महाराष्ट्र

Murder case : देशाचं रक्षण करणाराच बनला हैवान! 8 महिन्यांच्या गर्भवती पत्नीच्या संशयास्पद मृत्यूचा अखेर पर्दाफाश; सैन्य दलातील जवानाला अटक

army jawan arrested for pregnant wife death : 8 महिन्यांच्या गर्भवती पत्नीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात सैन्य दलातील जवानाला अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली

Rashmi Mane

वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात 8 महिन्यांच्या गर्भवती विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांच्या तपासानंतर हे आत्महत्येचे प्रकरण नसून खुनाचा प्रकार असल्याचे समोर आले आहे. विवाहबाह्य संबंधातील अडथळा दूर करण्यासाठी पतीनेच पत्नीचा दोरीने गळा आवळून खून केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय सैन्य दलातील जवानासह त्याच्या आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत महिलेचे नाव दीपाली ज्ञानेश्वर मदने (वय 25, रा. शिवनगर, ता. कारंजा) असे आहे. तर तिचा पती ज्ञानेश्वर नंदू मदने (वय 28), सासरे नंदू गोविंदराव मदने (वय 52) आणि सासू पद्मिनी नंदू मदने (वय 47) यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी पती ज्ञानेश्वर मदने याला 7 ऑगस्ट रोजी पहाटे सुमारे 3 वाजता अटक केली.

गुरुवारी दुपारी ज्ञानेश्वर पत्नी दीपालीला उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात घेऊन आला होता. वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर माके यांनी तपासणी केल्यानंतर दीपालीला मृत घोषित केले. मात्र, तिच्या गळ्यावर व्रण आढळून आल्याने डॉक्टरांना संशय आला. त्याचवेळी ज्ञानेश्वरच्या चेहऱ्यावरही नखाने ओरबाडल्यासारख्या जखमा दिसून आल्या.

दीपालीने आत्महत्या केल्याचा दावा पतीने केला होता. चेहऱ्यावरील जखमा शेतातील बाभळीच्या काट्यांमुळे झाल्याचेही त्याने डॉक्टरांना सांगितले. मात्र, घटनास्थळावरील परिस्थिती आणि शरीरावरील खुणांमुळे पोलिसांनी पतीची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याच्या जबाबांमध्ये विसंगती आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिस तपास आणि मृत दीपालीचा भाऊ राहुल अनिल माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ज्ञानेश्वरचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप आहे. या कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. काही महिन्यांपूर्वी दोन्ही कुटुंबीयांची बैठकही झाली होती. यावेळी ज्ञानेश्वरने आपाले विवाहबाह्य संबंध असल्याचे कबूल करून आपल्याला माफ करण्याची विनंती केली होतो, असा दावा राहुल माने यांनी केला.

तसेच या विवाहबाह्य संबंधांसंदर्भातील व्हॉट्सअॅप चॅटिंग आणि व्हिडिओ उपलब्ध असल्याचा दावाही राहुल माने यांनी केला आहे. पोलिसांनी आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, ज्ञानेश्वर भारतीय सैन्याच्या मराठा बटालियनमध्ये कार्यरत असल्याची माहिती आहे. कोलकाता येथून जम्मू-कश्मीर येथे बदली झाल्यानंतर तो पत्नीला शिवनगर येथे घेऊन आला होता. काही दिवसांपूर्वी दीपालीचा सातव्या महिन्याचा कार्यक्रमही झाला होता. पत्नीला गावी सोडून कर्तव्यावर जाण्याच्या तयारीत असताना दीपालीनेही पतीसोबत जाण्याचा आग्रह धरल्याने दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जात आहे.

8 महिन्यांच्या गर्भवती दीपालीच्या मृत्यूने शिवनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शवविच्छेदनानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अभिजित बारे करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT