Anna Hazare sarkarnama
महाराष्ट्र

Anna Hazare : "एका मंत्र्याचा राजीनामा घेतला म्हणून सत्ता जात नाही" : विद्यार्थ्यांची बाजू घेत अण्णा हजारेंनी टोचले पंतप्रधान मोदींचे कान

Anna Hazare Letter to PM Modi On NEET Paper Leak : नीट पेपरफुटीप्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Aslam Shanedivan

Anna Hazare letter News : नीट पेपरफुटीनंतर सुरू झालेल्या आंदोलनाला २० जुलै रोजी हिंसक वळण आले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलकांवर केंद्र सरकारने जबर लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले. तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह १२० हून अधिक खासदार थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले. यामुळे या आंदोलनाची धग आता देशभर पसरत असतानाच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. तसेच अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत पत्रही लिहिले आहे.

या पत्रात अण्णा हजारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी भूमिका घेतली आहे. तसेच लोकशाहीमध्ये संवादाऐवजी दडपशाहीचा मार्ग स्वीकारला जात असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अण्णा हजारे गुरुवारी (ता. २३) सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत मौन आंदोलन करणार आहेत. हे आंदोलन अहिल्यानगरातील वाडिया पार्क येथील गांधी स्मारक येथे दोन तासांचे असेल. यामुळे केंद्र सरकारवर आता दबाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आपल्या पत्रात अण्णा हजारे यांनी, "नवी दिल्लीतील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर झालेली पोलीस कारवाईची बातमी अत्यंत वेदनादायी होती. लोकशाही व्यवस्थेत अशा घटना कोणाच्याही हिताच्या नाहीत, असा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे अनावश्यक बळाचा वापर कोणत्याही परिस्थितीत टाळला पाहिजे," असे म्हटले आहे. सध्या देशातील लाखो तरुण वर्ग हा प्रश्नपत्रिका फुटणे, भरती प्रक्रियेतील विलंब, बेरोजगारी आणि इतर अनेक समस्यांमुळे त्रस्त असून तो चिंतेत आहे. यामुळे त्याच्यात असंतोष असून हा असंतोष केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नसून, त्या समाजाच्या वेदना आणि अपेक्षांचे प्रतिबिंब आहेत. हे समजून घेणे महत्त्वाचे असल्याचे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

नीट परीक्षेत प्रश्नपत्रिका फुटली, परीक्षा प्रक्रियेत गंभीर अनियमितता आढळली. या नैराश्यामुळे २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. फेरपरीक्षेच्या निकालातही मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचे वृत्त आहे. पण जबाबदारी केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांवर टाकली जात आहे. कोणत्याही चांगल्या कामाचे श्रेय सरकार स्वतः घेते. हे अन्यायकारक आहे.

Anna Hazare Writes to PM Modi Over NEET Paper Leak Student Protests

यामुळेच विद्यार्थी आणि पालक गेल्या २५ दिवसांपासून रस्त्यावर शांततापूर्ण आंदोलन करत आहेत. हे सर्व संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. यामुळे मंत्र्यावर जबाबदारी निश्चित करून राजीनामा घेतला, म्हणून सरकारची सत्ता जात नाही. असे केल्यास इतर मंत्र्यांनाही एक स्पष्ट संदेश जाईल आणि सरकारचे कामकाज अधिक उत्तरदायी आणि प्रभावी होईल, असा सल्ला अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदींना दिला आहे.

Anna Hazare Writes to PM Modi Over NEET Paper Leak Student Protests

अण्णा हजारे यांनी, सोनम वांगचुक यांना त्यांच्या उपोषणाच्या जागेवरून जबरदस्तीने हटवण्यावरून देखील खडे बोल सुनावले आहेत. वांगचुक यांना हटवण्यापूर्वी त्यांच्याशी संवाद साधला होता का, असा सवाल करत अनेक दिवसांपासून उपोषण सुरू असताना कोणताही सरकारी प्रतिनिधी किंवा सचिव-स्तरीय अधिकारी भेटायला का गेला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

तर लोकशाहीत, संघर्षापेक्षा संवाद हा नेहमीच एक चांगला मार्ग असे म्हणत, "नम्रपणे विनंती करतो की, लोकांच्या आवाजाला विरोधी पक्षाचा आवाज समजण्याची चूक करू नका. आंदोलक हे देखील याच देशाचे नागरिक असून संवादातून तोडगा काढा," अशी विनंती आपल्या पत्रातून अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांना केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT