेते होते. मराठा आरक्षणासाठी मेटे यांनी अनेकदा आंदोलने केली. अरबी समुद्रातील शिवस्मारक समितीचे ते अध्यक्ष होते. सर्वप्रथम शिवसेना भाजप युती सरकारच्या काळात आमदार त्यानंतर सलग पाच टर्म विधानपरिषद सदस्य ते राहिले होते.

दरम्यान अजित पवार हे आज (दि. २८ जानेवारी ) सकाळी ९ ते ९:१५ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात जोराने आदळले. विमान कोसळताच त्याने काही सेकंदातच भीषण पेट घेतला. या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचे निधन झाले. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की खराब हवामानामुळे, याचा तपास नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) केला जाणार आहे.

अजित पवार यांच्यासह कोणाचा मृत्यू?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुंबई पोलीस दलातील हवालदार आणि अजित पवारांचे पीएसओ विदिप जाधव. विमानाचे मुख्य पायलट कॅप्टन सुमित कपूर,को-पायलट कॅप्टन शांभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचेही निधन झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com