Congress MLA Amit Deshmukh speaking in the Maharashtra Assembly, questioning the government over security lapses after former Deputy Chief Minister Ajit Pawar’s fatal aircraft crash. Sarkarnama
महाराष्ट्र

Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघातात महाराष्ट्र सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात : काँग्रेस नेत्याचा अधिकाऱ्यांच्या 'शांततेवर' प्रहार

Maharashtra Assembly Session : अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यातील नेत्यांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत आमदार अमित देशमुख यांनी विधानसभा चर्चेत फडणवीस सरकारवर जोरदार टीका करत जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली.

Jagdish Pansare

Assembly Session 2026 : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राज्यातील नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातामागे घातपाताची शक्यता त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनीच व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना' या राज्यात उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर इतर कोणीही सुरक्षित नाही, अशा शब्दात सरकारवर हल्लाबोल चढवला.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन होऊन दीड महिना होत आला असला तरी, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची होती? हे अद्याप कोणत्याही यंत्रणेने पुढे येऊन सांगितलेले नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुरक्षित नसतील तर या राज्यात कोणीच सुरक्षित नाही, याकडे अमित देशमुख यांनी लक्ष वेधले. राज्याचा समतोल विकास साधायचा असेल तर सत्ताधारी आमदारांच्या मतदार संघासोबत विरोधी पक्षांच्या आमदारांच्या मतदारसंघातही विकास कामाला निधी देणे आवश्यक आहे.

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला, हा त्यांचा 12 वा अर्थसंकल्प होता, दुर्दैवाने हा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी विमान अपघातात त्यांचे निधन झाले आहे. त्यांचा प्रभाव असलेला हा अर्थसंकल्प राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केला आहे, या अर्थसंकल्पात राज्यातील अपघात, कायदा व सुव्यवस्था या संदर्भाने मुद्दे आलेले असले तरी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमानाचा अपघातात नेमक्या कोणत्या त्रुटीमुळे झाला आहे याचा संदर्भ यात आलेला नाही.

महाराष्ट्र सरकारने या संदर्भाने अद्याप पर्यंत कुठलीही भूमिका विशद केलेली नाही. गृह विभाग किंवा राजशिष्टाचार विभाग यांच्या सचिवाकडूनही अद्याप अधिकृतरित्या काही बोलले गेले आहे, असे माझ्या ऐकण्यात नाही. राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांच्या सुरक्षितेच्या संदर्भात नक्कीच नियमावली आहे. मात्र राज्यातील सुरक्षा यंत्रणा असो किंवा बारामती विमानतळाचे संचालन करणारे एमआयडीसी, एमएडीसी हे विभाग असतो. कोणीच या संदर्भाने पुढे येऊन काहीच भाष्य करत नाहीत ही अत्यंत गंभीर बाब आहे.

बारामती येथील अपघात लक्षात घेऊन बारामती, अमरावती आणि लातूर या विमानतळावर रात्रीच्या वेळी विमान उड्डाणाच्या व्यवस्था उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली आहे. ही बाब समाधानाची असली तरी, विमानतळ चालवण्यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान, कौशल्य आणि दीर्घ अनुभव असलेल्या एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडे महाराष्ट्रातील सर्व विमानतळे सुपूर्द करावीत, अशी मागणीही यावेळी अमित देशमुख यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT