BJP Sarkarnama
महाराष्ट्र

BJP Leader Joins Congress : भाजप आमदाराच्या मतदारसंघात काँग्रेसने सुरुंग लावला; बड्या नेत्याची पक्षाला सोडचिठ्ठी

Maharashtra Politics : अमरावतीत भाजपला मोठा धक्का बसला असून धामणगाव विधानसभा मतदारसंघात भाजपला खिंडार पडले आहे. येथे बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Aslam Shanedivan

Amravati News : अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे. भाजपचे आमदार आणि अमरावती जिल्हाध्यक्ष प्रताप अडसड यांच्या मतदारसंघातील माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती रामदास निस्ताने यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षाचा हात धरला. निस्ताने यांच्या पक्षप्रवेशामुळे धामणगाव रेल्वेच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

दिवाळीचा सण संपताच अमरावती जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील अंतर्गत मतभेदांची चर्चा सुरू असतानाच धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात पक्षाला मोठा धक्का बसला. भाजपचे माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती रामदास निस्ताने यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भाजपला आव्हान दिले आहे.

विशेष म्हणजे, निस्ताने यांच्यासोबत धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, तालुक्यातील विविध गावांचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे हा प्रवेश केवळ एका माजी पदाधिकाऱ्याचा नसून स्थानिक पातळीवरील राजकीय शक्तिप्रदर्शन म्हणूनही पाहिला जात आहे.

भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळत नसल्याचा आरोप

रामदास निस्ताने यांनी भाजप सोडण्यामागचे कारणही स्पष्ट केले आहे. भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना योग्य मानसन्मान मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांची साधी विचारपूसही केली जात नसल्याची नाराजी व्यक्त करत आपण काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

प्रताप अडसड यांच्यासमोर नवे आव्हान?

रामदास निस्ताने यांनी यापूर्वी जिल्हा परिषद बांधकाम सभापती, धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि भाजप किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यामुळे स्थानिक राजकारणात त्यांचा प्रभाव लक्षात घेता त्यांच्या काँग्रेस प्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

एकीकडे भाजपकडून संघटनात्मक ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे आमदार प्रताप अडसड यांच्या मतदारसंघातील माजी पदाधिकाऱ्यानेच काँग्रेसचा झेंडा हाती घेतल्याने भाजपसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे. निस्ताने यांच्यासोबत आलेले स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आगामी काळात काँग्रेसची ताकद किती वाढवतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

'रामदास' नावाची राजकीय चर्चा

निस्ताने यांच्या पक्षप्रवेशामुळे धामणगाव रेल्वे मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला स्थानिक पातळीवर किती बळ मिळणार आणि भाजप या घडामोडीला कसे प्रत्युत्तर देणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल. सध्या मात्र धामणगाव रेल्वेच्या राजकारणात रामदास निस्ताने यांच्या पक्षांतराची जोरदार चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT