Amit Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Amit Thackeray : मोठी बातमी; आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या मैदानात, मतदारसंघासाठी चाचपणी सुरू

Amit Thackeray announced his decision to contest assembly elections in a meeting of MNS leaders and office bearers : मनसे नेते, पदाधिकारी आणि सरचिटणीस यांच्या बैठकीत अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मोठा निर्णय जाहीर केला.

Pradeep Pendhare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहेत. 'मविआ' आणि महायुती जागा वाटपात गुंतली असतानाच, राज्यात 'एकाला चलो-रे'च्या भूमिकेत असलेल्या 'मनसे'मध्ये देखील राजकीय उलथापालथींना वेग आलाय.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. मनसे नेते, सरचिटणीस आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत, तशी अमित ठाकरेंनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली. निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्यास ठाकरे परिवारातील आदित्य ठाकरेंनंतर अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे दुसरे ठाकरे ठरतील.

महाराष्ट्र आणि देशातील राजकारणात ठाकरे परिवाराचा दबदबा आहे. हिंदूहृदयस्रमाट बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईतील मराठी माणसांच्या हक्कांच्या लढ्यासाठी सुरू केलेली शिवसेना (Shiv Sena) राज्यातील राजकारणातील 'ब्रँण्ड' आहे. शिवसेनेच्या राजकीय वाटचालीत अनेक चढउतार आले. शिवसेना आतापर्यंत अनेदा फुटली. बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे राज ठाकरेंनी देखील शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत 'मनसे'ने कोणाशीही युती न करताना राज्यात 'एकला चलो-रे'ची भूमिका घेतली आहे.

राज ठाकरेंनी राज्यात 225 ते 250 जागा लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे राज्याच्या दौऱ्यावर करत आहे. बैठकांचे सत्र सुरू आहे. मनसेला ऊर्जित अवस्थेत आणण्यासाठी पिता-पुत्र वेगवेगळ्या पातळीवर राजकीय प्रयत्न करत आहेत. एकच आमदार असलेला मनसेला राज्यात स्वबळावर सत्ता आणायची आहे. यात कितपत यश येईल, हे येणारा काळच सांगेल. आता 'मनसे'त मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

'मनसे'चे नेते, सरचिटणीस आणि पदाधिकारी यांच्या बैठकीत अमित ठाकरेंनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. अमित ठाकरे नेमक्या कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवणार, याची चाचपणी देखील सुरू आहे. त्यामुळे अमित ठाकरे निवडणुकीच्या मैदानात दिसणार, असे खात्रीलायक सांगितले जात आहे. राज्यातील कोणत्याही मतदार संघातून आपली निवडणूक लढण्याची तयारी असल्याचं अमित ठाकरेंनी या बैठकीत सांगितलं.

नेत्यांनी निवडणूक लढवावी

'मनसे'च्या मुंबईतील राजगड कार्यालायत अमित ठाकरे यांच्या उपस्थित नेते, सरचिटणीस आणि पदाधिकारी यांची बैठक झाली. यात राज्यातील, विशेष करून मुंबईतील जागांवर मनसेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. अमित ठाकरे यांनी पक्षातील प्रत्येक नेत्यांनी निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी केली. यासाठी ते स्वतः देखील निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी दर्शवली. अमित ठाकरे यांची ही भूमिका राज्यातील 'मनसे'च्या कार्यकर्त्यांमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि उत्साहाचे वातावरण संचारले. अमित ठाकरेंनी निवडणूक लढण्याचा निर्णय झाल्यास, ठाकरे परिवारातील आणखी एक ठाकरे विधानसभेच्या संसदीय राजकारणात पाहायला मिळेल, अशी चर्चा आता रंगली आहे.

'मनसे'चे तीन उमेदवार जाहीर

राज ठाकरे यांचा मध्यंतरी महाराष्ट्र दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी आतापर्यंत तीन उमेदवार जाहीर केलेत. यात मनसे नेते आणि सरचिटणीस यांचा समावेश आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते बाळा नांदगांवकर यांची शिवडी, दिलीप धोत्रे पंढरपूर, राजू उंबरकर यांची लातूर ग्रामीणमधून उमेदवारी जाहीर केली आहे. आता अमित ठाकरेंनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केल्यानं, राज्याच्या सत्तेचा रिमोट स्वतःकडे ठेवणारा ठाकरे परिवार निवडणुकीच्या मैदानात उतरताना दिसतो आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT