Gadchiroli News : नागपूर ते गडचिरोली प्रवास करीत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे हेलिकॉप्टर ढगाळ वातावरणामुळे भरकटले. या हेलिकॅाप्टरमध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, उद्योगमंत्री उदय सामंत हेदेखील होते. पायलटने प्रसंगावधान दाखवत हेलिकॅाप्टर जमिनीवर उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर गडचिरोली येथील कार्यक्रमावेळी अजितदादांनी मी पांडुरंग, पांडुरंग असा धावा करीत होतो मात्र, फडणवीस मात्र एकदम कूल कूल होते, असा हेलिकॉप्टर भरकटल्यांनंतरचा पोटात गोळा आणणारा संपूर्ण किस्साच सांगितला.
गडचिरोली जिल्ह्यातील वडलापेठ येथील कारखान्याचा भूमिपूजन सोहळा बुधवारी पार पडला. या सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) एकाच हेलिकॉप्टरमधून जात होते. या प्रवासादरम्यान त्यांचे हेलिकॅाप्टर खराब वातावरणामुळे ढगात भरकटले. अजितदादांनी त्यांच्या भाषणावेळीच गडचिरोलीकडे येताना हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर पोटात गोळा आल्याचा हा प्रसंग सर्वांसमोर सांगितला. (Ajit Pawar News)
नागपुरातून उड्डाण केले तेव्हा बरे वाटत होते, मात्र गडचिरोलीजवळ आलो, हेलिकॉप्टर ढगात शिरले, तेव्हा माझ्या पोटात गोळा आला. मी इकडे तिकडे पाहत होतो. मात्र, यावेळी वेगवेगळया विषयावर गप्पा मारण्यात फडणवीस हे मश्गुल होते. यावेळी मी त्यांना हेलिकॉप्टर भरकटले असून ढगांमधून ढगात जात असल्याचे सांगितले. एवढे सांगूनही फडणवीस मात्र कूल कुलच होते.
सर्वजण घाबरून गेलो होतो, मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) निवांत होते. त्यांना म्हणालो पहा आपण ढगात जात आहोत. तेव्हा फडणवीस म्हणाले घाबरु नका, माझे आजवर सहावेळा अपघात झाले आहेत. मला मात्र कधीही काही झाले नाही. मी हेलिकॉप्टरला असलो तर कधी ही काही होत नाही. माझ्या नखाला देखील धक्का लागला नाही. यावेळेस देखील काहीच होणार नसल्याचे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.
जमीन दिसत नसल्याने मी घाबरून गेलो होतो. आज आषाढी एकादशी असल्याने आपसूकच तोंडात पांडुरंग, पांडुरंग असा धावा मी करीत होतो. त्यानंतर काही वेळातच उदय सामंत म्हणाले, दादा जमीन दिसत आहे.
यामधील गंमतीचा भाग सोडला तर सामंत यांनी सांगितल्यानंतर दोन ते तीन मिनिटातच आम्ही सुखरूप लँड झालो. त्यानंतर मी सुटकेचा निश्वास सोडला, असा किस्सा दादांनी यावेळी सांगितला. त्यावेळी, उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. दरम्यान, बुधवारी दुपारी काही वेळासाठी दोन उपमुख्यमंत्री असलेले हेलीकॉप्टर भरकटल्याची माहिती समोर येताच प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.