Ajit pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव देणार? मिटकरींच्या मागणीवर CM फडणवीस यांचे 'पॉझिटिव्ह' उत्तर

Maharashtra government scheme News : राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी या योजनेसाठी मोठ्या निधीची तरतूद केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की या योजनेला त्यांचे नाव मिळावे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : बारामतीनजीक झालेल्या विमान अपघातात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अजितदादांची अकाली एक्झिट सर्वांनाच चटका लावणारी ठरली आहे. त्यातच आता राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचे नाव देण्याची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. मिटकरींच्या या मागणीनंतर त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले.

'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'ला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव द्या, अशी मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. अजितदादांच्या दुरदृष्टीतून आलेल्या या योजनेला 'अजितदादांची लाडकी बहिण योजना' असे नाव देत त्यांच्या स्मृती सरकारने वेगळ्या पद्धतीने जपाव्यात, असे अमोल मिटकरी म्हणाले होते. राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी या योजनेसाठी मोठ्या निधीची तरतूद केली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की या योजनेला त्यांचे नाव मिळावे.

लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचे नाव देण्याबाबत माध्यमांनी देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारताच त्यांनी महत्वाची माहिती दिली. लाडकी बहीण योजनेबाबत अनेक मागण्या आहेत. याबाबत आम्ही बसून निर्णय घेऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेला राज्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विधानसभा निवडणुकीत या योजनेमुळेच महायुतीला बहुमत मिळाले. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुन्हा एकदा राज्यात सरकार आले. यासाठी सीएम देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे परिश्रम घेतले होते. विशेष म्हणजे अर्थमंत्री म्हणून योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात अजित पवार यांची भूमिका महत्वपूर्ण ठरली होती. विरोधकांच्या टीकेनंतरही आजही ती यॊजना सुरु आहे.

निवडणुकांच्या तोंडावर प्रत्येक पक्ष या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अजित पवार यांच्या निधनांनंतर त्यांचे नाव या योजनेला दिल्यास राष्ट्रवादीला मोठा राजकीय फायदा होऊ शकतो, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अशाप्रकारची मागणी केली जात आहे. 'लाडकी बहीण' ही योजना सध्या राज्यातील प्रत्येक गावागावात व प्रत्येकाच्या घरपर्यंत पोहोचली आहे. या योजनेसोबत नाव जोडले गेल्यास अजित पवारांची प्रतिमा 'बहिणींचा पाठीराखा' म्हणून अधिक गडद होईल, त्यामुळे अशाप्रकारची मागणी केली जात आहे.

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचे नाव देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सर्वांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान, लाडकी बहीण योजनेसारख्या योजनांमुळे राज्यांची महसुली तूट वाढत आहे, महाराष्ट्र हे महसुली तुटीमध्ये गेले असल्याचे निरीक्षण यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात मांडण्यात आले. त्यामुळे आगामी काळात राज्य सरकार कशा पद्धतीने परिस्थिती हाताळणार, तसेच कोणता महत्वाचा निर्णय घेणार, याकडे सर्व लाडक्या बहीणींचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT