Mumbai News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. शुक्रवारी त्यांनी मुंबईत मुक्काम केला तर शनिवारी दिवसभर कार्यक्रमाची रेलचेल होती. त्यातच शनिवारी सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा यांनी सीएम देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा केली. यावेळी त्यांनी येत्या काळात होत असलेल्या केंद्र, राज्य मंत्रिमंडळातील विस्ताराबाबत चर्चा केली असल्याचे समजते. लोकसभेचे पावसाळी अधिवेशन संपताच केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात येणार आहेत. त्यामध्ये राज्यातून कोणाला संधी मिळणार, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
संसदेचे गेल्या 15 दिवसापासून सुरु असलेले पावसाळी अधिवेशनाचे सूप येत्या आठवड्यात वाजणार आहे. त्यानंतर वेगवान घडामोडी घडणार आहेत. अधिवेशन संपल्यानंतर भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यासोबतच राज्यातील सरकारला सत्तेत येऊन दीड वर्षांपेक्षा अधिकचा काळ झाला आहे. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळातही काही फेरबदल केले जाणार असल्याचे समजते. त्यामुळेच सह्याद्री अतिथीगृहावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्याचे समजते.
या भेटीत मंत्रिमंडळातील फेरबदल आणि विस्तारावर चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे येत्या काळात लवकरच याबाबत निर्णय होऊ शकतो. या संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला दोन मंत्रिपद येणायची शक्यता आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे व श्रीरंग बारणे यांच्यापैकी एकाची कॅबिनेट मंत्रिपदी तर संजय जाधव व ओम राजेनिंबाळकर यांच्यापैकी एकचि राज्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते. दरम्यान, काही दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडून सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दरबारी दबदबा वाढला आहे.
त्यासोबतच येत्या काळात राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात फेरबदलाबाबतही शहा यांच्या सोबत या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. राज्यातील फडणवीस सरकारला आता दीड वर्ष झाले आहेत. त्यामुळे मंत्र्यांच्या कामगिरीचे मुल्यमापन करून आगामी राजकारण समोर ठेवत मंत्रिमंडळात फेरबदलाची मागणी जोर धरत आहे.
राज्य मंत्रिमंडळातील भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याच्या एक-एक अशा एकूण दोन जागा रिक्त आहेत. त्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळातही फेरबदलांची शक्यता वर्तविली जात आहे. त्याचवेळी सुमार कामगिरी असलेल्या मंत्र्यांना डच्चू मिळणार का? अशीही चर्चा या निमित्ताने रंगली आहे. त्यामुळे दोन्ही मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.