Parbhani News : लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने येणारा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भारतीय जनता पक्ष व काँग्रेसची उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील जागावाटपासंदर्भात बैठकांचे सत्र सुरू आहेत. महायुतीमधील घटक पक्ष नाराज होऊ नये, याची खबरदारी घेत समाधानकारक जागा देण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. (Latest Marathi News)
मात्र खरा प्रश्न आहे तो पक्षचिन्हाचा. महायुती मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या लोकसभा मतदारसंघात उमेदवार जरी त्या पक्षाचे असले तरी त्यांचे पक्षचिन्ह मात्र कमळच असेल अशा प्रकारची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर भारतीय जनता पक्षावर फोडाफोडीचे आरोप झाले. लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 'अबकी बार चारसौ पार'चा नारा दिला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
यामुळेच राज्यातील सर्वच लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने निवडणुकीची तयारी सुरू केली. यामध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारसंघांचाही समावेश होता. भारतीय जनता पक्षाच्या या तयारीने महायुती मधील घटक पक्षांमध्ये नाराजीचा सूर उमटला. भारतीय जनता पक्षाला प्रादेशिक पक्ष संपवायचे आहेत, असाही आरोप करण्यात आला. महायुतीच्या जागा वाटपात राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 30-35 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे.
तर शिवसेना 10-12 व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 3-5 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते की, महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या राजकीय पक्षांना उमेदवारी दिली तरी त्यांचे पक्ष चिन्ह हे कमळच असेल. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस मधील फूट पडल्यानंतर दोन्ही बाजूंनी कायदेशीर लढाईमध्ये नियमांचा काथ्याकुट झाला.
निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह बहाल केले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला पक्षाचे नाव व घड्याळ चिन्ह मिळाले. परंतु महायुतीच्या जागा वाटपात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेल्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कमळ या पक्षचिन्ह निवडणूक लढवणार असतील तर पक्षाला मिळालेल्या नाव व चिन्हाचा उपयोग काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अर्थात शिवसेना-भाजपचे (BJP) सर्वच उमेदवार कमळ चिन्हावर (Lotus) लढणार असे नाही. पण भाजपचे चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमित शाह यांनी मुंबईत झालेल्या महायुतीच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हवेत उडणारे विमान त्यांच्या जागांचे दावे फेटाळत जमिनीवर आणले. त्यानंतरच उमेदवार महायुतीचा पण चिन्ह कमळच, याची चर्चा सुरु झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.