Ambadas Danve addressing the media while questioning Devendra Fadnavis and Chandrashekhar Bawankule over the Mundhwa land scam after Sheetal Tejwani’s arrest. Sarkarnama
महाराष्ट्र

Ambadas Danve : पार्थ पवारांच्या अटेकासाठी अंबादास दानवेंचे प्रयत्न : फडणवीस, बावनकुळेंना केला एकच सवाल

Mundhwa Land Scam : अंबादास दानवे यांनी मुंढवा जमीन घोटाळ्यात शीतल तेजवानी अटकेनंतर फडणवीस व बावनकुळे यांना प्रश्न विचारत पार्थ पवार यांच्यावर कारवाई का नाही, असा थेट सवाल उपस्थित केला.

Jagdish Pansare

Shivsena UBT News : राज्यभरात गाजत असलेल्या पुण्याजवळील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी अखेर शीतल तेजवानी या महिलेला अटक केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे नाव जमीन खरेदी-विक्री घोटाळ्याशी जोडले गेले असल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी लावून धरली आहे.

तेजवानी यांना अटक झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जनतेच्या वतीने काही प्रश्न विचारत, पार्थ पवारला अटक का नाही? अशी विचारणा केली आहे. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातली संशयित शीतल तेजवानी यांना पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केल्याची माहिती पोलीस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या कंपनीला पुण्याच्या मुंढवा भागातली ही जमीन 300 कोटी रुपयांना विकण्यासंदर्भातल्या व्यवहाराशी शीतल तेजवानी यांचा संबंध आहे. ही 40 एकर जमीन सरकारच्या मालकीची असून वनस्पतीशास्त्र सर्वेक्षण विभागाला भाड्याने दिलेली होती. या प्रकरणात पार्थ पवार संशयित नसले, तरी विक्रीपत्रावर त्यांचं नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.

तेजवानी यांना अटक झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सरकार आणि पोलिसांच्या कारवाईबद्दल काही प्रश्न उपस्थितीत केले होते. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनीही सातत्याने या प्रकरणावरून अजित पवार आणि महायुती सरकारवर ते पार्थ पवार यांना वाचवत असल्याचा आरोप केला होता. तेजवानी यांच्या अटकेनंतर दानवे यांनी मुख्यमंत्री, महसूल मंत्री यांना उद्देशून केलेल्या पोस्टमध्ये पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला 'अखेर' अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे, असे म्हटले आहे.

जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही? पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस 'मुदतवाढ-मुदतवाढ' खेळणार आहात?

अमेडिया कंपनीत केवळ 1 टक्का भागधारक दिग्विजय हा 99 टक्के भागधारक असलेल्या पार्थ पवारांच्या मर्जीशिवाय सायनिंग अथॉरिटी झाला का?

मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सरकार कधी जाहीर करणार? ही शुल्क माफी राजकीय दबावाशिवाय होणे शक्य नाही महोदय. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना याची कल्पना नाही असे सांगणे, हे जनतेला शुद्ध वेडे बनवणे आहे. ते ही बहुमताच्या जोरावर, असा टोला अंबादास दानवे यांनी यातून लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT