Sunil Tatkare thumb injury controversy : नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात याच्या सर्वपक्षीय कृपेवरून, राज्यातील राजकारण चांगलच ढवळून निघालं आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झालेल्या खरात याचे रूपाली चाकणकर याच्याशी असलेल्या अध्यात्मिक संबंधावरून, त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला.
यावरून रूपाली चाकणकर आणि सुनील तटकरे यांच्या हाताच्या बोटांच्या जखमावरून अन् त्यावरील मलमपट्टीवरून, अजित पवार राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता तथा संघटक सचिव विलास लवांडे यांनी, अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या जखमी अंगठ्याचे फोटो शेअर करत, तिखट प्रश्न विचारले. लवांडे यांच्या या प्रश्नांवर, अजित पवार राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे चांगलेच आक्रमक झाले अन् कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सुनावले.
विलास लवांडे यांनी, सुनील तटकरेंचे जखमी अंगठ्यासह फोटो एक्सवर शेअर करत, अहो सुनील तटकरे साहेब (Sunil Tatkare) तुमच्या फोटोमध्ये बोटाच्या जखमेचे रहस्य काय आहे? लिंगपिसाट भोंदू बाबा अशोक खरातच्या नादी लागून कुठं रक्ताचा अभिषेक केला होता का? कुणी तर्जनी, कुणी अंगठा कापून घेतला आहे. काय भानगड कळत नाही. जरा खराखुरा खुलासा होऊ द्या साहेब! आपण ज्येष्ठ नेते आहात बिनधास्त बोला साहेब! त्या अशोक खरातची कॅप्टन फाईल असली तरी, तुम्हाला कसली भीती? तुम्ही खरं खरं बोलाच! महाराष्ट्र वाट बघतोय, अशी विचारणा केली.
विलास लवांडे यांच्या या पोस्टवर, आनंद परांजपे यांनी, पलटवार केला. विलास लवांडे यांनी उपस्थित केलेले प्रश्न व सोशल मीडियावरील पोस्ट अत्यंत खालच्या पातळीची आहे. प्रचारादरम्यान त्यांना ही दुखापत झाली होती. त्याचा कोणत्याही वादग्रस्त प्रकरणाशी संबंध नाही. परांजपे यांनी इशारा देत असेही म्हटले की, लवांडे ठाण्यात आल्यास कार्यकर्ते त्यांना योग्य उत्तर देतील. तसेच, विनाकारण आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी ठोस पुरावे असल्यास ते तपास यंत्रणांकडे सादर करावेत, असे स्पष्ट केले.
परांजपे यांनी दिलेल्या इशाऱ्यावर विलास लवांडे यांनी पुन्हा एक्सवर पोस्ट करत, परांजपे यांना पुन्हा शेलक्या सुनावलं. ठाण्याचे बादशहा आदरणीय आनंद परांजपे साहेब आपण पुरोगामी आहात ना? आपल्या कपाळावर तीन बोटाचा उभा गंध कोणत्या बाबाचा आहे? आधी एक मोठा गोल टीळा होता. आता आणखी तीन उभे पट्टे कोणत्या बाबाचे आहेत? कपाळावर जागा तरी शिल्लक ठेवा राव, अशी टोलेबाजी केली आहे.
विलास लवांडे एवढ्यावरच थांबले नाहीत, बाकी आदरणीय तटकरे साहेबांच्या अंगठ्याच्या जखमेचा खुलासा न देता मला ठाण्यात आल्यावर मारण्याची धमकी देताय? कायदेशीर कारवाईची मला धमकी देताय? मी तर आदरणीय तटकरे यांच्यावर कोणताच आरोप केला नाही. फक्त नम्रपणे काही प्रश्न विचारलेत, कारण त्यांच्यासारख्या ज्येष्ठ पुरोगामी नेत्याची बदनामी मला सहन होत नाही, म्हणून खुलासा करण्याची मागणी केली आहे, असे म्हटले.
यात बदनामी कसली? असो तुमचे आडवे उभे गंध, तुमचे गंडेदोरे, तुमचे बुवा-बाबा तुम्हाला लखलाभ असोत पण पुरोगामी म्हणत महाराष्ट्राची आणि स्वपक्षाच्या कार्यकर्त्यांची फसवणूक का करता? ठाण्यात मी कधी कुठे येऊ सांग भाऊ? असं प्रश्न करत विलास लवांडे यांनी आनंद परांजपे यांना चॅलेंज केलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.