Ajit Pawar
Ajit Pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawars NCP Exit Poll: अजितदादांचं बंड महाराष्ट्राला रुचलं नाही? 'एक्झिट पोल'मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला अवघी एक जागा...

Jagdish Patil

Ajit Pawars NCP Exit Poll: महाराष्ट्रात मागील दोन वर्षात अनेक अनपेक्षित घटना घडल्या. यामध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर अजित पवारांनी शिंदे-भाजप सरकारला दिलेली साथ यांचा समावेश आहे. तर या सर्वामागे भाजपचा हात असल्याचं कालांतराने उघड झालं. शिवाय भाजपने हा सर्व डाव लोकसभेसाठीच मांडल्याचं बोललं जात आहे. काहीही करुन नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी भाजपने विरोधकांना जवळ केलं होतं.

मात्र, भाजपचा हा डाव फसला की काय? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. कारण शनिवारी (1 जून) रोजी समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार भाजपशी हातमिळवणी करुन सत्तेत सहभागी झालेल्या मित्र पक्षांना म्हणावं असं यश मिळत नसल्याचं पाहायला मिळत आहे. एबीपी सी-वोटरच्या पोलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (Ajit Pawar) तर केवळ एका जागेवर समाधान मानावं लागणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे दादांचं बंड फसल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यातील 4 मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार देण्यात आले होते. मात्र आता या उमेदवारांपैकी केवळ दादांचा एकच उमेदवार निवडूण येणार असल्याचा अंदाज पोलमध्ये व्यक्त केला आहे. त्यामुळे दादांची साथ भाजपला म्हणावी अशी फायद्याची ठरली नसल्याचं बोललं जात आहे. अजितदादा महायुतीत सामील झाल्यापासून शिंदेंच्या शिवसेनेतील आणि भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा होत्या. तर काही नेत्यांनी उघड उघड अजितदादांना विरोध केल्याचंही पाहायला मिळालं.

वरिष्ठांनी समजूत काढल्यानंतर या नेत्यांनी आपली नाराजी लपवली असली तरी या नाराज नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रामाणिकपणे काम केलं की नाही? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. तर नेमकं कोणी कोणाचं काम केलं याचं चित्र चार जूनला स्पष्ट होणार आहे. मात्र, आज समोर आलेली एक्झिट पोलची आकडेवारी मात्र अजित पवारांच्या गटाची धाकधूक वाढवणारी आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT