Ajit Pawar, Amol Mitkari Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar News: ‘अजितदादा... आय लव्ह यू!’ ... खूप मिस करतोय..मिटकरींचं व्हॅलेंटाईन पत्र

Amol Mitkari expresses heartfelt emotions for Ajit pawar "अनेकांना अप्रिय वाटणारा मी मात्र दादांना प्रिय होतो, असे सांगताना ते भावूक झाले. परिवार व समाजाकडून दूर लोटले गेल्याची भावना व्यक्त करत, सुख-दुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे दादा तुम्हीच होता, असे त्यांनी लिहिले.

योगेश फरपट

अकोला: आज व्हॅलेंटाईन डे म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीवरचं प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. आपल्या राजकीय नेत्यावर  कार्यकर्तेही जीवापाड प्रेम करीत असतात. पण आजचा 'व्हॅलेंटाईन डे' हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यासाठी अत्यंत अस्वस्थ करणारा दिवस असणार आहे.

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी भावपूर्ण आशय असलेले एक पत्र सोशल मीडियावर शेअर केले आहे.

राजकीय व सामाजिक वर्तुळात त्याची चर्चा रंगली आहे. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने लिहिलेल्या या पत्राची सुरुवात ‘तिर्थरूप आदरणीय दादा.. नमस्कार....! “माझे बुडविले घर । लेकर बाळे दारोदार । लावली काहार । तारातीर करोनी ।।”’ या ओळींनी करत त्यांनी दादांप्रती असलेला जिव्हाळा, कृतज्ञता आणि सहवासातील आठवणींना उजाळा देत ‘अजितदादा... आय लव्ह यू!’ म्हटले आहे.

पत्रात मिटकरी म्हणतात, तुम्ही दिवंगत झालात या शब्दावर माझा विश्वास बसत नाही; माझं मन ते मान्य करायला तयार नाही. २०१९ मध्ये राजकीय आयुष्यात संधी देत पक्षात घेतले, जबाबदाऱ्या सोपवल्या आणि आमदार होण्यापर्यंतचा प्रवास घडवून आणला, याची त्यांनी कृतज्ञतेने आठवण करून दिली. इज्जत, राजकीय प्रतिष्ठा आणि कामाची शिस्त तुम्ही दिलीत. चुका झाल्या तेव्हा त्या दुरुस्त करून पुढे जाण्याचा धडा दिलात, असेही त्यांनी नमूद केले.

अनेकांना अप्रिय वाटणारा मी मात्र दादांना प्रिय होतो, असे सांगताना ते भावूक झाले. परिवार व समाजाकडून दूर लोटले गेल्याची भावना व्यक्त करत, सुख-दुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे दादा तुम्हीच होता, असे त्यांनी लिहिले. वाढदिवशी पहिला फोन दादांचाच असायचा, ही आठवणही त्यांनी शेअर केली. दादांच्या सर्वसमावेशक व सामाजिक भूमिकेचा उल्लेख करताना त्यांनी भीमा कोरेगाव येथे दरवर्षी अभिवादन करत स्वाभिमानाने ‘जयभीम’ म्हणणारा त्यांचा आवाज आता ऐकू येणार नाही, याची खंत व्यक्त केली.

शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांवरील समान श्रद्धा हा दोघांमधील मजबूत दुवा असल्याचेही त्यांनी नमूद केले. जनतेसाठी ‘लव्ह यू’ हा संदेश देणाऱ्या दादांना आज मी ‘आय लव्ह यू’ म्हणतो... खूप मिस करतोय, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एकादशीच्या दिवशी त्यांच्या प्रेरणेने आपण विठोबा भक्तीत रमलो, अशी आठवण सांगताना त्यांनी हळहळ व्यक्त केली. शेवटी ‘जय शिवराय, जयभीम, जय महाराष्ट्र’ असा संदेश देत मिटकरी यांनी दादांप्रती असलेले प्रेम आणि आदर अधोरेखित केला आहे. त्यांच्या या भावनिक पत्रामुळे राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असून, गुरु-शिष्य नात्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT