NCP Leader : अजित पवारांच्या विमान अपघातावरून राजकारण तापले! रामदास कदमांनंतर आता उमेश पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, 'तो घातपात...'

Umesh Patil's Big Claim On Ajit Pawar : अजित पवार यांच्या विमान अपघातावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्यास सुरूवात झाली आहे.
Umesh Patil statement on Ajit Pawar death
Umesh Patil statement on Ajit Pawar deathSarkarnama
Published on: 
Updated on: 

Baramati News : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली होती. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनीही अजित पवार यांच्या अपघाताबाबत मोठे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात निधन झाले. मात्र, या अपघाताबाबत सुरुवातीपासूनच विविध शंका उपस्थित केल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अजित पवार यांचे कुटुंबीय आणि राज्य सरकारकडून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, उपलब्ध माहितीनुसार या प्रकरणाचा तपास अद्याप सीबीआयकडे वर्ग झालेला नसून राज्याच्या सीआयडी आणि संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही अनेकदा या अपघातामागे घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. त्यातच आता रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर संशय व्यक्त करत त्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी केली. या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच उमेश पाटील यांनी मंगळवारी (ता. 10) अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केले.

Umesh Patil statement on Ajit Pawar death
Ramdas Kadam : रामदास कदम शिवसेनेत एकाकी? एकनाथ शिंदेंना फोन करून व्यक्त केली खंत; 'स्वकीयांविरोधात' तक्रार

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना उमेश पाटील म्हणाले, "दादांचा हा अपघात होता की घातपात, यावर सातत्याने चर्चा होत आहे. मला तर असं वाटतं की हा घातपात असावा. यावर खूप चर्चा झाली आहे. मात्र, ज्याने कोणी हे कृत्य केले असेल, त्याला देवही माफ करणार नाही. त्याचा परिणाम त्याच्या सात पिढ्यांना भोगावा लागेल."

'दादांशिवाय पाडवा साजरा करणे पटत नाही'

अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देताना उमेश पाटील भावूक झाले. ते म्हणाले, "खरंतर प्रचंड दुःख आहे. दादांशिवाय पाडवा साजरा करणे मनाला पटत नाही. पाडव्याचा सण म्हटलं की काटेवाडी आणि तिथे जाऊन दादांना भेटणं, हाच आमचा पाडवा असायचा. पाडव्याच्या दिवशी दादांना भेटण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने लोक येत असत. दादांची उणीव कायमस्वरूपी जाणवत राहणार आहे. मागच्या शंभर वर्षांत आणि पुढच्या शंभर वर्षांतही त्यांच्यासारखा नेता होणे कठीण आहे."

शरद पवारांच्या भेटीवरून उमेश पाटील आक्रमक

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या भेटीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर उमेश पाटील यांनी स्पष्ट भूमिका मांडली.

ते म्हणाले, "आमच्या पक्षातील कोणत्या आमदाराने आपल्याला असं सांगितलं आहे का? कोणी ट्विट केलं आहे का? कोणी ऑफ द रेकॉर्ड बोललं आहे का? मग आमदार शरद पवारांना भेटणार आणि विलीनीकरणाची चर्चा करणार, हे तुम्हीच कसं ठरवत आहात? आमच्या आमदारांच्या मनात विलीनीकरणाबाबत काय आहे, हे आम्हाला माहिती आहे. आमदारांच्या मनात तशी भावना असती तर आमची पावलेही त्या दिशेने पडली असती." दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत सध्या कोणतीही चर्चा सुरू नसल्याचा दावाही त्यांनी केला. वैयक्तिक भेटींना विलीनीकरणाच्या चर्चेचा रंग दिला जात असल्याचेही उमेश पाटील यांनी स्पष्ट केले.

रामदास कदमांना उमेश पाटलांचा थेट सल्ला

सुनील तटकरे यांच्याबाबत रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवरही उमेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. कदम यांनी यापूर्वीही तटकरे यांच्यावर आरोप केले आहेत. मात्र, आता त्यांनी पुराव्याशिवाय आरोप करू नयेत, असे उमेश पाटील म्हणाले. "रामदास कदम यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी ते समोर आणावेत.

कोकणात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जुना संघर्ष आहे. त्या जुन्या संघर्षातून ते अशी वक्तव्ये करत आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो. रामदास कदम हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी जबाबदारीने बोलले पाहिजे. यापूर्वीही त्यांच्या वक्तव्यांमुळे पक्ष अडचणीत आला आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या ज्येष्ठत्वाचा आणि पदाचा मान राखला पाहिजे," असा सल्ला उमेश पाटील यांनी दिला.

नेमकं काय म्हणाले होते रामदास कदम?

रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप करत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासात त्यांच्या भूमिकेचीही चौकशी करण्याची मागणी केली होती. "हा अंतुले साहेबांचा पीए होता. अंतुले साहेबांना यानेच संपवलं. जो जो माणूस तटकरे यांना जवळ करतो, त्यालाच संपवण्याचं काम तो करतोय. त्याला स्वतःला उपमुख्यमंत्री व्हायचं होतं, असं मी ऐकतोय.

मग अजितदादांच्या घातपातामागे याचाही हात होता का? या दिशेने तपास झाला पाहिजे. त्याची राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. ती पूर्ण करण्यासाठी तो काहीही करू शकतो," अशा शब्दांत कदम यांनी आरोप केले होते. दरम्यान, रामदास कदम यांनी केलेले सर्व आरोप सुनील तटकरे यांनी फेटाळून लावले आहेत. आपल्यावरील आरोप खोटे आणि निराधार असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

Umesh Patil statement on Ajit Pawar death
Ramdas Kadam : शिवसेनेला मोठा धक्का देण्याचा भाजपचा प्लॅन? कदमांनी थेट नाव घेत 'या' 2 आमदारांवर केला खळबळजनक आरोप!

अजित पवार यांच्या विमान अपघातावरून सुरू झालेला संशय, नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता या प्रकरणाच्या तपासातून नेमकी काय माहिती समोर येते आणि राजकीय नेत्यांच्या आरोपांना काय उत्तर मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.