Jayant Patil - Ajit Pawar - Sadabhau Khot
Jayant Patil - Ajit Pawar - Sadabhau Khot  Sarkarnama
महाराष्ट्र

जयंत पाटील - सदाभाऊंच्या मैत्रीची चर्चा; अजितदादा म्हणाले "कोणी कायमचा शत्रू नसतो"

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्या मैत्रीच्या चर्चा आज राज्याच्या सभागृहात देखील झाल्या. ७ जुलै २०२२ रोजी कार्यकाळ संपून निवृत्त होत असलेल्या १० विधान परिषद सदस्यांचा सभागृहात आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निरोप समारंभ पार पडला. यात सदाभाऊ खोत यांचाही समावेश आहे. यावेळी निरोपाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पाटील-खोत मैत्रीवर कोपरखळ्या मारल्या.

अजित पवार म्हणाले, सदाभाऊ खोत यांच्या भविष्यातील वाटचालीला माझ्या शुभेच्छा. शेतकरी चळवळीतून पुढे आलेला नेता म्हणून त्यांना ओळखलं जातं. सातवी पर्यंत शिक्षण पण राज्याच्या मंत्रीमंडळात काम करण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. यापूर्वी छातीवर लावलेल्या बिल्ल्यांची आणि शेतकऱ्यांची ही पुण्याई आहे. मधल्या काळात राजू शेट्टी यांचा हात त्यांनी सोडला आणि आता एकटेच ते पुढे खूप पुढे निघाले आहेत, असा टोलाही त्यांनी खोत यांना लगावला.

पण मध्ये मध्ये आम्हाला काही बातम्या ऐकायला मिळत असतात. ते जयंत पाटील यांच्यासोबत गप्पा मारताना दिसतात. आता काय गप्पा मारतात हे मला माहित नाही. पण ते इतक्यात काही एकत्र येतील असं वाटतं नाही. मात्र एक गोष्ट खरी आहे की, राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू नसतो. हे आपल्याला माहित आहे, असे म्हणतं अजित पवार यांनी सुचक विधानही केले. सोबतच आता सदाभऊंचा ड्रेस एकदम पांढरा शुभ्र आहे. शिवाय पूर्वी आंदोलनाने रापलेला चेहरा आता रापलेला दिसत नाही, त्यांच्या चेहऱ्यावर नवं तेज आलयं. हे तेज असेच राहो. अशा शुभेच्छा पवार यांनी दिल्या.

काही दिवसांपूर्वी जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत इस्लामपूरमध्ये एका कामाचा शुभारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर आले होते. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने हे देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी जयंतरावांनी सदाभाऊंना कॅडबरी भरवत आणि कटूता दूर करत ‘कुछ मिठा हो जाए’चा संदेश पेरला होता. या दोन्ही नेत्यांमध्ये खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळाले, होते. पाटील यांनी खोत यांना जेवाचे निमंत्रण देण्याबाबतही विचारणा केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT