Eknath Shinde, Amit Shah, Narendra Modi Sarkarnama
महाराष्ट्र

Amit Shah Politics : अमित शहांचं थेट पंतप्रधानपदासाठी लॉबिंग? 'ऑपरेशन टायगर' नंतर आता 'ऑपरेशन 2029' ची चर्चा

Raj Thackeray On Amit Shah Operation 2029 : 'भाजप आज एकसंघ दिसत असला तरी पक्षामध्ये अनेक स्तरांवर मतभेद आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्त्वामुळे ते सध्या झाकले जात आहेत. मात्र भविष्यात नेतृत्व बदलाचा प्रश्न निर्माण झाल्यास हे मतभेद उघडपणे समोर येऊ शकतात.'

Jagdish Patil

Amit Shah Operation 2029 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यात केलेल्या एका विधानाने नव्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे आता 'ऑपरेशन टायगर' नंतर 'ऑपरेशन 2029' ची चर्चा सुरू झाली आहे.

भाजपमधील अंतर्गत संघर्ष वाढत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे 2029 च्या लोकसभा निवडणुकीसाठी आणि संभाव्य पंतप्रधानपदासाठी तयारी करत असल्याचा मोठा दावा राज ठाकरे यांनी केला. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 6 खासदारांची बंडखोरी ही याच मोठ्या राजकीय रणनीतीचा भाग असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी थेट भाजपच्या भविष्यातील नेतृत्वाच्या निर्णयावर देखील प्रश्न उपस्थित केले. भाजप आज एकसंघ दिसत असला तरी पक्षामध्ये अनेक स्तरांवर मतभेद आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यक्तिमत्त्वामुळे ते सध्या झाकले जात आहेत. मात्र भविष्यात नेतृत्व बदलाचा प्रश्न निर्माण झाल्यास हे मतभेद उघडपणे समोर येऊ शकतात, असा दावा राज यांनी केला आहे.

ते म्हणाले, 'भाजपने अनेक वर्षांपासून 75 वर्षांवरील नेत्यांना सक्रिय पदांपासून दूर ठेवण्याचे धोरण स्वीकारल्याचे सांगितले जाते. 2029 मध्ये नरेंद्र मोदी यांचे वय 79 वर्षे असेल. त्यामुळे पुढील पंतप्रधान कोण, हा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतो. भाजपने याबाबत कोणतीही अधिकृत भूमिका मांडलेली नसली तरी पक्षातील संभाव्य उत्तराधिकारी म्हणून अमित शाह यांचे नाव अनेकदा चर्चेत आले आहे.'

शिवाय भविष्यात जर भाजपमध्ये नेतृत्वाच्या मुद्द्यावर विरोध निर्माण झाला, तर स्वतःची राजकीय ताकद वाढवण्यासाठी अमित शाह आधीपासूनच घटकपक्ष मजबूत करण्याच्या रणनीतीवर काम करत आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेत झालेली फूट, विविध राज्यांतील राजकीय घडामोडी आणि सहयोगी पक्षांशी वाढलेले संबंध हे त्याच मोठ्या आराखड्याचा भाग असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

राज ठाकरेंच्या या दाव्यामुळे खरोखरच अमित शाह 2029 साठी स्वतंत्र राजकीय शक्तिकेंद्र उभे करत आहेत का? की हा केवळ विरोधकांचा राजकीय आरोप आहे? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपकडून अशा कोणत्याही तयारीची अधिकृत कबुली देण्यात आलेली नाही. उलट पक्षाचे नेते सातत्याने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच भाजप पुढे जात असल्याचा दावा केला जातो.

मात्र, राज ठाकरेंच्या आरोपामुळे आता 2029 च्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीबाबत, अमित शाह यांच्या संभाव्य भूमिकेबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय खरंच आता शहांनी "ऑपरेशन टायगर"नंतर आता "ऑपरेशन 2029" सुरू केलं आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT