Chhagan Bhujbal Sarkarnama
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal : मुलगा आमदार, मुलगी मंत्री, वडील खासदार; मग मला तोच न्याय का नाही? भुजबळांची खदखद अन् राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोटात भूकंप

Rajendra Jain gets Rajya Sabha ticket from NCP; Chhagan Bhujbal indirect remarks spark fresh political buzz : राज्यसभा तिकीट हुकल्यानंतर छगन भुजबळांची खदखद मोजक्याच शब्दात व्यक्त करताना, 'मी कबड्डीचा खेळाडू, शतरंजचा नाही' म्हणत नाराजी व्यक्त केली आहे.

Pradeep Pendhare

NCP Rajya Sabha Candidate : राज्यसभेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अखेर कोणाला संधी मिळणार, याबाबत सोमवारी उशिरापर्यंत मोठी खलबते सुरू होती. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या बंगल्यावर झालेल्या मध्यरात्रीच्या बैठकीनंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राजेंद्र जैन यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

मात्र या घडामोडींनंतर राज्यसभेच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

दिल्लीतील पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राजेंद्र जैन यांना उमेदवारी मिळाल्यानंतर भुजबळ (Chhagan Bhujbal) समर्थकांमध्ये नाराजीची भावना असल्याचे बोलले जात आहे. स्वतः छगन भुजबळ हे राज्यसभेसाठी इच्छुक होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. मात्र त्यांनी पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात संधी मिळावी आणि त्यानंतरच आपण राज्यसभेवर जाऊ, अशी अट पक्ष नेतृत्वासमोर ठेवल्याचे सांगितले जाते. याच अटीमुळे त्यांच्या राज्यसभा प्रवेशाचा मार्ग बंद झाल्याची चर्चा आहे.

भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांवर राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. भुजबळ नाराज नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. याच मुद्द्यावर प्रतिक्रिया विचारली असता शरद पवार यांनी मात्र मौन बाळगले.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी स्वतःच्या मनातील भावना मोजक्या पण सूचक शब्दांत व्यक्त केल्या. अन्याय काय, हे चालायचंच आता. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, हे आमचं धोरण आहे, असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी हिंदीत केलेली टिप्पणी अधिकच चर्चेत आली. मैं कबड्डी का खिलाड़ी हूं, शतरंज का खिलाड़ी नहीं हूं, असे म्हणत त्यांनी राजकीय डावपेचांवर अप्रत्यक्ष भाष्य केले.

भुजबळ यांनी खुलासा करताना सांगितले की, समीर भुजबळ यांना मंत्रिपद आणि स्वतःला राज्यसभेची उमेदवारी असा प्रस्ताव त्यांनी भाजपसमोर ठेवला होता. मात्र त्यावर निर्णय घेण्यासाठी वेळ कमी होता. भाजपकडून कोणतेही स्पष्ट उत्तर मिळाले नाही. फक्त मंत्रिमंडळ विस्तारानंतर समीर भुजबळ यांच्या नावाचा विचार केला जाईल, असे सांगण्यात आले.

माझा प्रस्ताव नाकारण्यात आलेला नाही. मी नाराजही नाही. पण इतरांना जो न्याय मिळाला, तो मलाही मिळायला हवा, एवढीच अपेक्षा आहे. काही जण राज्यसभा, लोकसभा सदस्य आहेत आणि त्यांची मुलं मंत्रीपदावर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून मी पक्षासाठी काम केले आहे. त्यामुळे मलाही तोच न्याय मिळायला हवा, असे भुजबळ यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

भुजबळांच्या या विधानानंतर पक्षांतर्गत राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे त्यांच्या वक्तव्याचा रोख थेट सुनील तटकरे यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सुनील तटकरे हे स्वतः खासदार असून केंद्रात पक्षाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांची कन्या आदिती तटकरे या राज्य मंत्रिमंडळात महिला व बालविकास मंत्री आहेत. तर पुत्र अनिकेत तटकरे यांची नुकतीच विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे.

यामुळे इतरांना मिळालेला न्याय मलाही मिळावा, या भुजबळांच्या विधानामागे नेमका कोणता राजकीय संदेश दडलेला आहे, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात जोरदार चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT