Mumbai News : स्वर्गीय अजित पवार महायुती सोडणार होते, असा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी लोंढे यांच्या दाव्यावर आक्षेप घेत त्यांच्याकडे पुरावे मागितले आहेत. अजितदादांच्या राजकीय भूमिकेबाबत त्यांच्या निधनानंतर दावे करताना अधिक जबाबदारीने बोलणे अपेक्षित असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
अतुल लोंढे यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) ‘वापरा आणि फेका’ (Use and Throw) या राजकीय धोरणाचा अवलंब करत असल्याची टीका केली होती. मित्रपक्षांना सोबत घेऊन सत्ता मिळवायची आणि त्यानंतर त्यांचे राजकीय महत्त्व कमी करायचे, अशी भाजपची कार्यपद्धती असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच स्व. अजित पवार महायुतीतून बाहेर पडण्याच्या तयारीत होते, असा दावाही त्यांनी केला.
लोंढे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी जोरदार पलटवार करताना ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. उमेश पाटील यांनी, अतुल लोंढे यांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ ठोस पुरावा सादर करावा, अशी मागणी केली. तसेच अजितदादांचे कोणते अधिकृत विधान, पत्र किंवा विश्वासार्ह नोंद आपल्या दाव्याला पुष्टी देते, हे महाराष्ट्रासमोर जाहीर करावे, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.
राजकारणात आरोप करण्याचा अधिकार सर्वांना आहे; मात्र आरोप सिद्ध करण्याची जबाबदारीही आरोप करणाऱ्याचीच असते. स्व. अजितदादांच्या राजकीय भूमिकेबाबत त्यांच्या निधनानंतर दावे करताना अधिक जबाबदारीने बोलणे अपेक्षित आहे, असेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपच्या ‘वापरा आणि फेका’ या धोरणाबाबत बोलताना उमेश पाटील यांनी भाजप आणि मित्रपक्षांच्या राजकीय संबंधांचा इतिहासही समोर ठेवला. अतुल लोंढे यांनी राजकीय आरोप करताना इतिहास आणि आकडेवारी तपासावी. भाजपची नीती ‘वापरा आणि फेका’ असल्याचा आरोप करताना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) इतिहास आणि भाजपचे मित्रपक्षांशी असलेले दीर्घकालीन संबंध दुर्लक्षित करता येणार नाहीत, असे पाटील म्हणाले.
यावेळी त्यांनी भाजप आणि विविध मित्रपक्षांमधील राजकीय संबंधांचा कालावधी पुढीलप्रमाणे सांगितला.
शिवसेना – भाजप : ३७ वर्षांचा राजकीय संबंधांचा इतिहास
जनता दल (युनायटेड)/समता पार्टी – भाजप : ३० वर्षे
तेलुगू देसम – भाजप : २८ वर्षे
अपना दल – भाजप : १२ वर्षे
आसाम गण परिषद – भाजप : १० वर्षे
NDPP – भाजप : ८ वर्षे
निषाद पार्टी – भाजप : ७ वर्षे
जनता दल (सेक्युलर) – भाजप : ३ वर्षे
राष्ट्रवादी काँग्रेस – भाजप : ३ वर्षांहून अधिक काळ
या राजकीय संबंधांमध्ये काही वेळा मतभेद झाले, युती तुटल्या आणि पुन्हा जुळल्याही, ही वस्तुस्थिती असल्याचे पाटील यांनी मान्य केले. मात्र, दशकानुदशके टिकलेल्या राजकीय सहकार्याकडे दुर्लक्ष करून भाजपच्या कार्यपद्धतीला सरसकट ‘वापरा आणि फेका’ असे संबोधणे कितपत वस्तुनिष्ठ आहे, असा सवाल त्यांनी केला.
अतुल लोंढे यांनी केलेल्या राजकीय आरोपांना उत्तर देताना इतिहास आणि आकडेवारीचा आधार घ्यावा. तसेच स्व. अजित पवार महायुती सोडणार होते, या दाव्यालाही ठोस पुराव्याची जोड द्यावी. राजकीय आरोपांना उत्तर तथ्यांच्या आधारेच मिळाले पाहिजे, अशी भूमिका उमेश पाटील यांनी मांडली. अतुल लोंढे यांचा अजित पवार महायुती सोडणार असल्याचा दावा आणि त्यावर उमेश पाटील यांनी उपस्थित केलेले पुराव्याचे प्रश्न यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.